‘अंड्यां’चा मार्ग, भलताच भक्कम
मार्गांवरचे खड्डे ही एक अत्यंत त्रासदायक समस्या आहे. पावसाळ्यात तर अनेक मार्ग वाहने चालविणे सोडाच, पण चालण्यासाठीही अयोग्य असे होऊन जातात. पण आपल्यासमोर अन्य कोणताही पर्याय नसल्याने चडफडत का असेना, पण अशाच मार्गांचा उपयोग करणे आपल्याला भाग असते. मार्ग बांधणी शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि बिनभेसळीची सामग्री उपयोगात आणून पेलेली नसल्याने ही स्थिती उद्भवते. भारतात तर ही समस्या सर्वात अधिक आणि प्रमाणाबाहेर आहे.
मात्र, सध्या सोशल मिडियावर एक व्हिडीओ वेगाने प्रसारित होत आहे. त्या व्हिडीओत केली गेलेली प्रतिपादने खरी असतील, तर मार्गांवरच्या खड्डयांची समस्या हा हा म्हणता दूर होऊ शकेल. या व्हिडीओच्या म्हणण्यानुसार आपण जी अंडी खातो, त्या अंड्यांपासून निर्माण केले गेलेले मार्ग अत्यंत भक्कम असतात. ते डांबरी मार्ग किंवा सिमेंटच्या लाद्यांनी निर्माण केलेल्या मार्गांपेक्षाही मजबूत असतात. हा शोध चीनी तंत्रज्ञांनी लावल्याची माहितीही देण्यात आली आहे. मार्ग बनविताना जे काँक्रीट उपयोगात आणले जाते, त्यात आपण खातो त्या अंड्यांच्या कवचाचे चूर्ण मिश्रित केलेले असते. अंड्यांच्या कवचाची निर्मिती भक्कम असते. त्यामुळे या कवचांचे चूर्ण काँक्रीटला इतके भक्कम बनविते, की अशा मिश्रणातून बनलेले मार्ग अतिशय गुळगुळीत आणि मजबूत असतात. त्यांच्यावर लवकर ख•s पडू शकत नाहीत. अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने बांधलेल्या सिमेंटच्या मार्गांइतकेच, किंबहुना, त्याहीपेक्षा अधिक भक्कम हे ‘अंड्या’चे मार्ग असतात, असे या व्हिडीओत दर्शविण्यात आलेले आहे. विशेष बाब अशी, की चीनच्याच बीजींग विद्यापीठातील संशोधकांनी हे संशोधन काही वर्षांपूर्वी केले होते. अंड्यांच्या कवचांचे चूर्ण जर काँक्रीटमध्ये घातले, तर काँक्रीटची शक्ती कित्येक पटींनी वाढते, हा निष्कर्ष या विद्यापीठाच्या संशोधकांनी प्रसिद्ध केला होता. आज याच संशोधनावर आधारित मार्ग चीनमध्ये निर्माण होत आहेत, अशी माहिती आहे.