शिक्षणात संगीताचे स्थान
साहित्य संगीत कला विहिन
साक्षात् पशु पुच्छ विषाण हिण:
साहित्य, संगीत आणि कला यापैकी कशाचीही आवड नसलेला मनुष्य हा शिंगं आणि शेपूट नसलेला पशुच आहे, असं म्हटलं जातं.
सुदैवाने गोव्यात सर्वसामान्य माणसालाही संगीतात गोडी दिसते. ‘गाणारा गोवा’ असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. खेड्यापाड्यातसुद्धा संगीताचे भरपूर कार्यक्रम होत असतात. प्रत्येक शाळेसाठी स्वतंत्र संगीत शिक्षकांची नियुक्ती झाली आहे. मुलांच्या प्रतिभेचं दर्शन घडतं. पण शिक्षणात संगीताचं काय स्थान आहे, हे क्वचित समजून घेतलं जातं. शालेय प्रार्थना, स्वागतगीत, समूह गीतं, स्पर्धेसाठी गानसमूह तयार करणे, हे सारं होत असतं. पण अजूनही संगीत म्हणजे सहशालेय उपक्रम अशीच धारणा आहे. संगीत शिक्षक काही प्रार्थना, गाणी ‘बसवतात’ इतकंच. संगीताचा शिक्षणाशी काय आणि कसा संबंध, हे जाणण्यात त्यांना रस नसतो. व्यवस्थापन मंडळ, बहुसंख्य मुख्याध्यापक आणि शिक्षकांनाही गणित, इंग्रजी, विज्ञानाइतकंच संगीतही महत्त्वाचं आहे, असं वाटत नाही. वेळ, स्थान, अन्य व्यवस्था या बाबतीतही संगीत कसं तरी ‘अॅडजस्ट’ (चलता है) केलं जातं.
वास्तविकपणे संगीताने अध्यापनाला अनुकूल मानसिकता निर्माण होते. संगीताचं अनन्यसाधारण महत्त्व शिक्षण क्षेत्राशी सर्वांनीच समजून घेतलं पाहिजे. आईच्या गर्भात असतानापासून शिशुवर संगीताचे चांगले परिणाम होत असतात. मुंबई विद्यापीठाच्या पूर्व कुलपती डॉ. स्नेहलता देशमुख यांचा या विषयावर खूप अभ्यास आहे. मुलांपाशी बुद्धिमत्ता भरपूर आहे. पण एकाग्रता कमी आहे. संगीतामुळे एकाग्रता वाढू शकते. अनेक वैज्ञानिक, शिक्षणतज्ञ, संशोधकांनी यासंबंधी संशोधन आणि प्रयोग केले आहेत.
आय.आय.टी. कानपूरच्या ह्युमॅनिटिज अॅण्ड सोशल सायन्स विभागाचे प्रमुख प्रो. ब्रजभूषण यांनी इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विभागाच्या मदतीने चाळीस मुलांचं परीक्षण तीन वर्षे केल्यावर विद्यालयातील संगीतमय प्रार्थनेने एकाग्रता वाढते, असा निष्कर्ष काढला आहे. आंतरराष्ट्रीय जर्नल नेचरमध्येही त्यांचा शोधनिबंध प्रकाशित झाला आहे. त्यांनी आता पेटंटसाठी अर्ज केला आहे. केंद्रीय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांवर हा प्रयोग करण्यात आला. संगीत सुरू करण्यापूर्वी मस्तकावर इलेक्ट्रोड लावून इलेक्ट्रो एन्सेफ्लोग्राम (ई.ई.जी) चाचणी केली. त्यानंतर राग दरबारी ऐकवला गेला. दहा मिनिटे हा राग ऐकवल्यानंतर परत ईईजी करण्यात आला. न्यूरोमीटरवर न्यूरोन्समध्ये बदल जाणवला. आनंद, शांतीचा अनुभव देणाऱ्या अल्फा तरंगांचा स्तर 8-12 पासून 15 हर्ट्झवर गेल्याचे दिसून आले. त्याचबरोबर उग्रता, अशांती, तणाव वाढविणारे बीटा तरंग 12-27हून खाली आले. मेंदूच्या पुढच्या भागात संचार आणि सक्रियता दोन्हीत वाढ झालेली दिसून आली.
कॅनडाच्या मेक्मास्टर विद्यापीठातील ‘इन्स्टिट्यूट फॉर म्युझिक अॅण्ड द सायन्स’ विभागाच्या लारेल ट्राइनोर ओंटारियोने मेंदूच्या क्षमता वाढीसाठी एक वर्ष संगीताचा प्रयोग केला. जे विद्यार्थी या प्रशिक्षणात सहभागी झाले होते, त्यांच्या मेंदूची क्षमता ज्यांनी या प्रशिक्षणात भाग घेतला नव्हता त्यांच्या तुलनेत जास्त विकसित झाली होती. एक वर्षानंतर हा फरक स्पष्टपणे दिसला. परंतु याची सुरुवात प्रशिक्षणाच्या चौथ्या महिन्यातच दिसू लागली होती. ही मुलं तीव्र बुद्धिमत्तेची आणि असामान्य स्मरणशक्तीची झाली होती. त्यांच्या वागणुकीतही खूप बदल जाणवला.
