For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुमुक्षु आवर्जून निरपेक्षतेने कर्मे करतात

07:00 AM Sep 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
मुमुक्षु आवर्जून निरपेक्षतेने कर्मे करतात
Advertisement

अध्याय तिसरा

Advertisement

ईश्वराला नेहमीच कर्ताकरवीता असे म्हंटले जाते पण मनुष्यच कळतनकळत आपल्या पुढील जन्मात आपल्याला कोणती कर्मे करावी लागतील किंवा कोणते भोग भोगावे लागतील याची जुळणी करून ठेवत असतो. चालू जन्मातील स्वार्थापायी त्याला या सगळ्याचा विसर पडतो आणि तो सहजी गैरकृत्ये करतो. म्हणून आपला कर्ताकरविता ईश्वर नसून आपण स्वत:च आहोत हे आपण लक्षात घ्यायला हवे. आपणच जर कर्तेकरविते आहोत तर पुढील जन्माची जुळणी करण्याचे आपण टाळू शकतो. त्यासाठी आपल्या वाट्याला आलेले कर्म फळाची अपेक्षा न करता करत रहायला हवे तसेच कर्म करण्याच्या सुरवातीला, ते करत असताना आणि करून झाल्यावर ईश्वराचे स्मरण करत रहावे.

असं असलं तरी देवाला कर्ताकरविता समजतात ते कसं? ते पाहूयात. आपल्या सध्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना आपलीच पूर्वकर्मे ठरवत असतात व त्यानुसार आपण भोग भोगत असतो. ते भोग भोगत असताना त्रास असह्य झाला की, आपण अत्यंत दु:खी कष्टी होऊन ईश्वराला त्यातून सोडवण्यासाठी आर्तपणे हाका मारत असतो. त्याची आळवणी करत असतो. ईश्वराला आपली दया येते पण आपले भोग आपणच तयार केले असल्याने तो त्यात बदल करू शकत नाही पण सुसह्य होतील असं करतो. त्या दृष्टीने कुणाच्या ना कुणाच्या रूपात येऊन मदत करतो. ही गोष्ट आपल्याला त्याची लीला वाटते आणि म्हणूनच आपण त्याला कर्तकरविता असं म्हणतात.

Advertisement

काम कोणतंही असो ते निरपेक्षतेनं करावं असं बाप्पा सांगतात. कर्मफलाच्या अपेक्षेने केलेल्या कामातून माणसाला अनेक आशा, अपेक्षा असतात जर त्या पूर्ण झाल्या तर ठीक अन्यथा अपूर्ण राहिलेल्या अपेक्षा पूर्ण करून घेण्यासाठी त्याचा पुनर्जन्म होतो. संपूर्ण निरपेक्षता लगेच साध्य होत नाही म्हणून मनुष्य जेव्हढ्या निरपेक्षतेनं काम करेल तेव्हढ्या प्रमाणात त्याचा पुढील जन्म सुसह्य होईल व पुढील जन्मीही तो अधिक निरपेक्षतेनं काम करू लागेल. हे तत्व जो लक्षात घेईल त्याला हे कळून चुकेल की आपले कर्तेकरविते आपणच आहोत. आपल्या अडीअडचणीला ईश्वर केवळ आपल्या प्रेमापोटी आणि आपल्या भक्तीचे भुकेले असल्याने धावून येतात ही त्यांची लीला होय. आपण स्वत: अडीअडचणी ओढवून घेत असतो हे जो लक्षात घेईल तो स्वत:हूनच निरपेक्षतेने कर्म करून बाप्पांना प्रिय होईल. अर्थात स्वत: बाप्पा अशा पद्धतीने कर्म करून आपल्यापुढे आदर्श ठेवत आहेत हे पुढील श्लोकातून स्पष्ट होते.

निरीहं यो भिजानात कर्म बध्नाति नैव तम् ।

चक्रु कर्माणि बुद्ध्यैवं पूर्वं पूर्वं मुमुक्षव ।।20।।

अर्थ- कर्मांपासून उत्पन्न होणाऱ्या गुणांपासून सर्वदा अलिप्त, निरिच्छ अशा मला जाणून जो कर्म करतो तो कर्माच्या बंधनात अडकत नाही, इच्छारहित होऊन मला जो जाणतो त्याला कधी कर्मबंधक होत नाही. हे जाणून पूर्वीच्या कित्येक मुमुक्षूंनी कर्मे केली आहेत.

विवरण- आधीच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे आपले कर्तेकरविते आपणच आहोत हे जाणून तसेच, ईश्वर स्वत: निरिच्छपणे लीला करतात हे लक्षात घेऊन मुमुक्षु कर्मे करतात. आपण चुकीची कर्मे केली आणि करत असलेल्या चांगल्या कर्मातून फळाची अपेक्षा केली की आपल्याला कर्माचे बंधन लागू होते हे लक्षात घेऊन काय करणं योग्य, काय करणं अयोग्य हे ज्याला कळतं त्याला मुमुक्षु म्हणतात. निरपेक्षतेनं कर्म करत गेल्यास कर्माचं बंधन बाधत नाही. प्रत्येक पुढील जन्मात त्याची उन्नती होत होत एक ना एक दिवस त्याचं परमात्म्याशी मिलन होतं. आत्म्याचे परमात्म्याशी मिलन होणे हा उत्तम योग. तो आपल्या जीवनात यावा हा श्रीगणेशगीतेचा मुख्य उद्देश. त्यादृष्टीने वाटचाल करणे हे आपल्या सर्वांचे उद्दिष्ट असल्यास आपण बाप्पांना प्रिय होऊ ह्यात शंका नाही.

Advertisement
Tags :

.