For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुलाला भेटण्यास पतीला दिलेली मुभाही सहन नाही झाली!

11:59 AM Jan 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
मुलाला भेटण्यास पतीला दिलेली मुभाही सहन नाही झाली
Advertisement

घटस्फोटीत सूचनाने केले पोटच्या गोळ्याचे तुकडे : उच्चशिक्षित, सीईओ सुचना सेठ हिला अटक,अवघ्या काही तासांत कळंगूट पोलिसांची कारवाई 

Advertisement

पणजी : केंद्र सरकारच्या स्टार्ट अप योजनेखालील ‘माईंडफूल एआय लॅब’च्या सहसंस्थापक व सीईओ असलेल्या बेंगळुरू येथील 39 वर्षीय सुचना सेठ या उच्च शिक्षित मातेला स्वत:च्याच चार वर्षांच्या मुलाचा खून केल्याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी काल मंगळवारी कर्नाटकच्या चित्रदुर्ग जिह्यातील आयमंगल पोलिसस्थानकाच्या हद्दीत अटक केली आहे. न्यायालयाने तिच्या पतीला त्यांच्या मुलास आठवड्यात एकवेळ भेटण्याची दिलेली मुभाही सुचनाला सहन झाली नाही, म्हणून तिने मुलाचा खून केल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती उत्तर गोवा पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिली. ट्रांझिट रिमांडवर तिला गोव्यात आणून न्यायालयात हजर केले असता तिला सहा दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

पुन्हा एकदा गोव्याचे नाव बदनाम

Advertisement

या घटनेमुळे गोवा पुन्हा एकदा गुन्हेगारीबाबत राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आला. यापूर्वी सोनाली फोगट हिच्या मृत्यू प्रकरणानेही गोवा बदनाम झाला होता. कुणीही गोव्यात यायचे, पाहिजे तो गुन्हा करायचा आणि जायचे. अशा प्रकारांनी गोव्याचे नाव बदनाम होत आहे. गोवा पोलीस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत निधीन वाल्सन यांच्या सोबत पर्वरी एसडीपीओ उपअधीक्षक विश्वेष कर्पे व अन्य उपस्थित होते. आपल्या घटस्फोटीत पतीला अद्दल घडविण्याच्या इर्षेने सुचना सेठ पेटून उठली होती. त्यात न्यायालयाने तिच्या पतीला या मुलाला आठवड्यातून एक दिवस भेटण्याची परवानगी दिली होती, परंतु तिही सहन न झाल्याने तिने आपल्या चार वर्षीय मुलाचा खून केला आहे.

खोलीत दिसले रक्ताचे डाग

खून केल्यानंतर सुचना आपल्या मुलाचा मृतदेह एका बॅगेत घालून टॅक्सीतून बेंगळुरूला निघाली होती. शनिवारी 6 जानेवारी रोजी दुपारी कांदोळी येथील एका हॉटेलमध्ये आपल्या चार वर्षांच्या मुलासह उतरली होती. सोमवारी सकाळी तिने खोली सोडली. त्यानंतर हॉटेल कर्मचारी खोली साफ करण्यासाठी गेले असता ही खुनाची घटना उघडकीस आली. कर्मचाऱ्याला खोलीत रक्ताचे डाग दिसले आणि त्याने लगेच हॉटेल व्यवस्थापनाला सूचना दिली. हॉटेल व्यवस्थापनाने कळंगुट पोलिसांशी संपर्क साधला.

बेंगळुरुला जाण्यासाठी मागितली टॅक्सी

पोलिसांनी हॉटेलमध्ये जाऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ती आपल्या मुलाशिवाय खोलीतून निघून गेल्याचे त्यांना आढळले. पोलिसांना हा प्रकार संशयास्पद वाटला. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांची चौकशी करता असे उघडकीस आले की,  सुचनाला बेंगळुरु रस्त्याने जायचे होते आणि जाण्यासाठी टॅक्सी हवी होती. टॅक्सीचा प्रवास महागडा ठरेल, त्यापेक्षा विमानाने प्रवास केला तर स्वस्त पडेल, हॉटेल कर्मचाऱ्यांनी तिला सांगितले होते, पण सुचनाने टॅक्सीचा आग्रह धरला आणि कर्मचाऱ्यांनी तिला बेंगळुरूला नेण्यासाठी स्थानिक टॅक्सीची व्यवस्था केली.

