शिखराला दलाई लामांचे नाव, चीनचा जळफळाट
अरुणाचल प्रदेशातील आव्हानात्मक शिखर : निमासच्या पथकाने केले सर
वृत्तसंस्था/ ईटानगर
अरुणाचल प्रदेशच्या तवांगमध्ये एका पर्वतीय शिखराला दलाई लामांचे नाव देण्यात आल्याने चीनचा जळफळाट होत आहे. भारतीय गिर्यारोहण पथकाने अलिकडेच अरुणाचल प्रदेशच्या तवांग क्षेत्रात एका शिखराला दलाई लामांचे नाव दिले आहे. या कृतीमुळे चीनच्या संतापात भर पडली आहे. चिनी क्षेत्रातील ही एक अवैध कृती असल्याचा आरोप ड्रॅगनने केला आहे.
दिरांगमध्ये राष्ट्रीय गिर्यारोहण आणि साहसी खेळ संस्थेच्या 15 गिर्यारोहकांच्या एका पथकाने शनिवारी या शिखरावर यशस्वी चढाई केली होती. पथकाने तवांगमध्ये जन्मलेले सहावे दलाई लामा त्सांगयांग ग्यात्सो (17वी-18 वे शतक) यांच्या सन्मानार्थ याचे नाव ‘त्सांगयांग ग्यात्सो शिखर’ ठेवले आहे.
हे शिखर स्वत:चा कठोर भूभाग आणि अवघड स्थितीसाठी ओळखले जाते. हे शिखर त्सांगयांग ग्यात्सो यांची बुद्धिमत्ता तसेच त्यांच्या शोध घेण्याच्या भावनेचे प्रतीक आहे. हे शिखर पावित्र्य, एकता, साहस अणि भविष्याच्या पिढ्यांसाठी प्रेरणेचे एक मोठे प्रतीक ठरणार आहे. निमासच्या टीमसाठी हे आतापर्यंतचे सर्वात आव्हानात्मक शिखर होते असे उद्गार निमासचे संचालक कर्नल रणवीर सिंह जामवाल यांनी काढले आहेत.
चीन आणि भारत यांच्यात पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सैनिकांना माघारी बोलाविण्याबद्दल काही प्रमाणात सहमती झाल्यावरही चीनने पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेशवर स्वत:चा दावा सांगितला आहे. भारतीय गिर्यारोहकांच्या एका समुहाकडून अरुणाचल प्रदेशात यापूर्वी नावरहित असलेल्या एका शिखराला 6 वे दलाई लामा यांचे नाव देण्यात आले आहे. हा प्रकार अवैध आहे. भारताकडून चिनी क्षेत्रात कथित ‘अरुणाचल प्रदेश’ची स्थापना करणे अवैध आणि निरर्थक असल्याचा कांगावा चीनच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी केला आहे.
भारताची भूमिका
भारतीय सैन्य अॅडव्हेंचर एक्स्पीडिशन्स पाठविते, परंतु याला दुहेरी उद्देशयुक्त प्रयत्नांच्या स्वरुपातही पाहिले जाते. याचा उद्देश अरुणाचल प्रदेशवरील चीनचे दावे फेटाळणे आहे. चीन या भारतीय राज्याला ‘जांगनान’ या नावाने संबोधित असतो. 6 व्या दलाई लामांचे नाव या शिखराला दणे चीनला पसंत पडलेले नाही. सहाव्या दलाई लामांच्या नावाची निवड त्यांची कालातीत बुद्धिमत्ता आणि मोनपा समुदाय आणि त्याच्यावरील त्यांच्या मोठ्या योगदानासाठी एक श्रद्धांजली असल्याचे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
15 दिवसांत पूर्ण केले अभियान
एनआयएमएएसचे संचालक कर्नल रणवीर सिंह जामवाल यांच्या नेतृत्वात अभियान पथकाला 6,383 मीटर उंच शिखर सर करण्यासाटी 15 दिवसांचा कालावधी लागला आहे. संरक्षण जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कर्नल एम. रावत यांच्यानुसार हे शिखर तांत्रिक स्वरुपात क्षेत्रातील सर्वात आव्हानात्मक आणि नावरहित शिखरांपैकी एक होते. बर्फाच्या विशाल भिंती, धोकादायक तडे आणि दोन किलोमीटर लांब ग्लेशियर समवेत अवघड आव्हाने असूनही हे शिखर सर करण्यात आले आहे.
त्सांग ग्यात्सो कोण होते?
त्सांग ग्यात्सो यांचा जन्म 1682 मध्ये मोन तवांग येथे झाला होता. दलाई रिग्जेन त्सांगयांग ग्यात्सो यांनी अरुणाचल प्रदेशच्या मोनपा समुदायासाठी मोठे योगदान आहे. मोनपा समुदाय हे ईशान्य भारतातील एक अत्यंत प्राचीन आदिवासी समुदाय आहे.
मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी या अभूतपूर्व यशासाठी निमासच्या पथकाचे अभिनंदन केले आणि 6 वे दलाई लामा त्सांगयांग ग्यात्सो यांचे नाव शिखराला दिल्याबद्दल आभार मानले आहेत. परम पावन त्सांगयांग ग्यात्सो दीर्घकाळापासून या क्षेत्राच्या लोकांसाठी ज्ञान आणि सांस्कृतिक गौरवाचा स्रोत राहिले आहेत. त्यांची शिकवण आम्हाला मार्गदर्शन देत राहणार आहे. हे शिखर त्यांच्या चिरस्थायी वारशाचा पुरावा ठरणार असे उद्गार खांडू यांनी काढले आहेत.