कुर्मगड बेटावरील नृसिंह देवाच्या यात्रेला उत्साहात प्रारंभ
कारवार : समुद्रातील यात्रा म्हणूनच सुप्रसिद्ध असलेल्या येथून जवळच्या कुर्मगड बेटावरील श्री नृसिंह देवाच्या यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यात्रेनिमित्त सोमवारी हजारो श्रद्धाळू कुर्मगड बेटावर दाखल झाले होते. यात्रेमध्ये गोवा, कर्नाटक, महाराष्ट्रासह अन्य राज्यातील भाविक सहभागी झाले होते. कुर्मगडावर दाखल होण्यासाठी समुद्रातून प्रवास करावा लागतो. यापूर्वीच्या यात्रोत्सवाच्यावेळी लहान, मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. त्याकरिता प्रशासनाने विशेष करून पोलीस खात्याने अनेक खबरदारीचे उपाय हाती घेतले होते. त्यामुळे यावर्षी भाविक निर्विघ्नपणे देवाचे दर्शन घेवून घरी परतले.
श्रद्धाळूंसाठी मच्छीमारी बांधवांनी बैतखोल बंधाऱ्यापासून होडी वाहतुकीची सोय केली होती. मंदिराच्या आणि यात्रेच्या परंपरेनुसार येथून जवळच्या कडवाड येथून वाजत-गाजत सजविलेल्या होडीतून श्रींची मूर्ती कुर्मगडापर्यंत नेण्यात आली. मूर्ती कुर्मगडावरील मंदिरात दाखल झाल्यानंतर अभिषेक, आरती, पूजा, प्रसाद आदी कार्यक्रम पार पडले. श्रींच्या दर्शनासाठी कुर्मगडावर श्रद्धाळूंच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. तुलाभार करणाऱ्या श्रद्धाळूंची संख्याही कमी नव्हती. सोमवारी रात्री श्रींचे वास्तव्य कुर्मगडावर राहणार आहे. रात्री भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवार दि. 14 रोजी सकाळी श्रींचे समुद्रामार्गेच परतीचा प्रवास निघणार आहे.
मच्छीमारी बंद
मच्छीमारी समाजाची श्रीवर अपार श्रद्धा असल्याने मासेमारीसाठी समुद्रात उतरल्यानंतर कुर्मगडावरील नृसिंह देव आपले रक्षण करतो, अशी मासेमारी बांधवांची श्रद्धा आहे. त्यामुळे यात्रेच्या दिवशी मासेमारी बांधव मासेमारी व्यवसाय बंद ठेवून यात्रेच्या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होते. समुद्र किनाऱ्यापासून कुर्मगडापर्यंत श्रद्धाळूंची ये-जा करण्यासाठी शेकडो होड्यांची मोफत सोय केली जाते. अनेक मच्छीमारी बांधव आपली होडी सजविण्यासाठी हजारो रुपये खर्च करतात.