‘ओरिजिनल 360 डिग्री’वाला...डिव्हिलियर्स !
भारतीय महिला क्रिकेटपटू नीतू डेव्हिड अन् इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कूकसह नुकताच ‘आयसीसी’नं ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश केलाय तो दक्षिण आफ्रिकेच्या ए. बी. डिव्हिलियर्सचा...असामान्य प्रतिभा असलेला डिव्हिलियर्स हा महान खेळाडूंच्या रांगेत बसण्यास पूर्णपणे पात्र असलेला अन् सहकारीच नव्हे, तर प्रतिस्पर्धी अन् रसिकांच्याही सदोदित कौतुकाचा विषय बनलेला खेळाडू...
क्रिकेटचा कसलाही प्रकार असो, ‘तो’ मैदानात उतरला की, सर्व गोलंदाजांचे धाबे दणाणून जायचे. कारण त्याची ‘दांडपट्ट्या’सारखी चालणारी बॅट...शिवाय ‘तो’ खेळपट्टीच्या दोन्ही बाजूंनी खेळण्यात माहीर. ‘ऑफ स्टंप’वरील मारा विरुद्ध दिशेनं अन् ‘लेग’चा चेंडू ‘ऑफ’ला मैदानाबाहेर भिरकावून देणं हा हातखंडा...या कल्पकतेमुळं तो खेळपट्टीवर असताना ‘रिव्हर्स स्वीप’, वेगवान गोलंदाजांना ‘रिव्हर्स पूल’ यासह अनेक धाडसी ‘स्टंट’ पाहायला मिळायचे. इतर अनेक फटकेबाजांप्रमाणं सातत्याच्या अभावानं ‘त्याला’ही ग्रासलेलं असलं, तरी ज्या दिवशी ‘त्याची’ सटकली त्या दिवशी अव्वलातील अव्वल गोलंदाजांचे देखील बारा वाजलेचं...‘360 डिग्री’चा मूळचा पाईक, ‘फ्रिक’ या शब्दास खराखुरा जागणारा असामान्य फलंदाज...अब्राहम बेंजामिन डिव्हिलियर्स...
ए. बी. डिव्हिलियर्सनं व्यावसायिक क्रिकेटमध्ये प्रवेश केला तो 2003 साली स्थानिक संघ ‘नॉर्दर्न’तर्फे. तिथं तो सलामीला यायचा अन् पहिल्याच सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये त्यानं नोंद केली ती अर्धशतकांची...त्याच्या यशाचा डंका इतका वाजला की, वर्षभरात जोहान्सबर्ग येथील इंग्लंडविऊद्धच्या कसोटी सामन्यातून वयाच्या 20 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल टाकण्याची संधी त्याला मिळाली...हे पदार्पण देखील संस्मरणीय ठरलं. कारण चौथ्याच डावात डिव्हिलियर्सनं 52 धावा करून दक्षिण आफ्रिकेला निश्चित वाटणाऱ्या पराभवापासून वाचविलं. शिवाय याच मालिकेत त्यानं पहिलं कसोटी शतकही नोंदवताना सेंच्युरियनमधील घरच्या मैदानावर 109 धावा फटकावल्या. थोडक्यात आपण काय चीज आहोत हे जगाला दाखविण्यास त्यानं वेळ लावला नाही...
आपल्या पहिल्याच कसोटी मालिकेत सलामीवीर आणि खालच्या फळीतील यष्टीरक्षक-फलंदाज अशा दोन्ही भूमिका बजावलेल्या अन् क्रिकेटच्या विश्वात ‘एबी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या त्या खेळाडूनं 2005 मधील पहिल्या कॅरिबियन दौऱ्यात 460 धावा फटकावून योग्यता सिद्ध केली असली, तरी ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या मायदेशातील तसंच कांगारुंच्या भूमीतील मालिकांत त्याच्यावर धावांसाठी झगडण्याची पाळी आली. त्यातून बाहेर सरून बॅट पाजळण्यासाठी डिव्हिलियर्सला 2007-08 मधील वेस्ट इंडिजविऊद्धच्या मायदेशातील मालिकेपर्यंत थांबावं लागलं...त्यानंतर त्यानं इंगा दाखविला तो भारताला. अहमदाबादमध्ये 217 धावांची खेळी करताना भारताविऊद्ध द्विशतक झळकावणारा दक्षिण आफ्रिकेचा पहिला खेळाडू बनून त्यानं इतिहासाच्या पुस्तकात स्थान मिळविलं...
