For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पक्षही गेला चिन्हही गेले

06:47 AM Feb 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
पक्षही गेला चिन्हही गेले
Advertisement

अपेक्षेप्रमाणे निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वादात फैसला करताना राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षाचे नाव घड्याळ हे चिन्ह आणि पक्षाचा झेंडा अजितदादा पवार यांचाच असे स्पष्ट केले. काका पुतण्याच्या संघर्षात न्यायालयीन लढाईत अजित पवार सरस ठरले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचाच अशी स्पष्टता झाली आणि शरद पवार यांची या वयात पक्ष गेला, चिन्ह गेले, आमदार, खासदार गेले अशी अवस्था झाली. तरी त्यांची उमेद टिकून आहे. आपण नवी माणसे उभारू आणि पुन्हा शक्ती सिद्ध करू असे ते म्हणत आहेत. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे वगैरे त्यांच्या सुरात सूर मिसळत शरद पवार हाच आमचा पक्ष, शरद पवार हेच आमचे चिन्ह असे म्हणत आहेत. थोडक्यात पवार साहेब आगामी निवडणुकीत आणखी एक खेळी करून नशीब आजमावणार आहेत. शरद पवार यांची पंतप्रधान होण्याची इच्छा फार वर्षांची आहे. पण, ती पूर्ण झाली नाही. पण, पवार यांनी युत्या, आघाड्या करून सत्तेचे राजकारण केले. आणीबाणीनंतर पुलोदचा प्रयोग करून मुख्यमंत्रीपद मिळवले. समाजवादी काँग्रेस पुन्हा काँग्रेस, पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि अलीकडे भाजपा सेना युती तोडून महाआघाडी असा सत्तेचाच प्रयोग केला. पवारांच्या सैन्याला विरोधी बाकावर चैन पडत नाही आणि स्वबळावर सत्ता मिळवावी अशी शक्तीही नाही. या पार्श्वभूमीवर त्यांनी इंडिया आघाडीचा प्रयोग आरंभला आहे व मागे देवगौडा जसे अचानक पंतप्रधान झाले तसे काही जमते का या विचाराने ते धडपडत आहेत. पण, इंडिया आघाडीतून नितीशकुमार, ममता बॅनर्जी व पंजाबचे मुख्यमंत्री मान यांनी सवता सुभा असा पवित्रा घेतल्याने या आघाडीची स्थिती रोडावली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार आता काय करतात हे बघावे लागेल. विधानसभा निवडणुकीवेळी पावसात भिजून सभा घेत त्यांनी सहानुभूती मिळवली होती. आताही त्यांचा तोच प्रयोग सुरू राहिल असे दिसते. पण, त्यांच्याच तालमीत त्यांच्यात घरात मोठे झालेल्या अजित पवारांना त्यांचे डावपेच पाठ आहेत. म्हणून अजितदादांनी बारामतीत सभा घेत कुणीही माझी शेवटची निवडणूक सांगू लागले तर दाद देऊ नका, असे रोखठोक आवाहन केले. आव्हाड यांनी त्यावर गळा काढला, पण, अजित पवार यांनी ध चा मा करणारी प्रवृत्ती असे म्हणत आव्हाड यांचा मुखभंग केला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर वेगळे काही अपेक्षीत नव्हते असे सुप्रिया सुळेंनी म्हटले आहे. चिन्ह, नाव, पक्ष गेला तर राष्ट्रवादी काँग्रेसचा बाप अजून खंबीर आहे. वगैरे सांगत महाआघाडीतून मोठा विजय मिळवणार असे त्या म्हणत आहेत. दुर्दम्य इच्छाशक्ती आहे, तथापि राज्याची आज जी अवस्था आहे जाती जाती एकमेकांना पाण्यात बघत आहेत ते पहाता पुढे काय वाढून ठेवले आहे याची कल्पना करवत नाही. संतांचा, समरसतेचा पुरोगामी महाराष्ट्र आज जातीधर्मात वाटला जातो आहे. आणि याची सुरूवात राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर