महाराष्ट्रातील लोकांनी विकासाला मतदान केले
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची प्रतिक्रिया : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव कायम
डिचोली प्रतिनिधी
महाराष्ट्रातील लोकांनी विकासाला मत दिले आहे. युवाशक्ती, नारीशक्ती, किसानशक्ती व गरीबकल्याणाला लोकांनी उचलून धरले. डबल इंजिनच्या सरकारने महाराष्ट्रात गेल्या 70 वर्षांत न झालेला विकास केला. ही कामे फळाला आली असून लोकांनी त्याचसाठी मतदान केले आहे. महाराष्ट्रात आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव देशाबरोबरच महाराष्ट्रातही या निकालातून दिसून आला आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर व्यक्त केली.
महाराष्ट्रात लोकांनी काँग्रेस, उबाठा, शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना त्यांची जागा दाखवली आहे. त्यांनी वेळोवेळी लोकांमध्ये विभाजन करून राजकारण केले होते. मत हे कोणत्याही आमिषांना किंवा फसव्या आश्वासनांना बळी न मारता समाजकल्याण, साधनसुविधा विकास व मानवी विकास यासाठी मारायचे असते. हे लोकांनी दाखवून देत मतदान केले आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.
महाराष्ट्र तसेच देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांना निवडणूक हरल्यानंतर ईव्हीएम मशीन किंवा निवडणूक यंत्रणांवर टीका करण्याची सवय आहे. परंतु ही जनशक्ती, युवाशक्ती आहे व या जनशक्तीने आपला प्रभाव दाखवून दिला आहे. गोव्यातील अनेक नेते महाराष्ट्रात प्रचारासाठी गेले होते. त्यांच्या कार्यालाही यश आले आहे. मुख्यमंत्री या नात्याने आपणासही महाराष्ट्रात वीस मतदारसंघात प्रचार करण्याची संधी मिळाली. यातील 18 मतदारसंघांमध्ये यश मिळाले आहे. त्यामुळे हा संपूर्ण निकाल मनाला समाधान देणारा आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पुढे म्हटले.