पोलिसांना दिला मैत्रिणीचा बनावट पत्ता

कळंगुटचे पोलीस निरीक्षक परेश नाईक यांनी टॅक्सी चालकाचा फोन नंबर घेतला आणि सुचना हिच्याशी संवाद साधला. तिला तिच्या मुलाबद्दल विचारले तेव्हा तिने सांगितले की, तिने त्याला फातोर्डा येथे तिच्या मैत्रिणीच्या घरी सोडले आहे. पोलिसांनी मैत्रिणीचा पत्ता विचारल्यावर तिने तपशील पाठवला. त्यानंतर नाईक यांनी तपशिलाची पडताळणी करण्यासाठी फातोर्डा पोलिसांशी संपर्क केला. मात्र पत्ता बनावट असल्याचे आढळून आले.

चालकाने टॅक्सी नेली पोलिसस्थानकात

निरीक्षक नाईक यांनी पुन्हा टॅक्सी ड्रायव्हरशी संपर्क साधला. नाईक त्याच्याशी कोकणीतून बोलले आणि टॅक्सी जवळच्या पोलीस ठाण्यात नेण्यास सांगितले. तोपर्यंत ते कर्नाटकातील चित्रदुर्ग जिह्यात पोहोचले होते. सुचनाच्या नकळत ड्रायव्हरने टॅक्सी आयमंगल पोलिसस्थानकात नेली. नाईक यांनी आयमंगल पोलीस निरीक्षकांशी संपर्क साधून त्या टॅक्सीतील बॅग तपासण्याची विनंती केली. बॅग उघडली असता चार वर्षांच्या मुलाचा मृतदेह बॅगेत आढळून आला. सुचनाला ताब्यात घेण्यासाठी कळंगुट पोलिसांचे पथक त्यापूर्वीच कर्नाटकला रवाना झाले होते. कळंगुट पोलिसांनी संशयित सुचनाच्या विरोधात गुन्हा नोंद केला होता. कळंगुट पोलिसपथक आयमंगल पोलिसस्थानकात दाखल झाले आणि त्यांनी संशयित सुचना हिला ताब्यात घेऊन गोव्यात आणले. तिच्या नवऱ्याला आणि नातेवाईकांना याबाबत माहिती देण्यात आली असून ते गोव्यात दाखल झाले की त्यांची उलटतपासणी करण्यात येणार आहे. मुलाचा मृतदेह चित्रदुर्ग येथील शवागरात ठेवण्यात आला असून नातेवाईक आल्यानंतर शवचिकित्सा करण्यात येईल आणि नंतर पुढील तपास केला जाईल, असे निधीन वाल्सन यांनी सांगितले.

कौटुंबिक कलाहाचा निष्पाप बळी

मूळ पश्चिम बंगालच्या या सुचना सेठचा विवाह केरळमधील उद्योगपतीशी झाला. कालांतराने त्यांना हा मुलगा झाला. मात्र नंतर पती-पत्नीमध्ये दररोज खटके उडू लागले. सततची चिडचिड आणि मानसिक आरोग्याची होणारी कुचंबणा पाहता दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि झाले सुद्धा. पण चार वर्षीय मुलाचा ताबा कुणाकडे हाही प्रश्न होताच. पुन्हा त्यावरूनही पती-पत्नीमध्ये खटके उडू लागले होते. त्याच वादास कंटाळून सूचना सेठ आपल्या मुलाला घेऊन गोव्यात आली आणि त्या चिमुरड्याचा खून केला.

आर्टीफिशिअल इंटेलिजन्स समस्येवर तोडगा

सुचना इंटेलिजन्स एथिक्स एक्स्पर्ट आणि डेटा वैज्ञानिक असून यामध्ये तिला सुमारे 12 वर्षांचा अनुभव आहे. 2021 मध्ये तिच्या नावाचा 100 प्रभावशाली महिलांच्या एआय एथिक्स यादीत समावेश होता. तिच्या लिंकड् इन खात्यावरील माहितीनुसार तिने हॉवर्ड विद्यापीठाच्या बर्कमन क्लाईन रिसर्च सेंटरमध्ये शिक्षण घेतले. स्टार्टअप आणि उद्योग संशोधन प्रयोगशाळेत आर्टीफिशिअल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धीमत्ता) अध्ययनातील समस्यांवर तोडगा काढणारी कंपनी तिने बेंगळूर येथे स्थापन केली होती.

Advertisement
Tags :

.