पोलिसांनी धिंगाणा पाडला बंद
पणजीत सात म्युझिक सिस्टम्स जप्त : अनेकांच्या विरोधात गुन्हेही केले नोंद,नरकासुराच्या नावाचा धिंगाणा भोवला
पणजी : राज्यात अनेक ठिकाणी नरकासुराच्या नावाखाली नियमांचे उल्लंघन करून कर्णकर्कश संगीत लावून धिंगाणा घालणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. वेळ संपल्यानंतरही कर्णकर्कश संगीत सुऊच ठेवणाऱ्यांना पोलिसांनी अगोदर ते बंद करण्यास सांगितले. ज्यांनी पोलिसांचे ऐकले नाही, त्यांच्यावर कारवाई करून त्यांची म्युझिक सिस्टम जप्त करण्यात आली. पणजी पोलिसांनी अशाप्रकारे सात ठिकाणच्या म्युझिक सिस्टम्स जप्त केल्या आहेत. काहीजणांच्या विरोधात गुन्हेही नोंद केले आहेत. नरकासुराच्या रात्री म्हणजे शनिवारी कर्णकर्कश संगीत लावून, धिंगाणा घालून त्रास केला जात असल्याबद्दल पणजी परिसरातून पोलीस स्थानकात 100 हून अधिक कॉल आले होते. उपनिरीक्षक मयुर पणशीकर आणि त्यांच्या टीमने प्रत्येक ठिकाणी जाऊन कर्णकर्कश संगीत बंद करण्यास सांगितले. ज्यांनी त्यांचे ऐकले नाही, त्यांची म्युझिक सिस्टम जप्त करण्यात आली. पोलिसांच्या या कारवाईबाबत काही युवकांनी पोलिसांकडे हुज्जत घातली, परंतु पोलिसांनी काहीही ऐकून घेतले नाही. काही मंडळांनी राजकारण्यांना फोन लावून पाहिले, मात्र त्यांचे फोन ‘स्विच्ड ऑफ’ होते.
दिलेल्या तंबीनुसार कारवाई
पणजी पोलीस स्थानकाच्या हद्दीत 37 मोठे नरकासूर होते, तर त्यापेक्षा अनेक पटीने लहान, मध्यम नरकासूरही करण्यात आले होते. मोठ्या नरकासुरांच्या ठिकाणी गोवा तसेच गोव्याबाहेरून हजारो ऊपये खर्च करून आणलेल्या मोठ्या म्युझिक सिस्टम्स लावण्यात आल्या होत्या. मद्यधुंद अवस्थेत युवावर्ग धिंगाणा घालत होता. पोलिसांनी नरकासूर करणाऱ्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची अगोदर बैठक घेऊन त्यांना नियम आणि वेळेच्याबाबत तंबी दिली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री दहापर्यंत नियम, ध्वनीमर्यादा पाळून लाऊडस्पिकरवर संगीत लावण्यास मुभा आहे. मात्र काही प्रमुख कार्यक्रमांसाठी रात्री 12 पर्यंत सवलत देण्यात आली आहे. शनिवारी पणजी परिसरातील काही नरकासुरांच्या ठिकाणी दिलेल्या वेळेच्या बाहेर कर्णकर्कश संगीत सुरु होते, त्याबद्दल तक्रारींचा फोन कॉल आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.