For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अंजनेयनगर गावातील विद्यार्थ्यांचे रस्त्याविना हाल

10:59 AM Aug 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
अंजनेयनगर गावातील विद्यार्थ्यांचे रस्त्याविना हाल
Advertisement

गुडघाभर चिखलातून नागरिकांचीही रोज पायपीट : प्रशासनाचे गावच्या विकासाकडे दुर्लक्ष

Advertisement

खानापूर : तालुक्यातील बिडी-कित्तूर रस्त्यावर असलेल्या अंजनेयनगर गावातील नागरिकांचे आणि विद्यार्थ्यांचे रस्त्याविना हाल होत आहेत. सध्या पावसाळा सुरू असल्याने विद्यार्थ्यांना गुडघाभर चिखलातून तीन कि. मी. चालत यावे लागत आहे. गेल्या 40 वर्षापासून हे विस्थापित लोक अनेक सुविधांपासून वंचित आहेत. मात्र सरकार आणि लोकप्रतिनिधी यांनी मूलभूत सुविधा पुरविण्यात साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. विस्थापितांचे कधीच योग्य नियोजन करून न्याय देण्यात न आल्याचे उत्तम उदाहरण आहे.चाळीस वर्षापूर्वी हिडकल डॅम धरणाच्या क्षेत्रातील गावांचे स्थलांतर करण्यात आले. तालुक्यात अनेक ठिकाणी ही गावे बसवण्यात आली आहेत. यातील एक गाव सुरपूर-केरवाड (हिडकल) हे विस्थापितांचे नव्याने पुनर्वसन करण्यात आलेले गाव. या गावची शेती हिडकलपासून तीन कि. मी. दूर असल्याने त्यातील चाळीस कुटुंबांनी शेतातच आपली घरे बांधली. आणि अंजनेयनगर असे या नगराचे नामकरण करण्यात आले. ही चाळीस कुटुंबे अद्याप अनेक मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. त्यातील मुख्य सुविधा म्हणजे दळणवळणासाठी रस्ताच करून देण्यात आलेला नाही. पावसाळ्यात या संपूर्ण तीन कि. मी. रस्त्यावर चिखल होत असतो. या चिखलातूनच विद्यार्थी आणि ग्रामस्थांना ये-जा करावे लागते.

अंजनेयनगर येथील जवळपास शंभर विद्यार्थी शाळेसाठी सुरपूर-केरवाड येथे चालत येतात. या विद्यार्थ्यांना चिखलातूनच चालत जावे लागत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही शाळकरी मुले आपल्या शाळेसाठी अक्षरश: गुडघाभर चिखलातून एकमेकाला धरुन मार्गक्रमण करतात. प्राथमिक शाळेचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या रस्त्यावरील चिखलातून वाटचाल करून शाळेसाठी जातात. स्वातंत्र्याची 75 वर्षे होऊन देखील गावातील नागरिकांना विकासाची फळे चाखता येत नाहीत. तसेच विस्थापित म्हणून यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे. चाळीस वर्षे होऊनदेखील या विस्थापितांची पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या विस्थापितांवर शासनाकडून अन्यायच होत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे. लोकप्रतिनिधीनी आणि ग्रा. पं.ने  रस्त्याच्या विकासासाठी अनुदान मंजूर करावे, अशी मागणी अंजनेयनगर येथील विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी केली आहे.

Advertisement

टप्प्याटप्प्याने रस्त्याच्या विकासासाठी निश्चित प्रयत्न

याबाबत ग्रा. पं. चे अध्यक्ष मल्लेशी तेगूर यांना विचारले असता ते म्हणाले, तीन कि. मी.चे अंतर असल्याने एकाचवेळी या रस्त्याचा विकास करणे शक्य नाही. टप्प्याटप्प्याने ग्रा. पं. च्या माध्यमातून रस्त्याच्या विकासासाठी निश्चित प्रयत्न करण्यात येतील. यावर्षी निम्मा रस्ता करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे ते ‘तरुण भारत’शी बोलताना म्हणाले.

Advertisement
Tags :

.