विषयांतून मिळणारी सुखे दु:खदायक असतात
अध्याय चौथा
बाप्पा म्हणाले, बाह्य गोष्टीतून कायम टिकणारे सुख मिळत नसल्याने त्यांचा नाद सोडून स्वत:च्या आत्म्याच्या ठिकाणी स्थिर असलेल्या ईश्वराची प्राप्ती करून घेतल्यास कायम टिकणारे सुख मिळते. जो ईश्वराशी संधान साधून असतो, नामस्मरणाने त्याच्या संपर्कात असतो त्यालाच कायम टिकणाऱ्या सुखाची प्राप्ती होते. त्यासाठी देहाभिमान, ज्ञानाभिमान सोडावे लागतात. तसे केले की, बाह्य गोष्टींची आवड कमी होते व आपल्यातल्या ईश्वराचे अस्तित्व जाणवू लागते. देहाचे महत्त्व कमीकमी होऊ लागते. सुखदु:खाची तीव्रता कमी होते. इतरही आपल्यासारखे ईश्वररूप आहेत हेही लक्षात येऊ लागते. त्यामुळे आपपर भाव गळून पडतो. जो ह्या पद्धतीने ईश्वर प्राप्तीसाठी प्रयत्न करतो त्याची संपूर्ण जीवनशैली बदलून जाते. त्याच्या जीवनातून दु:ख कायमचे हद्दपार होते आणि आनंदाची करंजी थुईथुई उडू लागतात. बाह्य गोष्टीतून कायम टिकणारे सुख मिळत नाही हे बाप्पांनी किती जरी सांगितलं किंवा संत साहित्यातून वाचलं तरी ते माणसाच्या गळी सहजी उतरत नाही. त्यामुळे तो ते एका कानाने ऐकतो आणि दुसऱ्या कानाने सोडून देतो. एव्हढेच नव्हे तर बाह्य गोष्टीतून सुख मिळवण्याचा पुन्हा दुप्पट जोमाने प्रयत्न करू लागतो. त्याच्या ह्या स्वभावाला आळा बसावा म्हणून बाप्पा बाह्य गोष्टीतून मिळणाऱ्या सुखाबद्दल आणखी एक महत्त्वाची गोष्ट पुढील श्लोकात सांगत आहेत. ती अशी की, विनाशी वस्तूतून मिळणारं सुख हे शेवटी दु:खदायक असतं
विषयोत्थानि सौख्यानि दु:खानां तानि हेतवऽ ।
उत्पत्तिनाशयुक्तानि तत्रासक्तो न तत्त्ववित् ।।22।।
अर्थ- विषयांपासून उत्पन्न होणारी सुखे दु:खांना कारण होतात, ती उत्पत्ती व नाश यांनी युक्त आहेत. तत्त्ववेत्ता त्यांचे ठिकाणी आसक्त नसतो.
विवरण- बाप्पा म्हणाले, ईश्वर सोडून ज्या ज्या गोष्टीत मन रमतं ते सगळे विषय समजावेत. माणसाचं मन बाह्य गोष्टीत देवापेक्षा जास्त रमतं आणि त्यातून सुख मिळवण्याच्या प्रयत्नात तो असतो कारण तसे ते मिळते अशी त्याला खात्री वाटत असते. त्यामुळे बाह्य गोष्टीतून मिळणारे सुख शेवटी दु:खच देते हे माझे सांगणे थोडे विचित्र वाटेल पण ते खरे आहे. कसे ते सांगतो. विनाशी असलेल्या वस्तू, व्यक्ती वा परिस्थिती यातून काही काळ सुख मिळतं हे बरोबर आहे. ते तसंच मिळत रहावं अशी प्रत्येकाची इच्छा असते पण सुख देणाऱ्या बाह्य गोष्टी ह्या नाश पावणाऱ्या असल्याने एकतर त्या नष्ट होतात किंवा बदलत जातात आणि त्यातून मिळणारे सुख संपते. असं घडलं की, मनुष्य दु:खी होतो. तसेच वस्तू, व्यक्ती आणि परिस्थिती अनुकूल असल्या तर माणसाला त्यातून काही काळ सुख मिळते. तसे ते आणखीही मिळावे किंवा मिळतंय तेव्हढे तरी सतत मिळत रहावे अशी त्याची अपेक्षा असते पण परिस्थिती सारखी बदलत असल्याने सुख देणाऱ्या अनुकूल गोष्टी प्रतिकूल होत असतात. असे झाले की, तो दु:खी होतो. म्हणून मी म्हणतोय की, विषयांपासून उत्पन्न होणारी सुखे शेवटी दु:खच देतात. संत रामदासस्वामी त्यांच्या करुणाष्टकात म्हणतात,
‘विषयजनित सूखें सौख्य होणार नाही । तुजविण रघुनाथा वोखटें सर्व कांही? रघुकुळटिळका रे हीत माझें करावें । दुरित दुरि हरावें सस्वरूपीं भजावें ।। 3 ।। स्वामी म्हणतात खरं सुख हे रामरायाच देऊ शकतो कारण बाकी सर्व गोष्टी नाशवंत असल्याने खोट्या आहेत. ज्ञानेश्वर माउली विषयातून सुख मिळणे ह्या गोष्टीची तुलना मृगजळाशी करतात. ते म्हणतात मृगजळ पिऊन कुणाची तहान भागली आहे काय? ज्याप्रमाणे पाण्यासाठी तहानलेले हरीण मृगजळाच्या पाठीमागे लागून तहानेने व्याकूळ होऊन तडफडून मरते, त्याप्रमाणे विषयातून सुख मिळवण्याच्या प्रयत्नात मनुष्य घायकुतीला येऊन निराश होतो.
क्रमश: