For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हलगा-मच्छे बायपासमधील शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

06:40 AM Dec 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
हलगा मच्छे बायपासमधील शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
Advertisement

नुकसानभरपाई स्वीकारू नये, शेतकरी संघटनेचे आवाहन

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

सुपीक जमिनीतून 2014 साली हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. परंतु, अनेक शेतकऱ्यांनी आजही या रस्त्याला आपला विरोध दर्शवला आहे. सध्या शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही अधिकारी, कर्मचारी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन तुमच्या खात्यात नुकसानभरपाई जमा केली जाईल, असे सांगून या लढ्याची धार कमी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु, या भूलथापांना शेतकऱ्यांनी बळी पडू नये, असे आवाहन शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.

Advertisement

कृषी कायद्याचे उल्लंघन करत 2014 साली पोलिसांच्या दबावाने हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. 1 हजार 047 अल्पभूधारक शेतकऱ्यांची 160 एकर जमीन बेकायदेशीररीत्या संपादित केली. यापैकी 80 ते 90 टक्के शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई घेतली असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. परंतु, माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवल्यास ती दिली जाऊ शकत नाही, असे उत्तर दिले जात आहे.

चुकीच्या पद्धतीने झिरो पॉईंट दाखवत महामार्गासाठी आरेखन करण्यात आले. त्यामुळे झिरो पॉईंट निश्चितीसाठी शेतकरी न्यायालयात गेले आहेत. झिरो पॉईंट निश्चित झाल्याशिवाय या पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीत पाय ठेवू नये किंवा त्यांच्या पिकांचे नुकसान करू नये, असा निर्वाळा जिल्हा न्यायालयाने दिला आहे. याबाबतचे तीन दावे सध्या सुरू आहेत. परंतु, वर्कऑर्डर कॉपी दाखवत दिशाभूल करून बायपासचे काम सुरू ठेवण्यात आले आहे.

हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या विरोधातील लढा खिळखिळा करण्यासाठी आता नवीन शक्कल लढविण्यात येत आहे. दावा दाखल केलेल्या शेतकऱ्यांच्या घरी काही अधिकारी व कर्मचारी जात असून लवकरात लवकर नुकसानभरपाई घ्यावी अन्यथा पुढे मिळणार नाही, असा धमकीवजा इशारा दिला जात आहे. परंतु, आमच्या परवानगीशिवाय बेकायदेशीररीत्या पैसे खात्यात जमा होतातच कसे? असे सांगून त्या अधिकाऱ्यांना माघारी पाठविले जात आहे. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याने नुकसानभरपाईचे पैसे स्वीकारू नयेत, असे आवाहन संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.