पक्ष, चिन्ह चोरलेले आता मिरवत फिरतात
खासदार डॉ. अमोल कोल्हे : महागावच्या महाविकास आघाडी सभेला प्रतिसाद
कोल्हापूर :
देशासह राज्यात सत्तेचा गैरवापर करत पैसा, ईडीच्या मदतीने भाजप सरकारने फोडाफोडीचे राजकरण सुरू केले आहे. वैभवशाली महाराष्ट्रात आमदार, मंत्री विकत घेवून सत्ता स्थापन केली असून कुठे पक्ष तर कुठे चिन्ह चोरले आहे. स्वाभीमानी जनता त्यांना कदापी माफ करणार नसून राज्यात विरोधी उमेदवार चोरलेला पक्ष आणि चिन्ह मिरवत फिरत असल्याची खरमरीत टिका खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली.
महागाव येथे बुधवारी दुपारी शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. नंदाताई बाभुळकर यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांची प्रमूख उपस्थिती होती. यावेळी बोलताना खासदार डॉ. कोल्हे विरोधकावर टीका करताना म्हणाले, राज्यात पक्ष, चिन्हे चोरण्याच्या प्रकार घडल्याने शिवरायाच्या महाराष्ट्रातील जनतेत उद्रेक झाला आहे. गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातील स्वाभीमानी जनता गद्दारांना आता जागा दाखवणार याची खात्री असून सभेला उपस्थितीत महिलांची संख्या पाहून डॉ. नंदाताई यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आता महिला आमदार निवडून देण्याची वेळ आली असून मतदारसंघातील विकासासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बळ देण्याचे आवाहन केले.
यावेळी बोलताना महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. बाभुळकर म्हणाल्या, गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातील प्रत्येक गावातील जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी स्व. कुपेकर यांनी काम केले. त्यांच्या संस्कारात आम्ही वाढलो असून मतदारसंघातील प्रत्येक वाड्यावस्तीवरील मिळालेला प्रतिसाद हा गद्दारांना धडा शिकवण्यासाठी महाराष्ट्रात शरदचंद्र पवार यांचे हात बळकट करण्यासाठी पहिला गुलाल टाकणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. ‘बंटेंगे तो कटेंगे’ अशी प्रथा रूजविणाऱ्या महायुतीला रोखण्यासाठी महाविकास आघाडीची एकोपा वाढवून ‘जुडेंगे तो जितेंगे’चा नारा दिला आहे. 1600 कोटीचा विकास करणाऱ्या आमदारांनी फक्त 38 ठेकेदारांचा विकास केल्याची टिका करत गतवेळी आम्हीच त्यांना संधी दिली आणि आता कृतज्ञता व्यक्त करण्याऐवजी पाठीत खंजीर खुसपल्याची परखड टिका त्यांनी केली.
यावेळी प्रा. किसनराव कुराडे, आकलाख मुजावर, विष्णूपंत केसरकर, माजी सभापती अमर चव्हाण, उबाठा शिवसेनेचे विजय देवणे, प्रा. सुनिल शिंत्रे, माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी, संभाजी देसाई आदींनी मनोगते व्यक्त केली. सभेला जि. प. माजी सदस्या रेखाताई हत्तरकी, शिवसेना उबाठाचे तालुका प्रमूख दिलीप माने, जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, रामराज कुपेकर, तालुकाध्यक्ष मुकुंदराव देसाई, अॅड. दिग्विजय कुराडे, मल्लिकार्जुन आरबोळे, अश्विनी पाटील, रचना देसाई, शिवाजी राउत, प्रशांत देसाई, विद्याताई पाटील, अरविंद कुरणे, शिवाजी माने यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
‘ताईगिरी’ दाखवणार
चंदगड मतदारसंघात विरोधी आणि अपक्ष उमेदवाराकडून मतदारांना विविध अमिष दाखवत धमकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. दबावाचे राजकारणाबरोबर अनेक उमेदवारांनी दादागिरी दाखवत महिला आणि तरूण मतदारांना धमकावणे सुरू आहे. उमेदवारांनी दादागिरी बंद करावी असे आवाहन करत जर दादागिरी अशीच चालू ठेवली तर जनतेच्या हितासाठी आम्हाला ‘ताईगिरी’ दाखवावी लागणार असल्याचा इशारा महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. नंदाताई बाभुळकर यांनी दिला.