सुरू झाली असे राज ठाकरे यांनी वारंवार म्हटले आहे. मतपेटीच्या राजकारणात जातीजातींना लढवायचे आणि सत्तेची फळे चाखायची यात कुणीच मागे नाहीत. या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुका व निकाल याबद्दल सर्वांना उत्सुकता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबकी बार चारसो पार असा नारा संसदेत लावला आणि भाजपाचे 370 खासदार निवडून येतील व मित्रपक्षाचे खासदारही यश खेचतील व सहज 400 पार आकडा जाईल असा त्यांना विश्वास आहे. महाराष्ट्रातील शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांची अवस्था एकसारखी झाली आहे. मोदी व भाजपला लक्ष करत रोज टीका टिप्पणीचा रतीब घातला जातो. पण, दीर्घकाळ सत्ता भोगूनही शरद पवारांना महाराष्ट्राचे सीमाप्रश्नापासून व मराठा आरक्षणापर्यंतचे प्रश्न सोडवता आले नाहीत. आपला पक्ष व आमदार, खासदारही सोबत राखता आले नाहीत. या वास्तवाला सामोरे जावे लागत आहेत. तर उद्धव ठाकरे यांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबतची आघाडी आणि स्वत: मुख्यमंत्री होण्यासाठी काहीही या गोष्टींना तोंड द्यावे लागत आहे. आता लोकसभेचे मैदान दूर नाही, मंडळी कामाला लागली आहेत. अजित पवार, एकनाथ शिंदे, राज ठाकरे, रामदास आठवले एकत्र असतील तर त्यांच्या विरोधात शरद पवार, उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर वगैरे एकत्रित लढतील अशी चिन्हे आहेत. अलीकडे सत्तेचे राजकारण हाच परवलीचा शब्द झाला आहे. नेतेमंडळींना सत्तेची डबल इंजिन गाडी हवी असते. त्यासाठीच निवडणुकीपूर्वी निवडणुकीवेळी आणि निवडणुकीनंतर हवी तशी पावले टाकली जातात. त्यामुळे जे आज दिसते ते उद्या दिसेल आणि असेल शेवटी सत्तेचे गणित, खुर्चीचे राजकारण आणि पाठीराख्यांचा तथाकथित विकास हा महत्वाचा असल्याने कशी बेरीज कोण करतो हे महत्त्वाचे पण, देशहित, लोकहित जपायचे तर मतदारांनी खिचडी न करता कुणा एका पक्षाला पुरेसा व स्पष्ट कौल दिला पाहिजे. महाराष्ट्र आणि देश पुढे नेण्यासाठी स्पष्ट कौल आणि विकास धोरणात विरोधकांसह सर्वसंमती गरजेची असते तसे झाले तर गुंतवणूक येते, लोकांच्या हाताला काम व खर्चाला धन मिळते. जुन्या काळात मंडळी बेरजेचे राजकारण करत होती. शरद पवार आणि राष्ट्रवादीला न्यायालयात धाव घेण्याचा रस्ता मोकळा आहे, शिवसेनेनेही न्यायालयात धाव घेतली आहे. पण, लोकशाहीत जनतेचे न्यायालय हेच खरे असते. अजित पवार यांना शरद पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये केवळ मार्गदर्शक म्हणून भूमिका घ्यावी असे वाटत होते. अजित पवार यांना राष्ट्रवादीने भाजपासोबत सत्तेत सहभागी व्हावे असे वाटत होते. त्यातूनच पहाटेचा शपथविधी झाला. पण, पवारांनी पुन्हा निर्णय बदलला त्याचा परिपाक त्यांच्या ताब्यातून पक्ष, आमदार, खासदार निघून गेले. सत्ता हा लोहचुंबक आहे. याची कल्पना शरद पवारांना आहे. आगामी काळात शरद पवार पुन्हा लंगोट बांधून स्वत: आखाड्यात उतरतात की नवे तरूण संघटीत करून मैदानाला सामोरे जातात हे बघावे लागेल. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक अनेक गोष्टींचा फैसला करणारी आणि शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा कस पाहणारी ठरणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.