For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘उडान’ची कविता!

06:27 AM Feb 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘उडान’ची कविता
Advertisement

90 च्या दशकात दूरदर्शनवर गाजलेल्या उडान मालिकेच्या लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेत्री कविता चौधरी यांचे नुकतेच निधन झाले. फार थोड्या काळात आपल्या अभिनयाचा ठसा एका पिढीवर उमटवलेल्या चौधरी यांची उडानमधील पोलीस अधिकारी कल्याणी सिंग यांची भूमिका देशवासीयांच्या मनात घर करून राहिली आहेच. पण, एका डिटर्जंट पावडरच्या जाहिरातीतील त्यांची कपाळावरील मोठ्या आकाराच्या टिकलीतील ललिताजीसुध्दा दीर्घ काळ डोळ्यासमोर त्या नावासह उभी राहते. कविता यांनी जगाचा निरोप घेतला असला तरीही त्यांचे आणि ‘उडान’चे हे कवित्व मात्र संपलेले नाही. त्याच्यानंतर ही त्यांच्या स्मृतीला उजाळा देत राहणारच आहे. उडान ही मालिका 35 वर्षांपूर्वी दूरदर्शनसमोर बसणाऱ्या त्या काळातील सर्व वयोगटाच्या नागरिकांच्या स्मरणात आहे. हे स्मरण जोपर्यंत ही पिढी आहे तोपर्यंत राहणारच आहे. यूट्यूबकृपेने ही कलाकृती पुढच्या पिढीलाही सहज बघायला मिळणार आहे. असे काय होते या मालिकेत? की ज्यामुळे आज 35 वर्षानंतर त्या मालिकेतील मुख्य भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीच्या निधनानंतर लोक हळहळत आहेत? या आजच्या पिढीच्या प्रश्नाच्या उत्तरात दूरदर्शनचा सुवर्णकाळ लपलेला आहे. भारतीय माणसांच्या भावभावना लपलेल्या आहेत. युवक, युवतींच्या काही करू पाहणाऱ्या पिढीच्या जिद्द आणि चिकाटीच्या आरंभाचा काळ तिथे कुठेतरी लपलेला आहे. त्याचप्रमाणे बेरोजगारीसह अपेक्षाभंगाने मागे पडलेल्या पिढीच्या तत्कालीन कोवळ्या भावनांशीसुद्धा याची नाळ जोडलेली आहे. सर्वसामान्य आणि गरीब घरातील मुलांनी जिद्द बाळगावी आणि जगात आपलेही दिवस येऊ शकतात असे मनातून मानून जिद्दीने यश खेचून आणावे असे ध्येय देणारी अशी ही मालिका होती. पहायला गेले तर अवघ्या 30 भागांची. आजकालच्या मालिकांसारखी सलग दररोज चार-पाच वर्षे किंवा त्यापेक्षाही अधिक काळ चालणाऱ्या मालिकेसारखी लांबलचक आणि पाणी वाढवून बनवलेल्या कढीसारखी ही मालिका नव्हती. मर्यादित कालाची, आठवड्यातून एक दिवस, अर्ध्या तासाची ही मालिका पहायला लोक तुटून पडत. भारतभरात ठराविकांच्या घरी रंगीत टीव्ही सोडला तर बहुतांश लोकांच्याकडे त्या काळात ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीच होता. अजून जगभरातल्या वेगवेगळ्या कंपन्या भारतात आलेल्या नव्हत्या आणि दूरदर्शनवरील मालिका पाहणे हा रोज रात्रीचा संपूर्ण भारताचा राष्ट्रीय कार्यक्रम बनलेला होता. त्या काळात काही आठवड्याच्या या मालिकेने लोकांच्या मनात जे निर्माण केले ते काही पिढ्यांना आयुष्यभर पुरेल इतके आहे. आपली बहीण आयएएस अधिकारी कशी बनली, त्यासाठी तिला काय दिव्य पार पाडावे