ऑक्सफोर्डमध्ये ‘काश्मीर’संबंधी चर्चेला हिंदू समुदायाचा विरोध
वृत्तसंस्था/लंडन
ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या डिबेटिंग सोसायटी ऑक्सफोर्ड युनियनने काश्मीरच्या स्वातंत्र्यावर एक कार्यक्रम आयोजित करण्याची घोषणा केली आहे. ही चर्चा काश्मीरमधील कथित वर्तमान स्थितीवर आधारित असेल. सोसायटीनुसार या चर्चेत जस्टिस फौंडेशनचे नेतृत्व करणारे डॉ. मुजम्मिल अय्यूब ठाकूर, जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचे डिप्लोमॅटिक ब्युरोचे अध्यक्ष प्रा. जफर खान आणि भारताचे माजी पंतप्रधान व्ही.पी. सिंह यांचे माध्यम सल्लागार राहिलेले प्रेम शंकर झा सामील होणार आहेत.
संबंधित प्रस्तावावर मुजम्मिल अय्यूब ठाकूर प्रथम बोलणार आहेत. ठाकूर यांना पाकिस्तानचे हस्तक मानले जाते. तर प्रस्तावावरील दुसरे वक्ते जफर खान असणार आहेत. जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटशी ते संबंधित आहेत. फुटिरवाद्यांच्या दाव्यांवर प्रेम शंकर झा प्रतिवाद करणार असल्याचे सांगण्यात आले. या चर्चेची माहिती कळताच ब्रिटिश हिंदूंचे प्रतिनिधित्व करणारा समूह इनसाइट युकेने या निर्णयाची कठोर निंदा केली आहे. दहशतवादाशी संबंध राखणाऱ्या वक्त्यांना प्रतिष्ठित विद्यापीठाकडून आमंत्रित केले जाणे चिंताजनक आहे. अशाप्रकारच्या चर्चेमुळे काश्मीरमधील तणाव वाढू शकतो अशी भीती इनसाइट युके या हिंदू गटाने व्यक्त केली आहे.