भारतीय संस्कृतीच्या रक्षणाच्या पालखीचे ओझे तऊणांनी खांद्यावर घेणे आवश्यक
नाट्यादिग्दर्शक शिवनाथ नाईक यांचे प्रतिपादन, वाळपई सम्राटतर्फे मराठी रंगभूमीदिन साजरा
वाळपई : जीवन म्हणजे फिरता रंग म्हणजे आहे. या रंगमंचावर असलेल्या प्रत्येकामध्ये एक विशिष्ट अशी कला दडलेली असते. या कलेला वाव देऊन त्यांना व्यासपीठ मिळवून देण्याचे कार्य सम्राट क्लबच्या माध्यमातून सातत्याने होत आहे ही खरोखरच कौतुकाची बाब आहे, असे प्रतिपादन थिएटर कलाकार शिवनाथ नाईक यांनी केले. वाळपई सम्राट क्लबतर्फे दाबोस महालक्ष्मी मंदिराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या मराठी रंगभूमी दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नाट्या क्षेत्रामध्ये विशेष योगदान दिलेल्या उल्हास शिरोडकर, रणमाले कलाकार नारायण ठाणेकर व लोककलाकार विष्णू गावकर यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. पारंपरिक समई प्रज्वलित करून या शानदार सोहळ्याचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार उदय सावंत, वाळपई सम्राट क्लबचे अध्यक्ष अंकुश धुरी, माजी अध्यक्ष अशोक काणेकर सचिव चंदन गावस, खजिनदार संजय हळदणकर देवस्थान समितीचे अध्यक्ष मंगलदास धुरी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
सत्तरी ही नाट्या क्षेत्राची परंपरा असलेली भूमी आहे. या भूमीने आतापर्यंत अनेक नाट्याकलाकार जन्माला घातले. त्यांनी ही नाटकाची परंपरा संवर्धित करून ती आतापर्यंत जिवंत ठेवण्यास महत्त्वाचे योगदान दिले. त्याचप्रमाणे आपल्या असलेल्या परंपरा या जिवंत राहिल्या पाहिजेत .यासाठी जेष्ठ कलाकारांनी महत्त्वाचे योगदान दिले. त्यामुळे मराठी रंगभूमी दिनाच्या माध्यमातून त्यांच्या कार्याची प्रतिष्ठा वाढविण्यास संवर्धित केलेले कार्य ही प्रत्येकासाठी ऊर्जा देणारे आहे, असे शिवनाथ नाईक यांनी सांगितले.. ज्येष्ठ पत्रकार उदय सावंत यांनी यावेळी प्रत्येकामध्ये असलेली कला विकसित करून प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंदाचे अंकुर फुलावेत यासाठी समाजामध्ये असलेल्या समाजसेवी संस्था आपल्यापरीने योगदान देत आहेत. प्रत्येकाने अशा संस्थांच्या मागे खंबीरपणे उभे राहून समाजाच्या विकासाचा प्रवाह गतीने पुढे जावा यासाठी योगदान द्यावे असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार उदय सावंत यांनी केले. .
विद्यमान अध्यक्ष अंकुश धुरी यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आपल्याच गावांमध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करून ग्रामीण भागातील जनतेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून दिलेले योगदान याबद्दल त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. सम्राट क्लबचे अध्यक्ष अंकुश धुरी यांनी यावेळी प्रास्ताविक व स्वागत केले. यावेळी 45 वर्षे ऐतिहासिक नाट्या क्षेत्रामध्ये महत्त्वाचे योगदान दिलेले उल्हास शिरोडकर (वाळपई ) व रणमाले या कलेमध्ये विशेष अशी प्रतिमा निर्माण करणारे नारायण ठाणेकर (दाबोस )यांचा शिवनाथ नाईक यांच्या हस्ते तर लोककलेच्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट अशी प्रतिमा निर्माण करणारे धावे सत्तर येथील विष्णू गावकर यांचा ज्येष्ठ पत्रकार उदय सावंत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी उल्हास शिरोडकर ,विष्णू गावकर व नारायण ठाणेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आरंभी दाबोस येथील महालक्ष्मी महिला मंडळ यांच्यावतीने जन्म बाईचा हा सुंदर कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यांनाही यावेळी विशेष प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. वैभव सावंत यांनी मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्ताने एकपात्री अभिनय सादर केला. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांची भाग्यरेखा गावस यांनी ओळख करून दिली. तर गौरव मूर्तींची ओळख सुभाषचंद्र गावस यांनी करून दिली. संपूर्ण सूत्रसंचालन सर्वजित बर्वे यांनी केले तर शेवटी चंदन गावस यांनी आभार मानले. त्यानंतर राष्ट्रगीताने संपूर्ण कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचा शेवट महालक्ष्मी महिला मंडळ यांच्यावतीने सादर करण्यात आलेल्या दिंडीच्या कार्यक्रमातून करण्यात आली.