पॅरिस ऑलिम्पिकचा चित्तथरारक सोहळ्याने समारोप
उद्घाटनाप्रमाणेच मंत्रमुग्ध करणारा समारंभ, अवाढव्य स्टेड दि फ्रान्स स्टेडियमवर भव्यदिव्य पार्टीचे स्वरुप
वृत्तसंस्था/ .पॅरिस
पॅरिस ऑलिम्पिकची अखेर समाप्ती झाली असून चित्तथरारक समारोप समारंभाने या खेळांवरील पडदा खाली आणला आणि पुढील खेळांसाठी ऑलिम्पिक ध्वज लॉस एंजलिसला रवाना झाला. समारोपानिमित्त अवाढव्य स्टेड दि फ्रान्स स्टेडियमला एखाद्या पार्टीचे आयोजन केलेल्या संगीत कार्यक्रमाच्या ठिकाणासारखे स्वरुप आले होते.
सीन नदीवर सुमारे चार तास चाललेल्या नाविन्यपूर्ण उद्घाटन सोहळ्यात शहराच्या स्थापत्यकलेचे आणि देशाच्या समृद्ध वारशाचे दर्शन घडले होते. समारोपाचा समारंभ तितकाच मंत्रमुग्ध करणारा होता. मेगास्टार टॉम क्रूझसह हॉलीवूडमधील अभिनेते-अभिनेत्रींची हजेरी त्याला आणखी चमकदार बनवून गेली.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख म्हणाले की, हे सुऊवातीपासून शेवटपर्यंत सनसनाटी ऑलिम्पिक खेळ होते. या स्पर्धांनी आम्हाला दाखवून दिले की, आम्ही मानव किती महान होण्यास सक्षम आहोत. ऑलिम्पिक खेळ शांतता निर्माण करू शकत नाहीत. परंतु ते शांततेची संस्कृती निर्माण करू शकतात, जी जगाला प्रेरणा देऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.
‘मिशन इम्पॉसिबल’ थीम साँगवर टॉम क्रूझचे आगमन
हॉलीवूडचा स्टार टॉम क्रूझ हजेरी लावेल अशी अटकळ होती आणि त्याने निराश केले नाही. कारण तो स्टेडियमच्या वरच्या भागातून ‘मिशन इम्पॉसिबल’ थीम साँगवर उतरला. स्टेजवर जाताना त्याने अॅथलीट्सशी हस्तांदोलन केले, स्टार जिम्नॅस्ट सिमोन बाईल्सकडून ऑलिम्पिक ध्वज घेतला आणि पॅरिसच्या रस्त्यावरून बाईक चालवत तो लॉस एंजेलिसच्या दिशेने उ•ाण भरण्यास तयार असलेल्या मालवाहू विमानात नेला. त्यानंतर एका सायकलस्वाराने हा ध्वज चार वेळचा ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता आणि ट्रॅक लेजंड मायकेल जॉन्सनकडे नेला, ज्याने लॉस एंजेलिसच्या रस्त्यावर जॉगिंग केले आणि व्हेनिस बीचवर स्केटबोर्डिंग दिग्गज जेगर ईटनकडे तो सुपूर्द केला.
दोन तास चालला सोहळा
तत्पूर्वी, थॉमस जॉली यांनी तयार केलेल्या दोन तासांच्या या सोहळ्याची सुऊवात संगीत कार्यक्रमाने होऊन फ्रेंच गायक झाहो दि सागाझान यांनी पॅरिसचे प्रतीक बनलेले प्रसिद्ध ‘सूस ले सिएल दि पॅरिस’ हे गीत सादर केले. त्यानंतर 205 पथकांच्या ध्वजधारकांनी स्टेड दि फ्रान्समध्ये प्रवेश केला आणि स्टेडियमच्या मध्यभागी असलेल्या एका मंचावर ते एकत्र जमले. यावेळी खेळाडूंनी झेंडे फडकविले, छायाचित्रे घेतली आणि एकमेकांसोबत आनंद लुटला.
प्रथमच महिलांच्या मॅरेथॉनने समारोप
ऑलिम्पिक हे सर्वसमावेशकता आणि लिंग समानतेचे प्रतीक असून पॅरिस ऑलिम्पिकने ते दाखवून दिले. खेळांच्या इतिहासात प्रथमच महिलांच्या मॅरेथॉनने समारोप झाला आणि समारोप समारंभाच्या मध्यास पदके दिली गेली. आयोजकांनी 45,000 स्वयंसेवकांच्या प्रयत्नांना दाद देताना त्यांना खेळाडूंबरोबर स्थान दिले. या स्वयंसेवकांनी खेळ मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. यावेळी जॉली यांनी स्वप्नवत आभास निर्माण करताना ‘चियारोस्क्युरो लाइट इफेक्ट’ तयार केला, तर फ्रेंच संगीतकार क्लेमेंट मिरग्युएट यांनी प्रेक्षकांना पूर्णपणे भिन्न पातळीवर नेले.
त्यानंतर 19 व्या शतकाच्या शेवटी आधुनिक खेळांच्या निर्मितीची आठवण करून देणारा भूतकाळातील एक आवाज घुमला. मूव्हमेंट डायरेक्टर केविन व्हिव्हस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या कोरिओग्राफिक बॅलेद्वारे पाच अवाढव्य ऑलिम्पिक रिंग जिवंत करण्यात आल्या. त्यानंतर अॅलेन रॉशने हवेत उभ्या लटकणाऱ्या पियानोवर बसून गीताची धून सादर केली. तर फिनिक्स या प्रतिष्ठित फ्रेंच बँडच्या उदयाने एका भव्य पार्टीला सुऊवात झाली. कारण अनेक कलाकार स्टेजवरील अॅथलिट्सना येऊन मिळाले.
मग आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख यांनी केंद्रस्थान घेतले. पार्श्वभूमीला ऑलिम्पिक ^गीत वाजत असताना ऑलिम्पिक ध्वज खाली उतरवून पॅरिसच्या महापौर अॅन हिडाल्गो यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. हिडाल्गो यांनी ‘आयओसी’ अध्यक्षांना हा ऑलिम्पिक ध्वज दिल्यावर त्यांनी तो लॉस एंजेलिसच्या महापौर कॅरेन बास यांच्याकडे दिला. यावेळी लॉस एंजेलिसची आणि हॉलीवूडची छाप स्पष्टपणे जाणवून एमी पुरस्कार विजेत्या कलाकार गॅब्रिएला सर्मिएन्टो विल्सन यांनी अमेरिकेचे राष्ट्रगीत सादर केले.
लॉस एंजेलिसचे दर्शन
त्यानंतर अमेरिकेचा दिग्गज माउंटन बाइकर केट कोर्टनीने प्रेक्षकांना लॉस एंजेलिसच्या रस्त्यांची सफर घडवत तिसऱ्यांदा ऑलिम्पिकचे यजमानपद भूषविणार असलेल्या स्थळाकडे म्हणजे लॉस एंजेलिस मेमोरिअल कोलिजियम येथे नेले होते, तर मायकेल जॉन्सनने लॉस एंजेलिसच्या शेजार भागांची झलक दाखविली. पुढे शानदार संगीत मैफल सुरू होऊन स्नुप डॉगने आपली अदाकारी पेश केली. लॉस एंजेलिस समुद्रकिनाऱ्यावर सादर केलेल्या या कार्यक्रमात रेड ऑफ चिली पेपर आणि डॉ. ड्रे यांचाही समावेश राहिला.
या ऑलिम्पिक खेळांत भारताचे प्रतिनिधीत्व 47 महिलांसह 117 खेळाडूंनी केले. दोन वेळचा ऑलिम्पिक पदक विजेता पी. आर. श्रीजेश (हॉकी) आणि मनू भाकर (नेमबाजी) यांनी ‘परेड ऑफ नेशन्स’मध्ये देशाचे प्रतिनिधीत्व केले. सहा पदकांसह भारताने आपल्या मोहिमेचा समारोप केला.