अवतारकाळात मी सर्व नीतीनियमांचे पालन करतो
अध्याय तिसरा
जेव्हा मातलेले लोक अधर्माचे आचरण करू लागतात तेव्हा त्यातून होणारा अन्याय आणि पाप नष्ट करण्यासाठी ईश्वरी अवतार होतो. ईश्वराचे अवतार अवरोहात्मक व आरोहात्मक अशा दोन स्वरूपाचे असतात. पहिल्या अवरोहात्मक स्वरूपात ईश्वर स्वत: मनुष्यदेह धारण करतात तर दुसऱ्या स्वरूपात ज्या मनुष्याची ईश्वरस्वरूपात उक्रांती झालेली असते, त्याच्याकडून लोककल्याणाची कामे ईश्वर करून घेतात. ईश्वरी प्रेरणेने लोककल्याणकारी कामे करणारे अनेक साधूसंत आपल्या भारतात होऊन गेलेले आहेत. म्हणून आपला देश आध्यात्मिक दृष्ट्या धन्य होय. संत चरित्रांचा अभ्यास करून आपणही त्यांच्याप्रमाणे लोककल्याणकारी कार्ये करण्याचा प्रयत्न करू शकतो. असे करत गेल्यास आपलाही उद्धार होण्याच्या क्रियेला सुरवात होते. बाप्पा म्हणाले, अवतारकाळात मी अधर्मसंग्रहाचा उच्छेद करून धर्माची संस्थापना करतो. नानाप्रकारच्या लीला करून हसत खेळत दुष्टांचा व दैत्यांचा संहार करतो.
बाप्पा म्हणाले, अवतारकाळात मी सर्व नीतीनियमांचे पालन करतो. असे माझे दिव्य जन्म जो जाणतो त्याचा उद्धार होतो. ह्या आशयाचे दोन श्लोक आपण पहात आहोत. ते श्लोक असे, वर्णाश्रमान्मुनीन्साधून्पालये बहुरूपधृक् । एवं यो वेत्ति
संभूतीर्मम दिव्या युगे युगे ।। 12 ।। तत्तत्कर्म च वीर्यं च मम रूपं समासत । त्यक्ताहंममताबुद्धिं न पुनर्भू स जायते ।। 13 ।। बाप्पा म्हणतात, माझे जन्म दिव्य असतात तशीच कर्मेही दिव्य असतात. दिव्य म्हणजे अलौकिक, सर्वसामान्यांना सहजी करता न येण्यासारखी. अवतारकार्यातून ईश्वराला आदर्श जीवन कसे असू शकते हे लोकांना दाखवून द्यायचे असते. स्वत:च्या कर्तृत्वावर श्रद्धा वाढवायची असते. सत्यावरचा विश्वास वाढवायचा असतो. आपल्याप्रमाणेच माणसानेही दिव्य कर्मे करावीत अशी ईश्वराची इच्छा असते. कर्मामध्ये दिव्यता कर्मयोगाने येते. निरपेक्ष कर्म करण्याने कर्मबंध संपुष्टात येतो. तसेच मागील संचित हळूहळू निष्प्रभ होते. दिव्य कर्मे केल्यामुळे लोककल्याण व लोकोध्दार दोन्ही साधली जातात. ज्याप्रमाणे ईश्वर अवतारकाळात दिव्य कर्मे करून त्यापासून अलिप्त राहतात त्याप्रमाणे माणसानेही दिव्य कर्मे करायचा प्रयत्न करून त्यापासून अलिप्त रहावे. ईश्वर केवळ जीवांचा उध्दार करण्यासाठी पृथ्वीवर अवतार घेतात व अनेक प्रकारच्या दिव्य आणि अलौकिक क्रिया करतात. या लीलांच्या गायनाने, त्या ऐकण्याने, त्यांचे चिंतन केल्याने ईश्वराशी संबंध जोडला जातो आणि माणसाचा उध्दार होतो.
ईश्वराच्या अवताराचे आणखीन एक वैशिष्ट्या म्हणजे अमुक एकजण ईश्वरी अवतार आहे हे लोकांना चटकन समजून येत नाही. काही वेळा तर ईश्वरी अवतार म्हणून वावरणाऱ्या व्यक्तीला तुच्छता वाट्याला येते. प्रत्यक्ष श्रीकृष्णाना गवळ्याचा पोर, रणछोडदास इत्यादी विशेषणांनी हिणवले गेले आहे. भगवद्गीतेतही नवव्या अध्यायात भगवंतांनी याचा उल्लेख केलेला आहे. मज मानव-रूपात तुच्छत्वे मूढ देखती । नेणूनि थोरले रूप जे माझे विश्व-चालक ।। 9.11।।
आपण जिथं अशी दिव्य कर्मे चालू असतील तिथं ईश्वराची उपस्थिती आहे अशी खूणगाठ मनाशी बांधावी. त्यातूनही समाजातील काही लोक ईश्वरी अवताराला ओळखतात. उदाहरणार्थ कृष्णवतारात उद्धव, द्रौपदी, भीष्म, सुदामा, अकृर, कुंती, विदुर इत्यादींनी श्रीकृष्ण हा ईश्वरी अवतार आहे हे ओळखलं होतं. ईश्वरी अवतार ओळखणं हे सहजशक्य नसतं. एखाद्या गोष्टीचं महत्त्व त्यालाच कळतं ज्याला त्या गोष्टीची योग्यता माहीत असते आणि अशी योग्यता कळण्यासाठी अंगात काही पात्रता असावी लागते. ही पात्रता कोणती आणि ती मिळवणं कुणाला शक्य होतं ते बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत.
क्रमश: