For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हावेरीतील भडका!

06:30 AM Mar 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
हावेरीतील भडका
Advertisement

हावेरी जिल्ह्यातील बॅडगी येथील मिरची बाजारपेठेत शेकडो कोटींची उलाढाल होते. मिरचीच्या दरात सरासरी 3 ते 5 हजार रुपयांपर्यंत घसरण झाल्याने संतप्त शेतकऱ्यांचा भडका उडाला आणि त्यांनी बाजारपेठेत जाळपोळ, दगडफेक केली. तर दुसरीकडे माजी उपमुख्यमंत्री के. एस. ईश्वरप्पा यांचे चिरंजीव कांतेश यांना याच हावेरीमधून उमेदवारी मिळणार, अशी अटकळ होती. मात्र, हायकमांडने माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना उमेदवारी दिली. त्यामुळे ईश्वरप्पांचा भडका उडाला आहे.

Advertisement

रंग, रूप व विशिष्ट चव यामुळे बॅडगी मिरचीला केवळ आपल्या देशातच नव्हे तर  विदेशातही मागणी आहे. हावेरी जिल्ह्यातील बॅडगी येथील मिरचीच्या बाजारपेठेत दरवर्षी शेकडो कोटींची उलाढाल होते. मिरचीच्या दरात सरासरी 3 हजार ते 5 हजार रुपयांपर्यंत घसरण झाल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बाजारपेठेत जाळपोळ, दगडफेक केली आहे. सोमवारी 11 मार्च रोजी बॅडगीच्या बाजारपेठेत मोठा संघर्ष झाला. व्यापारी, पोलीस व अग्निशमन दलाची वाहनेही पेटविण्यात आली आहेत. सध्या देशभरात मिरचीला चांगला भाव होता. अचानक दर कोसळल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. पोलिसांची संख्या कमी आणि वेगवेगळ्या राज्यातून बाजारपेठेत मिरची घेऊन आलेल्या शेतकऱ्यांची संख्या अधिक यामुळे संघर्ष लवकर आटोक्यात आला नाही. पोलिसांनाही पिटाळण्यात आले. दगडफेकीत पोलीस, पत्रकार जखमी झाले आहेत. एपीएमसी कार्यालयावरही हल्ला करण्यात आला आहे.

बॅडगी बाजारपेठेत हंगामात मोठ्या प्रमाणात मिरचीची आवक होते. यापूर्वी केवळ हावेरी जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून मिरची या बाजारपेठेत येत होती. आता शेजारच्या आंध्रप्रदेश, तेलंगणा, शहापूर, बळ्ळारी जिल्ह्यातूनही विक्रीसाठी मिरची येते. सध्या हंगाम आहे. त्यामुळे लिलावाच्या दिवशी 3 लाख पोत्यांहून अधिक मिरचीची आवक सुरू आहे. मिरचीच्या व्यवहारात बॅडगीचे नाव केवळ आपल्या देशातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे. अनेक देशातील व्यापारीही मिरची खरेदीसाठी बॅडगीच्या बाजारपेठेत येतात. त्यामुळे साहजिकच मिरचीला मागणी आणि तिचा दरही वाढलेला आहे. अचानक दर कोसळल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. यापूर्वीही अनेक वेळा बाजारपेठेत चढउतार झाले तरी असे हिंसक वळण कधी लागले नव्हते. बॅडगीच्या मिरचीने भारतीय मसाल्यांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. लाल रंग, कमी तिखटपणा व विशिष्ट सुवास यामुळे मसाले उत्पादक कंपन्या बॅडगी मिरचीलाच पसंती देतात. त्यामुळे साहजिकच त्याला मागणी जास्त आहे.

