गोगटे सर्कलनजीकच्या उद्यानाला अवकळा
12:19 PM Nov 27, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
बेळगाव : गोगटे सर्कल, रेल्वेस्टेशन येथील उद्यानाची दुरवस्था झाली आहे. भिक्षुकांकडून येथील उद्यानाचा ताबा घेण्यात आला असून या ठिकाणी कपडे सुकविणे, तंबू मारणे, चुलीवर भोजन बनविणे यासह इतर प्रकार सुरू आहेत. यामुळे शहराच्या मुख्य मार्गावरच उद्यानाची झालेली दुरवस्था शहराच्या सौंदर्यास बाधक ठरत आहे. कॅन्टोन्मेंटच्या दुर्लक्षामुळेच हे प्रकार सुरू असल्याचे यापूर्वीही अनेकवेळा दिसून आले आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डने आपल्या हद्दीतील अनेक उद्यानांचा विकास केला आहे. परंतु मुख्य रस्त्याला लागून असलेल्या उद्यानाकडे मात्र कानाडोळा केला जात आहे. मागील दहा वर्षांपासून या उद्यानाचा विकासच झालेला नाही. आजूबाजूचा कचरा या उद्यानामध्ये आणून टाकला जात आहे. या उद्यानामध्ये कोणीही येऊन तंबू मारून हातपाय पसरावे, अशी सध्याची स्थिती आहे. अनेक दिवस तंबू मारला तरी कोणीही त्यांना हटकत नसल्याने कॅन्टोन्मेंटचा गलथान कारभार समोर येत आहे. बेघरांकडून उघड्यावर मलमूत्र विसर्जन केले जात असल्याने परिसराला अवकळा आली आहे. रेल्वेस्थानक, हेस्कॉम कार्यालयात ये-जा करणाऱ्यांना या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर उद्यानाच्या बाजूलाच सैनिक आराम घर व क्वॉर्टर्स असल्यामुळे सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांनाही मन:स्ताप सहन करावा लागत आहे. यापूर्वीचे सीईओ राजीव कुमार यांनी उद्यानाच्या विकासासाठी बेळगावमधील अनेक मोठ्या कंपन्यांशी चर्चा केली होती. परंतु, उद्यानाच्या विकासासाठी अद्याप कोणी पुढे आले नसल्याचे समजते. याचाच फायदा भिक्षुकांकडून घेतला जात आहे. उद्यानाचा विकास करायचा नसेल तर किमान उद्यानामध्ये भिक्षुकांना तरी प्रवेश देऊ नये, अशी मागणी केली जात आहे.
Advertisement
भिक्षुकांकडून ताबा, कचऱ्याचे साम्राज्य, कॅन्टोन्मेंटने लक्ष देण्याची गरज : सैनिक-कुटुंबीयांनाही मन:स्ताप
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article