लागले याचे चित्रण कविता चौधरी यांनी स्वत:च कथा, अभिनय आणि दिग्दर्शन करून या मालिकेद्वारे केले. लोकांसमोर कल्याणी एक आदर्श बनून उभी राहिली. या मालिकेचे कवित्व त्यामुळेच आहे. स्पर्धा परीक्षांकडे उर्वरित भारतातील सर्वसामान्य आणि मध्यमवर्गच नव्हे तर शेतकरी कुटुंबातील मुलेही आस्थेने आणि जिद्द म्हणून पहायला लागलेला तो काळ होता. त्या मालिकेने आणि कविता चौधरी यांनी त्यातील अभिनयाने त्या काळचे एकाअर्थाने नेतृत्व केले. ते त्यांना कोणी बहाल केले नाही. पण, प्रत्येकाच्या मनात त्या जिद्दीने पेट घेतला म्हणूनच मर्यादित अभिनय आणि दिग्दर्शन करूनही 35 वर्षानंतर ही हळहळ व्यक्त होत आहे. अर्थात दूरदर्शनच्या त्या समृध्द काळातील सर्वच कार्यक्रम इतकेच नव्हेतर जाहिराती, मुलाखती, विश्लेषण हे एका दर्जाचे आणि उच्च अभिरुचीचे दर्शन घडविणारे होते. टीव्हीच्या बातम्यांतून केवळ प्रसार माध्यमांना किंवा राजकारणी, उद्योजक, व्यापारी अशा मर्यादित वर्गाला नव्हे तर आबालवृद्धांना ज्ञानाची कवाडे खुली झाल्याचा आनंद मिळायचा. जगाच्या माहितीतून आपण अनभिज्ञ आहोत अशी भावना असलेला किंवा समाजापासून तुटलेला असा वर्ग त्याकाळात कदाचित यामुळे खूप अल्प प्रमाणात असावा. एक उत्तम आशय प्रेक्षकाच्या मनात उतरवण्याची हातोटी असणारे कलाकार आपल्या अभिनयाचे जे दर्शन घडवत होते, दिग्दर्शक आपल्या कौशल्याने जे लोकांसमोर ठेवत होते त्यातून विचारी समाज घडत होता. 90 च्या दशकाचा यादृष्टीने विचार केला तर एकीकडे सामाजिक आणि राजकीय परिस्थिती बदलत होती. राजकारण नवे वळण घेत होते. आर्थिक स्थिती बदलण्याची वेळ जवळ आली होती आणि या दुष्टचक्रातून आपल्याला आपले आयुष्य घडवायचे आहे हे एका पिढीला दिसत होते. त्यांच्यासमोर स्वत:चे असे ध्येय ठेवण्याचे काम कविता चौधरी यांच्या मालिकेने जसे केले तसेच त्या काळातील विविध कला प्रकारांनी, व्यक्तींनी केले. वास्तववादी चित्रण, प्रश्नांवर थेट मिळणारे उत्तर, विचारांची प्रक्रिया गतिमान होईल अशा पैलूंचे घडवले जाणारे दर्शन ही त्या काळातील कलाकृतींची एक वेगळीच लज्जत होती. ती केवळ मालिकांमध्ये होती असे नाही. 90 हे असे दशक आहे ज्या दशकात तरंगत असलेली पिढी अनेकार्थाने ‘तयारीची’ निपजली. त्याच पिढीला जगातील बहुतेक सर्व बदलांना सामोरे जावे लागले, स्वीकारावे लागले, त्याच्या बऱ्या-वाईट परिणामांना सोसावे आणि भोगावेदेखील लागले. त्यातून त्यांच्या वाट्याला खूप समृध्दी आली. निराशेतसुध्दा त्यांच्यासाठी काही आशादायक पेरून ठेवले होते, त्याच्या जोरावर या पिढीची नौका आजही तरली आहे. अनेकांची डौलाने चालली आहे तर काहींची पैलतीर गाठत आहे. एकूणच आजच्या परिघात या काळाची पिढी सर्वत्र व्यापलेली आहे. त्यांच्या आशा, आकांक्षांचे गाणे त्यामुळेच आजचा सूर बनलेले आहे. या सुरातील कविता असलेली एक तार तुटली इतकेच....!

Advertisement

Advertisement
Tags :

.