ए. बी. डिव्हिलियर्स मग सुसाट सुटला, खेळाडू म्हणून त्यांची उंची वाढत राहिली...त्यानं आपल्या फलंदाजीचं तंत्र भरपूर सुधारताना आक्रमक खेळाबरोबर जबरदस्त बचावही विकसित केला. याकामी त्यानं जोड दिली ती ‘बॅक अँड क्रॉस ट्रिगर मूव्हमेंट’ची अन् खेळपट्टीवर पडल्यानंतर तसंच हवेत उशिरा स्वींग होणाऱ्या वा वळणाऱ्या चेंडूला तोंड देण्याकरिता ‘लेट-ब्लॉक’ची...2010 साली अबुधाबीमध्ये पाकिस्तानविऊद्ध डिव्हिलियर्सनं नाबाद 278 धावा फटकावल्या. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या एखाद्या फलंदाजानं केलेली ती सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या होती. तो विक्रम एका वर्षात ओव्हलवर नाबाद 311 धावा करून मोडला हाशिम अमलानं...
2011 च्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिका गारद झाल्यानंतर जूनमध्ये एकदिवसीय व टी-20 संघांचा कर्णधार म्हणून जबाबदारी सोपविण्यासाठी निवड करण्यात आली ती ए. बी. डिव्हिलियर्सचीच...पण कामाचा ताण नि दबाव यामुळं त्यानं 2013 च्या सुऊवातीस ‘टी-20’ कर्णधारपदाला सोडचिट्ठी देणं पसंत केलं. परंतु दक्षिण आफ्रिकेचा मुख्य फलंदाज आणि यष्टीरक्षक म्हणून खेळणं मात्र चालू ठेवलं...
ए. बी. डिव्हिलियर्सकडून कसोटी नि एकदिवसीय अशा दोन्ही प्रकारांत चांगली कामगिरी करणं चालू राहून 2013 च्या डिसेंबरमध्ये तो दोन्ही फलंदाजी क्रमवारींत अव्वल स्थान मिळवणारा नववा फलंदाज बनला. पुढं ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्यानं फलंदाजांच्या यादीत दुसरं स्थान मिळविलं...2014 साल सरलं तेव्हा दक्षिण आफ्रिकेसाठी दोन्ही प्रकारांत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये अमलाच्या मागोमाग नाव होतं ते त्याचंच...
2016 च्या सुऊवातीस इंग्लंडविऊद्धच्या मायदेशातील मालिकेदरम्यान हाशिम अमलानं सूत्रं खाली ठेवल्यानंतर कसोटी कर्णधारपदही सोपविलं गेलं ते ए. बी. डिव्हिलियर्सच्या हातीच. तथापि, कोपरावरील शस्त्रक्रियेमुळं संपूर्ण वर्षभरात त्याच्या वाट्याला आलेली ती एकमेव कसोटी मालिका राहिली, त्यानंतर डिसेंबरमध्ये त्यानं संघाच्या हिताचा दाखला देत नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला...सदर शस्त्रक्रियेतून सावरल्यानंतर डिव्हिलियर्सनं मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं, परंतु ताण कमी करण्याच्या प्रयत्नात मार्ग पत्करला तो कसोटी क्रिकेटपासून दूर राहण्याचा...
‘एबी’नं कसोटी संघात पुनरागमन केलं ते 2017 च्या डिसेंबरमधील झिम्बाब्वेविऊद्धच्या ‘बॉक्सिंग डे टेस्ट’मधून. त्यानंतर अनेकदा कठीण परिस्थितीत संघाच्या मदतीला धावून येत भारत व ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या मायदेशातील मालिकांत तो संघाच्या फलंदाजीचा कणा राहिला...23 मे, 2018 रोजी, म्हणजे 2019 च्या विश्वचषक स्पर्धेला एक वर्ष बाकी असताना डिव्हिलियर्सनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. ‘आता इतरांनी जबाबदारी स्वीकारण्याची वेळ आलीय. माझी वेळ संपलीय आणि खरं सांगायचं झाल्यास मी थकलोय’ असे तो त्यावेळी म्हणाला. मग गेल्या वर्षी त्यानं अपेक्षेहून आधी निवृत्ती पत्करण्याच्या निर्णयाविषयी सांगताना खुलासा केला तो मुलाचा पाय चुकून उजव्या डोळ्यावर आदळल्यानं दृष्टी कमी झाल्याचा !
जबरदस्त अष्टपैलूत्व...
