महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

युद्धाचा भडका

07:00 AM Apr 15, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

काळय़ा समुद्रात रशियन युद्धनौका नष्ट

Advertisement

युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का

Advertisement

युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा झटका बसला आहे. काळय़ा समुद्रात रशियन मिसाइल क्रूजर नष्ट झाल्याचे समोर आले आहे. या घटनेदरम्यान मिसाइल क्रूजर ‘मोस्कावा’मधील सैनिकांना सुखरुप बाहेर काढण्यात आल्याची माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. या स्फोटात मिसाइल क्रूजरला मोठे नुकसान झाले आहे.

युद्धनौकेत आग लागल्यावर स्फोट झाला, परंतु आगीच्या कारणांचा अद्याप शोध लागलेला नाही असे संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले. स्लावा श्रेणीची मिसाइल क्रूजर 1979 मध्ये नौदलात सामील झाली होती. यात 16 अँटीशिप क्षेपणास्त्रs आणि अनेक एअर डिफेन्स क्षेपणास्त्रs, टॉरपीडो आणि गन तैनात होती. रशियाची ही युद्धनौका काळय़ा समुद्रातील ताफ्यात सामील होती आणि फेब्रुवारीपासून युक्रेनच्या विरोधातील युद्धात भाग घेतला होता.

ओडेसामधील नेप्च्यून अँटी-शिप क्षेपणास्त्रांनी मोस्कावाला दोनवेळा लक्ष्य केल्याचा दावा युक्रेनच्या अधिकाऱयांनी केला आहे. ओडेसामधील सैन्य प्रशासनाचे प्रमुख मक्सिम मारचेंको आणि कीव्हमधील अंतर्गत मंत्रालयाचे सल्लागार एंटन गेरासचेंको यांनी हा दावा केला आहे.

युक्रेनच्या अधिकाऱयांनी स्वतःच्या दाव्यावरून कुठलाच पुरावा सादर केलेला नाही. एका युक्रेनियन टेलिग्राम चॅनेलने यासंबंधी एक पोस्ट केली होती, परंतु नंतर ती डिलिट केली होती. यापूर्वी युक्रेनने स्नेक आइसलँडमध्ये वासिली बायकोव्ह  युद्धनौका नष्ट केल्याचा दावा केला होता. आर्टिलरी रॉकेटने युद्धनौकेला लक्ष्य केल्याचे युक्रेनच्या प्रसारमाध्यमांनी म्हटले हेते.

अमेरिकेकडून 6 हजार कोटींचे सैन्य सहाय्य

रशियाकडून अमेरिकेच्या 398 खासदारांवर निर्बंध

युक्रेन युद्धाला 50 दिवस पूर्ण झाले असून याचदरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी युक्रेनसाठी 800 दशलक्ष डॉलर्सच्या (सुमारे 6,089 कोटी रुपये) सैन्य सहाय्याला मंजुरी दिली आहे. रशियाच्या हल्ल्यांना रोखण्यासाठी केल्या जाणाऱया या सहाय्यामध्ये तोफा, चिलखती वाहने आणि हेलिकॉप्टरचा पुरवठा सामील आहे.

रशियाने अमेरिकेच्या संसदेतील 398 सदस्यांवर प्रवासबंदी घातली आहे. अमेरिकेकडून मागील महिन्यात रशियाच्या खासदारांवर बंदी घालण्यात आली होती, याच्या प्रत्युत्तरादाखल हा निर्णय घेण्यात आल्याचे रशियाच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे. याचबरोबर रशियाने कॅनडाच्या संसदेच्या 87 सदस्यांवरही बंदी घातली आहे.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी युक्रेनमधील रशियाच्या हल्ल्यांना नरसंहार ठरविले आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयात पुतीन यांना युद्धगुन्हय़ांसाठी उत्तरदायी ठरविण्यासाठी कॅनडाने पुढाकार घेतल्याचे ट्रुडो यांनी सांगितले आहे. तर चेक प्रजासत्ताकचा कीव्हमधील दूतावास पुन्हा कार्यरत झाला आहे. युक्रेनसोबत आम्ही सदैव उभे राहू असे चेक प्रजासत्ताकच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे.

मॅक्रॉन यांच्यावर नाराज

युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. युद्धादरम्यान मॅक्रॉन यांच्या वक्तव्याने आम्हाला अधिक दुःख झाले असल्याचे झेलेंस्की यांनी म्हटले आहे. रशियाकडून युक्रेनकडून करण्यात आलेल्या हत्यांना नरसंहार म्हणण्यास मॅक्रॉन यांनी बुधवारी नकार दिला होता. परंतु मॅक्रॉन यांनी रशियाच्या हल्ल्याला क्रूर युद्ध संबोधिले. जे काही घडतेय, ते मूर्खपणाचे आहे. रशिया आणि युक्रेनच्या लोकांदरम्यान बंधुभाव असल्याने नरसंहार शब्दाचा वापर टाळण्यात यावे असे विधान मॅक्रॉन यांनी केले.