Advertisement

यंदाच्या हंगामात एका दिवसात 4 लाख पोत्यांहून अधिक मिरचीची उच्चांकी आवक झाली होती. बॅडगी मिरची आणि मिरची पावडर रशिया, अमेरिका, मलेशिया, सिंगापूरसह अरब राष्ट्रांनाही निर्यात केली जाते. व्यवहाराचा आवाका लक्षात घेता 75 एकर भूभागात विस्तारलेली बॅडगीची बाजारपेठ देशात दुसऱ्या क्रमांकाची आहे. दरवर्षी 2 हजार कोटी रुपयांहून अधिक उलाढाल मिरचीच्या व्यवहारातून होते. बॅडगी या गावाच्या नावावरूनच ही मिरची ओळखली जाते. बॅडगीत मिरची साठवण्यासाठी 30 हून अधिक शीतगृहे आहेत. पूर्वी हावेरी जिल्ह्यात पिकविली जाणारी ही मिरची आता आंध्र व तेलंगणामध्येही मोठ्या प्रमाणात पिकविण्यात येत आहे. तिची बाजारपेठ मात्र बॅडगीतच आहे. तेथील शेतकरी आपली मिरची विक्रीसाठी बॅडगीलाच आणतात. गेली एक-दोन वर्षे मिरचीचा दर स्थिरावला होता. त्यामुळे बॅडगी मिरचीला बाजारपेठेत ‘रेड गोल्ड’ असे संबोधण्यात येत होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मिरचीच्या बाजारपेठेत झालेली चढउतार, त्यामुळे शेतकऱ्यांचा झालेला उद्रेक ही परिस्थिती हाताळणे अवघड जात आहे.

गोव्यासह इतर राज्यांप्रमाणेच अन्नपदार्थात कृत्रिम रंगाच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. खासकरून बॉम्बे मिठाईमधील रंग मानवी आरोग्यास घातक आहे. गोबी मंच्युरीमध्ये वापरल्या जाणाऱ्या रंगावरही बंदी घालण्यात आली आहे. घातक रंगाचा वापर न करता बॉम्बे मिठाई व गोबी मंच्युरी बनविण्यास परवानगी आहे. या बंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांना सात वर्षे कारावास व 10 लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे. आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी ही बंदी जाहीर केली आहे. बॉम्बे मिठाई असो किंवा गोबी मंच्युरी हे दोन्ही पदार्थ लहान मुलांना प्रिय आहेत. ते अधिक आकर्षक बनविण्यासाठी त्याच्यात कृत्रिम रंगाचा वापर केला जातो. हे रंगच मानवी शरीराला घातक असल्याचे अनेक संशोधनातून सामोरे आले आहे. त्यामुळेच राज्य सरकारने रंगाच्या वापरावर बंदी जाहीर केली आहे.

या आदेशामुळे सरकारी यंत्रणा कधीही, कोणत्याही हॉटेलवर किंवा खाद्यपदार्थ बनविणाऱ्या केंद्रावर छापे टाकू शकतात. बंदीचा आदेश जाहीर करण्यापूर्वी दोन्ही पदार्थ वेगवेगळ्या प्रयोगशाळांतून तपासण्यात आले आहेत. सर्वच तपासणी अहवालात या पदार्थांमधील रंगांमुळे कॅन्सरसह वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण मिळते, असा निकष आला आहे. त्यामुळेच कर्नाटकाने खाद्यपदार्थांत कृत्रिम रंगाच्या वापरावर बंदी जाहीर केली आहे.

भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत कर्नाटकातील 20 जागांवर उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत. माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार डी. व्ही. सदानंदगौडा, माजी प्रदेशाध्यक्ष नळिनकुमार कटील, प्रतापसिंह, शिवकुमार उदासी, देवेंद्रप्पा, जी. एस. बसवराजू, जी. एम. सिद्धेश्वर, श्रीनिवास प्रसाद या आठ विद्यमान खासदारांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. सी. एन. मंजुनाथ यांना बेंगळूर ग्रामीणमधून भाजपने उमेदवारी दिली आहे. सध्या उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे बंधू डी. के. सुरेश या मतदारसंघाचे खासदार आहेत. डी. के. बंधूंना आवर घालण्यासाठी भाजप-निजद युतीने ही खेळी खेळली आहे. डॉ. मंजुनाथ अलीकडेच वैद्यकीय सेवेतून निवृत्त झाले आहेत. ते माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे जावई आहेत. डी. के. शिवकुमार व माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्यातील राजकीय संघर्ष काही नवा नाही.

या संघर्षातूनच डॉ. मंजुनाथ यांचे नाव पुढे आले आहे. त्यामुळे कर्नाटकातील राजकारण चांगलेच रंगणार आहे. माजी उपमुख्यमंत्री के. एस. ईश्वरप्पा यांचे चिरंजीव कांतेश यांना हावेरीमधून उमेदवारी मिळणार, अशी अटकळ होती. मात्र, हायकमांडने माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ईश्वरप्पा चांगलेच संतप्त झाले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने त्यांनाच उमेदवारी नाकारली होती. आता आपल्या मुलाला लोकसभेची उमेदवारी मिळणार, याची त्यांना खात्री होती. याचे परिणाम शिमोगामध्ये दिसणार का? हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

Advertisement
Tags :

.