खांब गंजलेला... पर्यटकांनी गजबजलेला
या जगात पाहण्यासारखे बरेच काही आहे. काही निसर्गरम्य आहे. काही आश्चर्यकारक आहे. काही विस्मयकारक आहे. तर काही मानवनिर्मित आहे. या साऱ्यांचे दर्शन करण्यासाठी पर्यटक प्रतिवर्ष दशकोट्यावधींच्या संख्येने या देशातून त्या देशात जात असतात. पर्यटन हा लाभदायक व्यवसाय आहे. अनेक देशांची अर्थव्यवस्था या व्यवसायावर अवलंबून असते, ही वस्तुस्थिती आहे.
तथापि, अशाही वस्तू आणि स्थाने या जगात आहेत, की जी पाहण्यासाठी लोक का जातात याचा कोणालाही प्रश्न पडावा. सर्वसामान्य दृष्टीने पाहिले तर त्यांच्यात पाहण्यासारखे काहीही नसते. पण त्यांच्या दर्शनासाठी लोक गर्दी करतात. इंग्लंडमध्ये असाच एक लोखंडी खांब आहे. तो दिसावयास काही विशेष आहे, असे नाही. शिवाय तो गंजलेला आहे. पण त्या खांबाची प्रशंसा प्रसार माध्यमांमधून इतकी झालेली आहे, की तो बघायला देशोदेशीचे लोक मोठ्या संख्येने येतात.
हा खांब सिंगरफोर्ड येथे आहे. त्याला पर्यटनाच्या दृष्टीने या परिसरातील चौथे सर्वोत्तम स्थान अशी प्रशस्ती मिळालेली आहे. असे का झाले आहे, हे कोणालाही सांगता येत नाही. पण या खांबाचे फार मोठे ऐतिहासिक महत्व आहे, असे मानणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. काहींनी तर याची तुलना चक्क ईजिप्तमधील पिरॅमिड आणि मेक्सिकोतील इंका संस्कृतीच्या वास्तूंशी केली आहे. मात्र, काही जणांच्या मते या खांबाचे काहीही महत्व नाही. हा केवळ जाहिरातबाजीचा परिणाम आहे. आता खरे काय आणि खोटे काय ? पण म्हणतात ना, ‘दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये’ हेच खरे वाटते.