निर्यातीद्वारे बंदरनेतृत्व विकासाची क्षमता स्पष्ट
सागरमाला परिषदेत मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन
पणजी : सरकारने सागरमाला अंतर्गत विविध प्रकल्प सुरू केले असून पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने कल्पना केल्याप्रमाणे, बंदरांशी जोडलेले औद्योगिकीकरण निर्यातीद्वारे बंदर-नेतृत्व विकासाची क्षमता उघड करण्याचे उद्दिष्ट ठेवते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले आहे. राष्ट्रीय सागरमाला शिखर समितीच्या बैठकीत ते बोलत होते. केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्गमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह किनारी राज्यांचे प्रतिनिधी आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी अंतर्गत भागातील पर्यटन आणि दैनंदिन प्रवास वाढविण्यासाठी बंदरांचे आधुनिकीकरण आणि जेटींचे बळकटीकरण करणे आवश्यक असल्याचे सांगितले. किनारी समुदाय विकास हा महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. त्यात कौशल्य वाढ, सामाजिक आणि आर्थिक समावेशन आणि आर्थिक वाढ यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याशिवाय रो-रो सेवा आणि वॉटर मेट्रो सारख्या नवीन मार्गांचा शोध देखील घेतला जात आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.