For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पुरस्काराची धामधूम; प्रकल्पाची बत्ती गुल

10:51 AM Dec 21, 2023 IST | Tarun Bharat Portal
पुरस्काराची धामधूम  प्रकल्पाची बत्ती गुल
Advertisement

मनपाचा अगरबत्ती प्रकल्प बंदच : शहरवासियांसह साऱ्यांचीच दिशाभूल; जनतेतून संताप : मनपा आयुक्त कोणती कारवाई करणार?

Advertisement

बेळगाव : खराब फुलांपासून अगरबत्तीचे उत्पादन करून त्याची विक्री केली जाणार आहे, असे सांगत फुल मार्केटमध्ये अगरबत्ती प्रकल्प उभारण्यात आला. त्याचा गवगवा करण्यात आला. जणू महापालिकेला कोट्यावधी रुपयांचे उत्पन्न मिळणार असाच आव आणण्यात आला. बेंगळूरपर्यंत त्याची चर्चा झाली, पुरस्कारही देण्यात आला. मात्र तो प्रकल्पच सुरू नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुरस्काराची धामधूम करणाऱ्या प्रकल्पाची आता बत्ती गुल झाल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. फुल मार्केटमध्ये फुलांना ग्राहक मिळाले नाही तर फुले त्याठिकाणी फेकून दिली जातात. पण ती फेकून न देता त्यापासून अगरबत्ती प्रकल्प राबविण्याचा निर्णय महापालिकेमध्ये घेण्यात आला. पर्यावरण विभागाचे साहाय्यक अभियंते हणमंत कलादगी यांनी प्रकल्पाबाबत माहिती दिली. त्याला सर्वांनीच होकार दिला. महापालिका आयुक्तांनीही हा प्रकल्प चांगला असून निश्चितच त्याचा फायदा होईल, असे म्हणत परवानगी दिली. मात्र हा प्रकल्पच त्याठिकाणी सुरू नसल्याचा प्रकार आता उघडकीस आला आहे.

साऱ्यांचीच दिशाभूल

Advertisement

फुल मार्केटमध्ये अंदाजे 400 स्क्वेअर मीटरमध्ये शेड उभारण्यात आले. त्याठिकाणी काही यंत्रेही दाखविण्यात आली. त्याचे उद्घाटन आमदार, महापौर आणि नगरसेवकांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात करण्यात आले. मात्र केवळ एक दिवसच हा प्रकल्प सुरू झाला. त्यानंतर आजतागायत प्रकल्प बंद असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यावर कहर म्हणजे त्या प्रकल्पासाठी वीज जोडणीच करण्यात आली नाही. त्यामुळे साऱ्यांचीच दिशाभूल झाली असून, महापालिकेतील अधिकाऱ्यांसह महापौर आणि नगरसेवकांची देखील फसवणूक करण्यात आली आहे.

प्रकाराकडे नगरसेवकांचेही दुर्लक्ष की जाणूनबुजून कानाडोळा?

महत्त्वाचे म्हणजे बेळगाव महानगरपालिकेमध्ये विविध प्रकल्प राबविले जात आहेत, असे भासविण्यात आले. बेंगळूरमध्ये आयोजित केलेल्या प्रदर्शनामध्ये स्टॉल घालण्यात आला. त्याठिकाणी बेळगाव महानगरपालिकेच्या माध्यमातून अगरबत्ती प्रकल्प, तसेच इतर प्रकल्प राबविण्याची माहिती देण्यात आली. तेथे वाहव्वा मिळविण्यात आली. बेळगाव महानगरपालिकेचे काम वाखाणण्याजोगे आहे म्हणून पुरस्कारही देण्यात आला. खरोखरच ही अत्यंत गंभीर आणि खेदाची बाब आहे. या सर्व प्रकाराकडे नगरसेवकांचेही लक्ष नाही का? की जाणूनबुजून याकडे कानाडोळा केला जात आहे? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

केवळ बायोगॅस प्रकल्प सुरू

महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी हे कार्यतत्पर अधिकारी म्हणून ओळखले जातात. मात्र त्यांचीही यामध्ये दिशाभूल झाल्याचे दिसून येत आहे. केवळ एक दिवस उद्घाटन झाले. त्यानंतर अगरबत्तीचे उत्पादन झाले की नाही? हे कोणीच पाहिले नाही. महापौर, उपमहापौर, आयुक्त यांना देखील अंधारात ठेवण्यात आले आहे? असे किती प्रकल्प बंद आहेत, आता ते पहावे लागणार आहे. कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात येत आहे. त्या माध्यमातून बायोगॅस तसेच प्लास्टिकच्या माध्यमातून डिझेल उत्पादन करण्यात येणार असल्याचे पत्रकारांना सांगण्यात आले. मात्र या प्रकल्पांचाही पत्ता नाही. केवळ बायोगॅस प्रकल्प सुरू असल्याचे आता बोलले जात आहे.

साऱ्यांचीच फसवणूक केली जातेय, ही गंभीर बाब!

महापालिकेमध्ये सत्ताधारी आणि विरोधी गटामध्ये जोरदार राजकारण सुरू आहे. मात्र या राजकारणाचा फायदा अधिकारीच उठवत आहेत, अशी चर्चादेखील आता होऊ लागली आहे. कोणताही प्रकल्प राबविण्यासाठी प्रोत्साहन देणे हे साऱ्यांचेच कर्तव्य आहे. मात्र साऱ्यांचीच फसवणूक केली जाते, ही बाब देखील गंभीर आहे. वास्तविक दोन महिन्यांपूर्वी या प्रकल्पाचे उद्घाटन झाले आहे. त्यानंतर महापालिकेला त्यामधून किती उत्पन्न मिळाले, याबाबत कोणीच विचारले नाही. इतरवेळी मात्र महापालिकेतील अधिकाऱ्यांना हिशेबाबरोबरच विविध माहिती विचारली जाते. मात्र असे अनेक प्रकल्प बंद आहेत. तर काही प्रकल्प अर्धवट आहेत, याची थोडीशीही माहिती सत्ताधारी व विरोधी गटातील नगरसेवकांना नाही, ही खरोखरच गंभीर बाब आहे. आता या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष दिले जाणार का? असा प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे.

Advertisement
Tags :

.