लंडन विद्यापीठातील ‘इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन’ या संस्थेच्या शिक्षण आणि संगीत मानसशास्त्राच्या प्राध्यापक सुसान हॅलाम यांनी सात ते दहा वर्षे वयाच्या मुलांमध्ये संगीताद्वारे प्रयोग केले. यात 26 प्राथमिक शाळांतील साडेचार हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. यात प्रामुख्याने मुलांची ऐकण्याची क्षमता, संगीताचे ज्ञान व विकास, एकाग्रता, महत्त्वाकांक्षा, स्वयंशिस्त, वैयक्तिक व सामाजिक कौशल्य तपासली गेली. त्यात विकास झाल्याचे लक्षात आले.
आईच्या उदरातील भ्रूणदेखील विशिष्ट संगीतामुळे सुखावते आणि जन्मानंतर ते संगीताचा आनंद घेऊ लागते, असे जर्मन तज्ञ मायकेल मार्कवर्ट म्हणतात. लहान मुलंही गाणं ऐकण्यासाठी कान टवकारतात. ताल धरतात आणि चालू लागली की, टाळ्या वाजविणे, लयबद्ध पावले टाकणे, ताल धरणे अशा क्रिया करू लागतात. म्हणूनच शिशुवाटिकेतील मुलांना तालबद्ध गाणी शिकविली पाहिजेत. ड्रम, घंटा, घुंगरू यांच्या तालावर त्यांना रमू दिलं पाहिजे. मेंदूतील भाषा केंद्रे विकसित होण्यात संगीताचा मोठा हातभार असतो. त्यामुळे ज्या घरात संगीत या ना त्या स्वरुपात गुंजत असते, त्या घरातील मुलं लवकर बोलूं लागतात. त्यांच्या चलनवलन क्रिया सुधारतात. स्वरांची ओळख, गाण्यांचे शब्द यामुळे मुलांची स्मृती चांगली होते.
डॅनियल गोलमनने बहुआयामी बुद्धिमत्तेचा (मल्टिपल इंटेलिजन्स) सिद्धांत मांडला. या सिद्धांतानुसार प्रत्येक व्यक्तीपाशी आठ प्रकारची बुद्धिमत्ता असते. ही निसर्गदत्त देणगी प्रत्येकाजवळ कमी-अधिक प्रमाणात असते. सांगीतिक बुद्धिमत्ता किंवा सांगीतिक प्रवृत्ती ही त्यापैकी एक. एखाद्याजवळ गणिती बुद्धिमत्ता अधिक तर संगीतासारख्याच इतर बुद्धिमत्ता तुलनेने कमी असू शकतात. या सर्व अंगांचा विकास करणे, हे शिक्षणाचे उद्दिष्ट आहे. हे कष्टसाध्य आहे. म्हणजे जे निसर्गाने दिलं आहे, ते प्रयत्नपूर्वक विकसित करता येतं. (नेचर अॅण्ड नर्चर).
संवेदना, संस्कार, वातावरण निर्मिती, अभ्यास यांनी सांगीतिक प्रवृत्ती (बुद्धिमत्ता) विकसित होते. जितकी सांगीतिक प्रवृत्ती विकसित होईल, तेवढी मनाची एकाग्रता वाढेल. ताण कमी होईल. चंचल मन स्थिर होईल. शिक्षणासाठी संगीत, योग, शारीरिक शिक्षण, संस्कृत आणि नैतिक शिक्षण हे आधारभूत विषय आहेत. संगीतामुळे थकवा दूर होऊन उत्साह वाढतो, असं केमसिस या शिक्षणतज्ञाचं मत आहे. आज बुद्ध्यांकाबरोबरच भावनांक (ईक्यू) हा महत्त्वाचा आहे, असा अनुभव आहे. त्यासाठी संगीत मोठं मोलाचं काम करतं. संगीताच्या अभ्यासाने इतर विषयांतही प्रगती होऊ शकते. संगीत सर्व शिक्षणास समर्थन देतं असं म्युझिक टुगेदरचे सहसंस्थापक केनेथ गिलमार्टिन यांना वाटतं.
संगीत एकाचवेळी डावा आणि उजवा मेंदू सक्रिय करते, आणि दोन्ही गोलार्धांच्या सक्रियतेमुळे स्मरणशक्ती सुधारते, असं राष्ट्रीय विद्यापीठातील विवाह आणि कौटुंबिक विज्ञान विभागातील प्राध्यापक डॉ. माशा गोडकीन यांचं मत आहे. अनेक मुलं लाजरी, बुजरी असतात. त्यांना कोषातून बाहेर काढण्याची गरज असते. संगीताच्या मदतीने हे साध्य होऊ शकतं. डॉ. शिनीची सुझूकी हे एक प्रसिद्ध जपानी संगीत शिक्षक. त्यांनी ‘मातृभाषेत संगीत शिक्षण’, ‘वयानुरुप वाद्याची निवड’ आणि ‘मुलांच्या आजूबाजूच्या वातावरणाचा संगीत शिक्षणावर परिणाम’ ही तीन तत्त्वे
मांडली.
ते म्हणतात, जर मुले लहानपणापासून संगीत ऐकत असतील तर आपोआपच संवेदनशील, शिस्तबद्ध, प्रामाणिक, दुसऱ्यांच्या भावना जपणारी, जबाबदार नागरिक बनतील. डॉ. जॉर्ज लोझॅनोव्ह या बल्गेरियन शास्त्रज्ञाने परकीय भाषा कमी वेळात शिकण्यासाठी संगीताचा यशस्वी प्रयोग केला.
तानसेन किंवा भीमसेन बनला नाही तर कानसेन जरूर बनता येईल.
संगीत म्हणजे ‘भाषेचे ज्ञान होण्याआधीची भाषा’।
- प्रा. दिलीप वसंत बेतकेकर