फ्रान्स करणार अतिरिक्त मदत

फ्रान्स युक्रेनला अतिरिक्त सैन्य सहाय्य करणार आहे. युक्रेनच्या मागणीनुसार हे सहाय्य केले जातेय. फ्रान्सने पूर्वीच युक्रेनला 100 दशलक्ष युरोंची सैन्य उपकरणे पुरविली आहेत अशी माहिती फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ली यांनी दिली आहे.

रशियाकडून धमकी

रशियाच्या सैन्याने युक्रेनची राजधानी कीव्हमधील युक्रेनच्या कमांड सेंटरांवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. आम्ही आतापर्यंत असे करणे टाळले आहे, युक्रेनचे सैनिक रशियाच्या भूभागावर हल्ले करत आहेत. हा प्रकार सुरूच राहिला तर रशियाचे सैन्य कीव्हच्या कमांड सेंटर्सवर हल्ला करणार असल्याचे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. दुसरीकडे रशियाने युक्रेनवर गोळीबाराचा आरोप केला आहे. रशियाच्या कुर्स्क शहराचे गव्हर्नर रोमन स्टारोवोइट यांनी हा आरोप केला आहे.

4 देशांच्या प्रमुखांकडून युक्रेनचा दौरा

पोलंड, लिथुआनिया, एस्टोनिया, लातवियाचा समावेश : युक्रेनला दर्शविला पाठिंबा

पोलंड, लिथुआनिया, एस्टोनिया आणि लातविया या देशांच्या अध्यक्षांनी कीव्हपासुन 40 किलोमीटर अंतरावरील बोरोडय़ांकाचा दौरा केला आहे. या शहराची लोकसंख्या 12,000 इतकी आहे. युक्रेनसाठी सैन्य समर्थन वाढविण्याच आणि रशियाला हल्ल्यासाठी उत्तरदायी ठरविण्याची मागणी या देशांच्या प्रमुखांनी केली आहे. चारही राष्ट्रप्रमुखांनी युक्रेनचे अध्यक्ष झेलेंस्की यांची कीव्हमध्ये भेट घेतली आहे.

हे युद्ध नव्हे तर दहशतवाद आहे. आम्ही केवळ गुन्हे करणाऱया सैनिकांबद्दल बोलत नसून ज्यांनी आदेश दिले त्यांनाही आरोपीच्या पिंजऱयात उभे करण्यात यावे असे उद्गार पोलंडचे अध्यक्ष आंद्रेजेज डूडा यांनी काढले आहेत. चारही राष्ट्रप्रमुखांनी युक्रेनला समर्थन दर्शवत रशियाच्या हल्ल्यांमुळे झालेल्या विध्वंसाची पाहणी केली आहे. पोलंड, लिथुआनिया, लातविया आणि एस्टोनियाच्या अध्यक्षांचा दौरा नाटोच्या पूर्व हिस्स्याच्या देशांच्या एकजुटतेचे प्रदर्शन करणारा होता. यातील तीन देश पूर्वी युक्रेनप्रमाणेच सोव्हियत संघात सामील होते.

4 ही राष्ट्रप्रमुखांनी युक्रेनच्या अध्यक्षांची भेट घेण्यासाठी कीव्हमध्ये रेल्वेद्वारे प्रवास केला आहे. त्यानंतर त्यांनी बोरोडय़ांका भागाला भेट दिली, या भागात रशियाच्या सैनिकांकडून करण्यात आलेल्या अत्याचाराचे पुरावे सापडले आहेत.

लिथुआनियाचे अध्यक्ष गीतानास नौसेदा यांनी रशियाकडून तेल आणि वायूची खरेदी रोखून देशाच्या सर्व बँकांच्या विरोधात कठोर निर्बंधांचे आवाहन करत युरोपच्या भविष्यासाठी ही लढाई युक्रेनमध्ये सुरू असल्याचे म्हटले आहे.

कीव्हच्या ऐतिहासिक मरिंस्की पॅलेसमध्ये झेलेंस्की यांच्यासोबत नौसेदा, एस्टोनियाचे अध्यक्ष अलार कारिस, पोलंडचे आंद्रेज डूडा आणि लातवियाचे अध्यक्ष एगिल्स लेविट्स यांनी युक्रेनला राजनयिक स्वरुपात तसेच सैन्य सहाय्यासह समर्थन करण्याची स्वतःच्या प्रतिबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे.

