आष्ट्यात अलोट गर्दीत रंगला पिसांचा खेळ
आष्टा :
महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या ग्रामदैवत श्री चौंडेश्वरी देवीच्या भावई उत्सवातील सोमवारी पिसे व कर हे खेळ मोठ्या उत्साहात झाले. हे खेळ पाहण्यासाठी भाविक व नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. दरम्यान रविवारी रात्री दहा वाजता घोडी हा खेळ झाला. घोडी खेळ पाहण्यास रात्री उशीर होवूनही नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
अळुमुळे नंतर रात्री घोडी हा खेळ पारंपारिक पध्दतीने खेळला गेला. दैत्याचा शोध घेण्याकरिता कुंभार, सुतार, चर्मकार, नाभीक, यांच्यासह खेळगडी व मानकरी दिवटयाच्या उजेडात बाहेर पडले. यावेळी सजविलेला लाकडी घोडा व पाठीमागे बोराटीचे शेपुट अशा वेशात कुंभारवाडा व सुतार वाड्यातून घोडा बाहेर पडला. त्यानंतर मारूती मंदिरापासून या खेळास सुरूवात झाली. यावेळी घोडयाची मिरवणुक निघण्यापूर्वी मारूतीच्या देवळाजवळ घोडयाची पुजा करण्यात आली. नंतर विशिष्ट मार्गावरून घोडयाची मिरवणूक काढण्यात आली. घोडा ज्योतिर्लिंग चौकात आल्यानंतर पुजा करण्यात आली.
यानंतर थोरात, पाटील, कुलकर्णी, महाजन यांच्या घरीही घोडयाच्या मानाच्या पुजा झाल्या. VID हा खेळ म्हणजे, देवी घोडयावरून दिवटयाच्या उजेडात दैत्याचा शोध घेते.
सोमवारी भावई उत्सवातील पिसे हा खेळ मोठ्या उत्साहात व प्रचंड गर्दीत पार पडला. या खेळात एकूण पाच पिसे असतात. गुरव, कुंभार, नाभीक वगैरे मंडळी पिसे होतात. दुपार पासून सायंकाळपर्यंत ही पिसे हिंडत असतात.
देवीच्या सैन्याने पिशाच्छाचे रूप घेवून गावातील घरोघरी दैत्याचा शोध घेतल्याचे कथानक या खेळामधून दाखविले जाते. दोन कुंभार, दोन नाभीक, व एक गुरव असे पाच पिसे असतात. काळी तोंडे, चित्रविचित्र रंगाचे अंगावर पट्टे, कंबरेला बैलाच्या गळ्यातील चाळ, पाठीमागे घंटा, हातात लिंबाच्या पानांचा झुबका, अशा वेशातील पिसे मौनव्रत धारण करून प्रत्येकाच्या घरी जातात व दैत्याचा शोध घेतात. यावेळी ही पिसे आपल्या हातातील लिंबाच्या पाल्याचा झुबका प्रत्येक घराच्या उंबरठ्यावर आपटतात. याप्रसंगी नागरिक त्यांना गुळ, खोबरे, कापूस व पैसे देतात.
सुर्यास्तावेळी सर्व पिसे वेशीतील कर तोडणे या विधीसाठी एकत्र येवून जाळावरून उड्या मारतात. आपल्या हातातील काठीने जाळावरील तोरण तोडण्याचा प्रयत्न करतात. यालाच कर तोडणे असे म्हणतात. पिसे लांब असताना बाजूच्या काठ्या धरणारे लोक आपल्या काठ्या वाकवून तोरण खाली आणतात. पण पिसे जोराने पळत पळत जाळाजवळ आले की, काठ्या नीट उभ्या करून तोरण उंच केले जाते. उंच केल्यावरही पिसाकडून तोरण तोडले जाते. यालाच कर तोडणे अथवा अग्ग्रीदिव्य असे म्हंटले जाते. कर तोडल्यानंतर कुंभारणीची पुजा होते.
यावेळी एक कुंभारणी दमामे, एक गुरव, एक आटुगडे, एक कोरबी अशा पाच कुंभारणी असतात. यावेळी नाभिकांच्या घरी जन्मलेल्या खेळगड्डयांची पुजा होते.
यानंतर सर्वजण थोरात सरकार व पाटील यांच्या घरातील नैवद्य मागून घेवून सर्व मानकऱ्यांसह हरीजन वस्तीत जातात. यावेळी थळाला नैवेद्य दाखवून मानाची पूजा केली जाते. यानंतर खेळगड्डी व मानकरी वाजत गाजत श्री चौंडेश्वरी मंदिराजवळ येतात.
यावेळी शहरातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. शहरातील प्रमुख मार्ग नागरिक व तरूणांच्या गर्दीने फुलले होते. पावसामुळे खेळाला अधिक रंगत आली होती. भावई उत्सवाच्या निमित्ताने शहरातील विविध रस्त्यावर मोठ्या प्रमाणात स्टॉल उभारण्यात आले आहेत. रविवारी दिवसभर पावसाचा शिडकाव सुरू होता. तरीही खेळ पाहण्यासाठी तसेच खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मंगळवारी जोगणी आणि लोट हे खेळ खेळले जाणार आहेत. तर बुधवारी मखोटे आणि पाखरे हे खेळ होणार आहेत.