ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याचा कट उधळला
शस्त्रास्त्रांसह एकाला अटक : बनावट पाससह घुसण्याचा करत होता प्रयत्न
वृत्तसंस्था/ कोचेला
अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्षीय उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न उधळून लावण्यात आला आहे. ट्रम्प हे कॅलिफोर्नियाच्या कोचेलामध्ये सभेला संबोधित करत असताना शस्त्रास्त्रांसह एका इसमाला सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतले आहे.
आरोपीच्या ब्लॅक एसयुव्ही कारमधून पोलिसांना एक शॉटगन, एक लोडेड हँडगन आणि एक हाय कॅपेसिटी मॅगजीन मिळाली आहे. आरोपीकडे बनावट पास होते, याचमुळे त्याच्यावरील संशय बळावल्याचे रिव्हरसाइड काउंटीचे शेरिफ चाड बियान्को यांनी सांगितले.
49 वर्षीय आरोपीचे नाव वेम मिलर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मिलरवर दोन शस्त्रास्त्रs बाळगल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. 5 हजार डॉलर्सच्या बाँडवर त्याची मुक्तता करण्यात आली आहे. 2 जानेवारी 2025 रोजी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. वेम मिलर हा एक नोंदणीकृत रिपब्लिकन आहे. तो दीर्घकाळापासून उजव्या विचारसरणीच्या गटाशी जोडला गेलेला आहे. तसेच नेवादा स्टेट असेंबलीची 2022 ची निवडणूक त्याने लढविली होती.
केचेला येथे एका इसमाला शस्त्रास्त्रांसह ताब्यात घेण्यात आल्यावर ट्रम्प यांच्या सभेतील सुरक्षा वाढविण्यात आली. त्यांना सभेच्या मैदानापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक स्तरीय सुरक्षा तपासण्यांमधून जावे लागले. सर्वांच्या वाहनांची कठोर तपासणी देखील करण्यात आली. प्रत्येक वाहनाला अमेरिकच्या के-9 अधिकाऱ्यांनी तपासले आहे.
पेंसिल्वेनियाच्या बटलर शहरात 3 महिन्यांपूर्वी आयोजित सभेदरम्यान ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाला होता. तर 16 सप्टेंबर रोजी देखील ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. फ्लोरिडाच्या पाम बीच काउंटीच्या इंटरनॅशनल गोल्फ क्लबमध्ये ट्रम्प असताना सीक्रेट सर्व्हिस एजंटला झुडूपांमध्ये एक इसम शस्त्रास्त्रांसोबत दिसून आला होता.