रशियाचा कब्जा याचा अर्थ काय हे आम्ही जाणतो. रशियाच्या दहशतवादाचा अर्थ काय असतो हे देखील आम्ही जाणून आहोत. युद्ध गुन्हे करणारे तसेच त्यांना आदेश देणाऱयांना उत्तरदायी ठरविण्याची गरज असल्याचे या चारही देशांच्या प्रमुखांनी म्हटले आहे.

 बंकरमध्ये सडू लागले रशियन सैनिकांचे मृतदेह

रशियाच्या सैन्याला नवा कमांडर मिळाल्यावर युक्रेनविरोधी युद्ध अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त होतेय. युक्रेनच्या काही भागांमधून रशियाचे सैन्य मागे हटले आहे आणि युक्रेनचे सैनिक तेथे नियंत्रण प्रस्थापित करत आहेत. याचदरम्यान लढाईत मारले गेलेल्या रशियाच्या सैनिकांचे मृतदेह बंकरमध्ये सडत असल्याची माहिती समोर आली आहे.

तीन दिवसांच्या लढाईनंतर युक्रेनने माला रोहन भाग स्वतःच्या ताब्यात घेतला आहे. येथे डगआउटमध्ये मृतदेह पडले आहेत. टी-22 रणगाडय़ांमधून आलेल्या रशियाच्या सैनिकांनी खारकीव्हपासून दोन मैलाच्या अंतरावरील दुसऱया शहरावर बॉम्बवर्षाव केला होता.

रशियाच्या सैनिकांनी 26 फेब्रुवारी रोजी माला रोहनवर कब्जा केला होता. रशियाचे सैनिक सुमारे महिनाभर येथे ठाण मांडून होते, युक्रेनच्या प्रतिकारामुळे त्यांना माघार घ्यावी लागली आहे. रशियाच्या सैनिकांनी एका फर्निचर फॅक्ट्रीला लुटून गालिच्यांद्वारे स्वतःचे बंकर तयार केले होते. सैनिकांनी आमच्या घरातील अन्न चोरले तसेच शेकडो प्राण्यांना गोळय़ा घालून ठार केल्याचे 62 वर्षीय शेतकरी ज्लोबिना लुबोव्ह यांनी सांगितले.

माला रोहन भागात रशियन सैनिकांचे अवशेष विखुरले असून यात त्यांचा गणवेश, स्फोट झालेले ग्रेनेड यांचा समावेश आहे. या लढाईत रशियाचा एकही सैनिक वाचला नसल्याचे स्थानिक लोकांचे सांगणे आहे.

रशियाच्या सैन्याने उभारलेल्या बहुतांश बंकरमध्ये मारले गेलेल्या सैनिकांचे मृतदेह पडले आहेत. या मृतदेहांवर प्राणी तसेच पक्ष्यांनी हल्ले केल्याने त्यांना विद्रूप स्वरुप प्राप्त झाले आहे.

 रशियन सैनिकाकडून मुलाचे लैंगिक शोषण

रशियाच्या सैन्यावर युक्रेनने आणखीन एक खळबळजनक आरोप केला आहे. बूचा शहरात एका रशियन सैनिकाने 11 वर्षीय मुलावर त्याच्या आईदेखत लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. मुलाच्या आईला खुर्चीला बांधून ठेवत तिला या क्रूर घटना पाहण्यास रशियाच्या सैनिकाने भाग पाडले होते.

रशियन सैनिकाने स्वतःच्या कमांडरला या घटनेची चित्रफित पाठविली होती. रशियाने स्वतःच्या या सैनिकाला लैंगिक शोषणाच्या आरोपाप्रकरणी अटक केल्याचे समजते.

आरोपी रशियन सैनिकाचे नाव एलेग्जी बाइचकोव्ह असून त्याने युक्रेनियन मुलाचे लैंगिक शोषण करताना त्याचे चित्रण केले होते. तसेच स्वतःच्या अन्य साथीदारांना याची चित्रफित पाठविली होती.

युक्रेनच्या एक लाख 20 हजार मुलांचे अपहरण करण्याचा आरोपही रशियावर झाला आहे. या मुलांचे लैंगिक शोषण करत त्यांची रशियन सीमेवर तस्करी केली जात असल्याचे सांगण्यात येते. यापूर्वी रशियाच्या पाच सैनिकांनी 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केले होते. या अत्याचारामुळे ही मुलगी गरोदर राहिली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article