बनावट सोन्याची बिस्किटे विकणाऱ्यांचा डाव उधळला
कराड :
शहरात मोठ्या प्रमाणावर बनावट सोन्याची विक्री करण्याचा प्रयत्न उधळून लावत कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने तिघा भामट्यांच्या मुसक्या आवळल्या. मंगळवारी रात्री गजानन हाऊसिंग सोसायटी येथे सलग अडीच तास सापळा रचून बसलेल्या पोलिसांनी हा डाव उधळून लावत तब्बल बनावट 11 सोन्याची बिस्किटे हस्तगत केली आहेत. दरम्यान, ज्या सराफाचा विश्वासघात करून त्याला गंडा घालण्याचा संशयितांचा प्रयत्न होता, त्या सराफाने दाखवलेले प्रसंगावधानही कौतुकास्पद ठरले. आसिफ अकबर मुल्ला (वय 36, व्यवसाय ज्वेलर्स शॉप, रा. मुजावर कॉलनी, कराड) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
आसिफ मुल्ला यांचे मुजावर कॉलनी येथे ज्वेलर्सचे दुकाने आहे. एक अनोळखी इसम त्यांच्या दुकानात आला त्याने आपले नाव गोविंद एकनाथराव पदातुरे (रा. भुतेकरवाडी, ता. अहमदपूर, जि. लातूर) असल्याचे सांगितले.
- सोन्याच्या बिस्किटाचे तुकडे दाखवत टाकले जाळे
गोविंद पदातुरे या संशयिताने आसिफ यांना आपण स्वत:ही सोनार असून फिरता व्यापार करतो. माझ्याकडे 500 ग्रॅम 24 कॅरेटचे सोने विक्रीसाठी आहे, अशी बतावणी केली. त्याने बिस्किटासारखे सोन्याचे तुकडे प्लास्टिकच्या पिशवीतून दाखवून आसिफ मुल्ला यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, इतक्या मोठ्या व्यवहारासाठी तो अनोळखी इसम दूरवरून का आला असावा, असा प्रश्न आसिफ यांच्या मनात आला. त्यांना यामध्ये काही तरी काळेबेरे असल्याचा संशय आल्याने त्यांनी सतर्कता बाळगत संशयिताशी बोलणे सुरू ठेवले. त्याला गाफिल ठेवत आसिफ यांनी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेतील मोहसीन मोमीन यांना हा प्रकार कळवला.
- पोलिसांनी फिल्मीस्टाईलने रचला सापळा
सोन्याची बिस्किटे विकण्यासाठी एक संशयित कराडच्या व्यापाऱ्याकडे आल्याची माहिती मोमीन यांनी पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांना माहिती दिली. यानंतर पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या सूचनेनुसार सापळा रचण्यात आला. ताशिलदार यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांच्यावर अत्यंत गोपनीय सापळा रचण्याची आणि संशयितांना गजाआड करण्याची मोहीम सोपवली. भापकर यांनी शाखेतील मोमीन यांच्यासह दिग्विजय सांडगे, संग्राम पाटील, संतोष पाडळे, अमोल देशमुख, मुकेश मोरे, सज्जन जगताप यांना साध्या वेशात गजानन हाऊसिंग सोसायटीत जिथे व्यवहार होणार होता, तिथे वेगवेगळ्या ठिकाणी तैनात केले. यावर करडी नजर ठेवण्यासाठी स्वत: अशोक भापकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारू, निखिल मगदूम हे फेरफटका मारत लक्ष ठेवून होते.
- अर्धा किलो सोने...50 लाखांना
संशयिताने त्याच्याकडे 24 कॅरेटची अर्धा किलो सोन्याची बिस्किटे असल्याचे सांगत बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत 50 लाख सांगितली. पण पैशाची गरज असल्याने ती तुम्हाला कमी पैशात देतो. विश्वास ठेवा मला पैशाची गरज आहे असे सांगत आसिफ मुल्ला यांना सोने विकत घेण्याची गळ घालण्याचा प्रयत्न केला. आसिफ यांनी बाकीचे सोने कोठे आहे, अशी विचारणा केली. यावर संशयिताने गजानन सोसायटीत माझ्या मित्राकडे जाऊन पुढचे ठरवू, असे सांगितले. आसिफ मुल्ला हे त्यांच्या दुचाकीवरून संशयित पदातुरे याला घेऊन गजानन सोसायटीत गेले. गणेश मंदिरासमोर दुचाकी थांबल्यावर तिथे अगोदरच सर्जेराव आनंदा कदम (वय 36, रा. पिसाद्रि, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर), अधिक आकाराम गुरव (रा. म्हासुर्णे, ता. खटाव, जि. सातारा) हे दोन संशयित येऊन थांबले होते.
- व्यवहाराची बोलणी सुरू होताच पोलिसांची झडप
आसिफ मुल्ला यांच्याशी तीन संशयितांनी बोलणी सुरू करत त्यांनी 500 ग्रॅम वजनाची सोन्याची दहा बिस्किटे आहेत, असे सर्जेराव कदम याने सांगितले. आम्हाला आजच ही बिस्किटे विकायची असून कमी पैशात द्यायला आम्ही तयार आहोत. आम्हाला रक्कम आजच्या आजच हवी असल्याचे सांगितले. रात्री साडेआठ वाजेपर्यंत ही बोलणी सुरू होती. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे दिग्विजय सांडगे, संग्राम पाटील, अमोल देशमुख यांच्यासह अन्य बोलणी सुरू असलेल्या ठिकाणी घुटमळत होते. त्यांनी संशयितांना काहीही कळू न देता अचानक तिघांच्यावर झडप टाकून त्यांना पकडले. यानंतर बाकीचे अधिकारी व पोलीस वेगाने त्या ठिकाणी आले. सर्वांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी तीन संशयितांची झाडाझडती घेतली. या कारवाईचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधिक्षक वैशाली कडूकर, पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी अभिनंदन केले.
- बिस्किटे खोटी...संशयितांची झाडाझडती
पोलिसांनी गोविंद एकनाथराव पदातुरे, सर्जेराव आनंदा कदम, अधिक आकाराम गुरव यांना ताब्यात घेत पंचासमक्ष त्यांची झडती घेतली. झडतीमध्ये सर्जेराव कदम याच्या खिशात ‘100 जी’ असे इंग्रजीत लिहलेली 5 बिस्किटे मिळून आली तर अधिक गुरव याच्या खिशातही अशी पाच बिस्किटे मिळून आली. पोलिसांनी तात्काळ एक सोनार बोलावून बिस्किटांची पंचासमक्ष तपासणी केली. कसोटीवर घासून अॅसिड टाकून पाहिल्यावर हे बनावट असल्याचे लक्षात येताच संशयितांचा डाव उधळला गेला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी संशयितांची झाडाझडती घेतली.