पहिल्या टप्प्याचे चित्र आज होणार स्पष्ट
उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आज शेवटचा दिवस : 14 मतदारसंघात 74 अर्ज अवैध
प्रतिनिधी/ बेंगळूर
प्रलंबित राहिलेल्या बेंगळूर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी शनिवारी उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण झाली आहे. 14 विधानसभा मतदारसंघात एकूण 74 उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सोमवारी शेवटचा दिवस असून निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात राहिलेल्या अधिकृत उमेदवारांची यादी सोमवार सायंकाळपर्यंत जाहीर होणार आहे.
14 लोकसभा मतदारसंघात 300 उमेदवारांचे 419 उमेदवारी अर्ज वैध तर 74 अवैध ठरले आहेत. बेंगळूर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित 32 उमेदवारांच्या 40 अर्जांपैकी 4 अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. 28 उमेदवारांचे 36 उमेदवारी अर्ज वैध ठरले असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने जाहीर केले आहे.
गुढीपाडव्यासह सध्याच्या लोकसभा निवडणुकीचे रिंगणही रंगणार आहे. आतापासूनच प्रमुख राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू केला आहे. रोड-शो आणि जाहीर सभांच्या माध्यमातून आपापल्या कार्यकाळातील विकासकामे लोकांसमोर मांडून मतयाचना करत आहेत. युती केलेले भाजप आणि निजद नेते एनडीए उमेदवारांच्या बाजूने जोरदार प्रचार करत आहेत. तर काँग्रेस नेते आपापल्या उमेदवारांच्यावतीने जोमाने प्रचार करून मते मागत आहेत. त्यामुळे सोमवारनंतर लोकसभा निवडणुकीचा आखाडा रंगणार आहे.