For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगुंदीतील ‘त्या’ घटनेबाबत पोलिसांची संशयास्पद भूमिका

06:45 AM Dec 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
बेळगुंदीतील ‘त्या’ घटनेबाबत  पोलिसांची संशयास्पद भूमिका
Advertisement

कोणत्याच प्रकारची तक्रार दाखल नसल्याने जनतेत आश्चर्य

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

एका विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून शिक्षकाला संतप्त जमावाने बेदम मारहाण केली होती. बेळगुंदी येथे ही घटना घडली होती. दुसऱ्या दिवशीही या प्रकरणी कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे हे प्रकरण दडपण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Advertisement

बेळगाव येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. काकती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील एका गावात महिलेला विवस्त्र करून खांबाला बांधून मारहाण करण्यात आली होती. या घटनेनंतर पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली होती. बेळगुंदी येथील घटनेची पोलीस दलाने गांभीर्याने दखल घेतली नसल्याचे दिसून येते.

यासंबंधी शनिवारी रात्री बेळगाव ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधला असता गैरवर्तन करणाऱ्या शिक्षकाविरुद्ध संबंधित अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी फिर्याद दिली नाही. त्यामुळे एफआयआर दाखल झाला नसल्याचे सांगण्यात आले. महिला व बालकल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांनीही संबंधित विद्यार्थिनी व तिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्याकडून घटनेची माहिती घेतली आहे.

शिक्षण खात्याने मात्र संबंधित शिक्षकावर निलंबनाची कारवाई केल्याचे सांगितले. ही घटना उघडकीस आल्यानंतर बेळगुंदीत मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता. पोलीस जीप अडवून संताप व्यक्त करण्यात आला होता. अधिवेशनकाळात मोठी घटना घडूनही काहीच घडले नाही, या पवित्र्यात पोलीस अधिकारी वागत आहेत. त्यामुळे पोलिसांची भूमिकाच संशयास्पद असल्याचे दिसून येते.

राजकीय पक्षांनी मौन बाळगल्याने संशय...

बेळगुंदी गावातील एका माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकावर विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन केल्याचा अत्यंत गंभीर व धक्कादायक आरोप समोर आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. ही घटना बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, प्रकरण उघडकीस येताच पालक, ग्रामस्थ व नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. शाळा या विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, विश्वासार्ह आणि संस्कार देणाऱ्या संस्था असाव्यात. मात्र अशा अमानवी व विकृत कृत्यामुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. आरोपी शिक्षकावर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी जोरदार मागणी पालक, ग्रामस्थ व  विविध सामाजिक संघटनांकडून केली जात आहे. याहूनही अधिक धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकरणातील आरोपी मुख्याध्यापकाला काही राजकीय पक्षांकडून अप्रत्यक्ष पाठबळ किंवा संरक्षण दिले जात असल्याचा गंभीर आरोपही समोर येत आहे. तसेच या संवेदनशील प्रकरणावर संबंधित राजकीय पक्षांनी मौन बाळगल्याने संशय अधिक बळावला आहे.

-डॉ. सोनाली सरनोबत, सेक्रेटरी भाजप महिला मोर्चा, कर्नाटक

Advertisement
Tags :

.