शिवपुतळ्यावरून राजकीय ‘महाभारत,’ माफीनामेही बस्स झाले!
मालवण-राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळून दुर्दैवी घटना घडली. या घटनेला आठ दिवस झाले, तरी या घटनेवरून सुरू असलेले राजकीय ‘महाभारत’ थांबलेले नाही. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडूनही केले जाणारे राजकारण महाराष्ट्रासाठी लांच्छनास्पद आहे. शिवपुतळा कोसळण्याच्या घटनेने प्रत्येक शिवप्रेमीच्या हृदयात जखम झाली आहे. आता कितीही मोठा पुतळा उभारला, तरी ही भळभळती जखम कधीही भरून येणारी नाही. चुकीला माफी असते, परंतु अवघ्या आठ महिन्यांमध्ये पुतळा कोसळणे म्हणजे हा गुन्हाच आहे. त्यामुळे महाराजांची शंभरवेळा माफी मागितली, तरी या गुन्ह्याला माफी नाही. जे-जे कुणी दोषी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे.
4 डिसेंबर 2023 रोजी नौसेना दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोकणातील मालवण-राजकोट किल्ला येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. त्यानंतर पर्यटनाच्या निमित्ताने कोकणात येणारे शिवप्रेमी हे प्रत्येक भारतीयाच्या मनात आदराचे स्थान असलेल्या शिवछत्रपतींच्या राजकोट किल्ल्यावर त्यांच्या पुतळ्याचे दर्शन घेण्यास भेट देऊ लागले. लाखोंच्या संख्येने पर्यटक व शिवप्रेमींनी आतापर्यंत भेटी दिल्या. परंतु, दिमाखात उभा असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा 26 ऑगस्ट 2024 रोजी कोसळला. ही दुर्दैवी घटना घडताच, प्रत्येक शिवप्रेमीच्या हृदयात धस्सऽऽ झाले. यावर कुणाचा विश्वास बसेना. परंतु ती वस्तुस्थिती होती. त्यामुळे शिवप्रेमींनी अतिशय तीव्र भावना व्यक्त करीत, या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सुरू केली. स्थानिक आमदार वैभव नाईक यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत, तीव्र शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोडही केली. ही त्यांची पहिली प्रतिक्रिया होती.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यातच कोसळणे हे न पटणारेच. या घटनेने सत्ताधाऱ्यांना टार्गेट करण्यासाठी विरोधकांच्या हातात आयते कोलीत मिळाले. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्याचदिवशी तात्काळ भेट देत दोषींवर कारवाई करण्याचे जाहीर केले. परंतु, शिवप्रेमींच्या भावना तीव्र होत्या. विरोधकांनी हा विषय उचलून धरत घटनेच्या निषेधार्थ मालवण शहर बंद ठेवत मोर्चा काढण्याचे ठरविले. त्याप्रमाणे नियोजनही झाले. परंतु, त्याच दिवशी खासदार नारायण राणे व भाजपचे पदाधिकारी राजकोटला दुर्घटनास्थळी आले. त्याचवेळी महाविकास आघाडीचे व उबाठा शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जयंत पाटील व इतर पदाधिकारी आमने-सामने भिडले आणि मोठा राजकीय राडा झाला. इथूनच शिवपुतळ्यावरून अधिक राजकारण सुरू झाले. याच घटनेवरून राजकोट किल्ल्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय राडा झाला. हा राडा दूरचित्रवाहिन्यांवरून अख्खा देश पाहत होता. त्यावेळी समस्त कोकणवासीयांची शरमेने मान खाली गेली. एवढे होऊनही राजकारण काही थांबलेले नाही. घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी राजकीय नेत्यांचे दौरे सुरूच आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना नेते संजय राऊत, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, उबाठा शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी दौरे केले. अजूनही काही नेते दौरे करतील.
घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने सरकारविरोधात मुंबईत ‘जोडे मारो’ आंदोलन केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपनेही राज्यभर महाविकास आघाडीविरोधात निषेध आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केले जाणारे राजकारण निश्चितच किळसवाणे आहे. अवघ्या आठ महिन्यांमध्ये शिवपुतळा कोसळल्याने राज्य शासनावर टीकेची झोड उठविली जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिली माफी मागितली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे नेते आशिष शेलार यांनीही माफी मागितली. पाठोपाठ महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही माफी मागितली. सत्ताधाऱ्यांनी माफी मागून शिवपुतळा कोसळण्याच्या घटनेवर पांघरुण घालण्याचा प्रयत्न केला. परंतु, अवघ्या आठ महिन्यांमध्ये शिवपुतळा कोसळण्याच्या घटनेवर माफीनामा चालणारा नाही.
राजकोट किल्ल्यावर पुन्हा भव्य पुतळा उभारला जाईल, शंभरवेळा माफीही मागितली जाईल. परंतु शिवपुतळा कोसळण्याच्या दुर्घटनेने शिवप्रेमींच्या हृदयात निर्माण झालेली जखम भरून येणारी नाही. त्यासाठी जे-जे कुणी दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. शिवपुतळा दुर्घटनेवरून सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. तसेच शिल्पकार व स्ट्रक्चरल ऑडिटरवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परंतु, या दुर्घटनेला जबाबदार म्हणून दोघांवरच कारवाई करून चालणार नाही किंवा राज्य शासनाने नौदलाकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकून चालणार नाही. जे-जे कुणी या घटनेला जबाबदार असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विषयावर बैठक घेऊन तांत्रिक चौकशी समिती नेमली. पुतळा उभारणीसाठीही समिती नेमली आहे. परंतु आता विधानसभा निवडणूक अवघ्या दीड-दोन महिन्यांवर आली आहे. त्यामुळे चौकशी समितीचा अहवाल निवडणुकीपूर्वी तयार होण्याबाबत साशंकताच आहे.
राज्यात यापूर्वी वेगवेगळ्या प्रकरणात अनेक चौकशी समित्या नेमल्या गेल्या. परंतु प्रकरण थंड झाल्यावर पुढे चौकशी समित्यांच्या अहवालाचा पत्ताच नसतो. पुढे काय झाले हे समजतच नाही. परंतु शिवपुतळा कोसळल्याची घटना घडल्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले. त्यामुळे चौकशी अहवाल वेळेत द्यावाच लागणार आहे. शिवपुतळा आठ महिन्यांमध्ये कोसळलाच कसा? शिवपुतळा उभारण्याची जबाबदारी फक्त नौदलाची होती की राज्य सरकारचीही? शिल्पकाराला पुतळा बनविण्यासाठी पुरेसा वेळ दिला होता का? कला संचालनालयानुसार परवानगी एवढीच पुतळ्याची उंची होती का? पुतळा ब्राँझचा होता की पितळेचा? नौदल अधिकारी जबाबदार असतील, तर त्यांच्यावर कारवाई होणार का? पुतळा उभा करताना वापरलेल्या लोखंडावर प्रक्रिया झाली होती का? झाली असेल, तर ते गंजले कसे? पुतळा उभारण्याची घाई कुणी केली होती? असे अनेक प्रश्न शिवप्रेमींच्या मनात असून या प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत.
राजकोट किल्ल्याच्या बाजूलाच भर समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी 1666 साली बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला साडेतीनशे वर्षानंतरही अभेद्य व दिमाखात उभा आहे. हा किल्ला पाहण्यासाठी देशभरातून शिवप्रेमी व पर्यटक येत असतात. छत्रपतींनी उभारलेला सिंधुदुर्ग किल्ला व मालवणची स्वच्छ समुद्र किनारपट्टी पाहायला देश-विदेशातून कोकणात लोक येतात. डिसेंबर 2023 मध्ये राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला गेला आणि विशेष करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण झाले. त्यामुळे हे स्थळ पर्यटकांचे मोठे आकर्षण ठरले होते. पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरले. एरव्ही राजकोट किल्ल्यावर न जाणारे पर्यटक लाखोच्या संख्येने जाऊ लागले. याचा अजून चांगला परिणाम म्हणजे कोकणच्या पर्यटनात मोठी भर पडून अर्थकारणही वाढले. मालवणवासीयही पर्यटकांना चांगल्या सुविधा देतात. मात्र आता राजकोट किल्ला कोसळल्यापासून येथील शांतता भंग झाली आहे. शिवपुतळ्यावरून झालेला राजकीय राडा आणि केले जाणारे राजकारण मालवणवासीयांनाच नव्हे, तर समस्त कोकणवासीयांना नकोसे झाले आहे. पुतळा कोसळण्यावरून माफीनामा वगैरे बस्स झाले. आता राजकारण पुरे झाले. जे-जे जबाबदार असतील, त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करा, हेच अंतिमत: योग्यतेचे असेल.
संदीप गावडे