किम्समधील दुरवस्थेला डॉ. गजानन नायक जबाबदार
पालकमंत्री मंकाळू वैद्य, आमदार सतीश सैल यांच्या उपस्थितीत डॉक्टरांची तक्रार
कारवार : येथील किम्स (कारवार इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स) मधील दुरवस्थेला किम्सचे संचालक डॉ. गजानन नायक जबाबदार असल्याची तक्रार कारवार जिल्हा पालकमंत्री मंकाळू वैद्य व कारवार-अंकोलाचे आमदार सतीश सैल यांच्या उपस्थितीत किम्समधील डॉक्टरांनी केली. वैद्य आणि सैल यांच्या उपस्थितीत बुधवारी किम्समधील कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी डॉक्टरांनी संचालक डॉ. नायक यांच्याबद्दलच्या तक्रारीचा पाढाच वाचून दाखविला. त्यामुळे मंत्री वैद्य व आमदार सैल काही वेळ अवाक् झाले. यावेळी काही डॉक्टरानी, संचालक नायक यांच्याकडे सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली तर संचालकांच्याकडून मागण्यांची दखल घेतली जात नाही. अशी तक्रार केली. संचालक नायक यांची किम्समधील नेमणूकच बेकायदेशीर असल्याचा आरोप काही ज्येष्ठ डॉक्टरांनी आणि विद्यार्थ्यांनी यावेळी केला. इतकेच नव्हे तर संचालक डॉ. नायक यांच्याकडून ज्येष्ठ डॉक्टरांचा छळ केला जातो, असे सांगण्यात आले. त्यामुळे किम्सच्या सेवेत रूजू होण्यास कुणाची तयारी नसते असे मंत्री आणि आमदारांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत संचालकांच्या कार्यपद्धतीवरच अधिक चर्चा झाली. मंत्री आणि आमदार किम्समधील दुरवस्थेबद्दल आणि किम्सच्या प्रशासनातील गोंधळ पाहून अवाक् झाले होते.