डिव्हिलियर्स म्हटल्यानंतर डोळ्यांसमोर आक्रमक ‘स्ट्रोकप्ले’ यायलाच हवा. परंतु परिस्थितीची गरज पाहून त्याला मुरड घालण्याची अन् खेळपट्टीला चिकटून राहण्याची क्षमता देखील त्यानं प्रसंगी व्यवस्थित दाखवून दिली...2012-13 मधील ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात दक्षिण आफ्रिकेला अॅडलेड कसोटी वाचविण्यासाठी संघर्ष करावा लागत असताना ‘एबी’नं त्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीला आळा घातला आणि आतापर्यंतच्या सर्वांत रोमांचक बरोबरीची नोंद करताना तब्बल 220 चेंडूंचा सामना करत 33 धावा केल्या. त्यावेळी त्याचा साथीदार होता फाफ डु प्लेसिस...परंतु पुढच्याच ‘वाका’वरील कसोटीत डिव्हिलियर्स मूळ अवतारात परतला अन् त्यानं केवळ 184 चेंडूंत केलेल्या 169 धावांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत गारद करून दाखविलं...
तडाखेबंद पराक्रम...
- ए. बी. डिव्हिलियर्सनं 2012-13 च्या हंगामात जोहान्सबर्ग इथं पाकिस्तानविऊद्ध 11 झेल घेतले आणि एका कसोटी सामन्यात यष्टीरक्षकानं सर्वाधिक झेल घेण्याच्या इंग्लंडच्या जॅक रसेलच्या विक्रमाशी बरोबरी केली...त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात नाबाद 103 धावा करून एका कसोटीत शतक झळकावणारा अन् 10 जणांना बाद करण्यात योगदान देणारा तो पहिला यष्टीरक्षक बनला...
- 2015 च्या जानेवारी महिन्यात ए. बी. डिव्हिलियर्सनं आणखी एक प्रताप बजावताना विंडीज माऱ्याला जोहान्सबर्गच्या कानाकोपऱ्यात पिटाळत 31 चेंडूंत शतक पूर्ण केलं आणि त्यापूर्वीचा उच्चांक मागं टाकला तो पाच चेंडूंनी. त्या तडाखेबंद खेळीत त्यानं फटकावल्या 44 चेंडूंत 149 धावा. त्यात होता 9 चौकार व 16 षटकारांचा समावेश...एका एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक षटकार खेचण्याच्या रोहित शर्माच्या विक्रमाशी बरोबरी करण्यासाठी त्याला अवघे 44 चेंडू पुरेसे ठरले...
- 2015 च्या विश्वचषकातील वेस्ट इंडिजविऊद्धच्या सामन्यात डिव्हिलियर्सनं 66 चेंडूंत 162 धावा फटकावत सिडनी क्रिकेट मैदानावर दक्षिण आफ्रिकेला स्पर्धेच्या इतिहासातील त्यांची दुसरी सर्वोच्च धावसंख्या (408) नोंदवून दिली. शिवाय या पराक्रमासह तो एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वांत जलद 50, 100 आणि 150 धावा करण्याचे विक्रम खात्यात असलेला खेळाडू बनला...त्या स्पर्धेत त्यानं एकूण 482 धावांची लयलूट करत फलंदाजांमध्ये तिसरं स्थान पटकावलं. परंतु ऑकलंडमधील उपांत्य लढतीत न्यूझीलंडनं त्यांचा पराभव केल्यामुळं उत्साहावर विरजण पडलं...
‘आयपीएल’ गाजविणारा ‘एबी’...
2008 मध्ये ‘दिल्ली डेअरडेव्हिल्स’मधून ‘आयपीएल’मध्ये पदार्पण केलेल्या डिव्हिलियर्सनं तिथंही दणकेबाज कामगिरी केलेली असली, तरी तो खरा गाजला 2011 साली ‘रॉयल चॅलेंसजर्स बेंगळूर’मध्ये दाखल झाल्यानंतर. 2021 साली निरोप घेईपर्यंत तो जिवलग मित्र विराट कोहलीच्या खालोखाल संघाचा आधारस्तंभ नि वैशिष्ट्या बनून राहिला. त्यानं तीन हंगामांत ‘आरसीबी’तर्फे सर्वाधिक धावा जमविण्याचा मान मिळविला अन् शेवटपर्यंत अव्वल तीन फलंदाजांमध्ये त्याचं स्थान अढळ राहिलं...
- प्रकार सामने डाव नाबाद धावा सर्वोच्च सरासरी शतकं द्विशतकं अर्धशतकं
- कसोटी 114 191 18 8765 278 50.66 22 2 46
- वनडे 228 218 39 9577 176 53.5 25 - 53
- टी20 78 75 11 1672 79 26.12 - - 10
- आयपीएल 184 170 40 5162 133 39.71 3 - 40
- राजू प्रभू