For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इतर माध्यमातील विद्यार्थ्यांना मराठीचा पर्याय खुला

11:00 AM Jun 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
इतर माध्यमातील विद्यार्थ्यांना मराठीचा पर्याय खुला
Advertisement

तृतीय भाषा म्हणून निवडण्याची संधी : पाठ्यापुस्तक निर्मिती समितीला यश

Advertisement

बेळगाव : इतर माध्यमांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता मराठी भाषेशी आपली नाळ कायम ठेवता येणार आहे. विद्यार्थ्यांना तृतीय भाषा विषय म्हणून मराठीची निवड करता येणार आहे. कर्नाटक पाठ्यापुस्तक समितीच्यावतीने नवीन शैक्षणिक धोरणाचा एक भाग म्हणून मातृभाषेव्यतिरिक्त इतर माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या भाषेचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये कन्नड, इंग्रजी, हिंदी, ऊर्दूसोबत मराठीचाही पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. इयत्ता सहावीपासून तृतीय भाषेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. यापूर्वी सहावी ते आठवी तृतीय भाषेची पाठ्यापुस्तके तयार करण्यात आली होती. यंदा पाठ्यापुस्तक मंडळाने नववीची पुस्तकेही तयार केली आहेत. प्रा. सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कल्पना रायजाधव, अस्मिता देशपांडे, दीपक जाधव, गजानन नाईक, चित्रकार बी. एस. गस्ती, रणजित चौगुले यांनी पुस्तक तयार करण्यास मेहनत घेतली. या पुस्तकाचे नाव ‘मराठी सरिता’ असे असून विद्यार्थ्यांची बौद्धिक आकलन क्षमता लक्षात घेऊन त्यांच्यासाठी अतिशय सोपी आणि सहजगत्या आकलन होईल, अशी रचना करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांची बौद्धिक आणि मानसिक क्षमता पाहून गद्य, पद्य व व्याकरणाची निवड करण्यात आली आहे. इतर भाषेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे मराठीवरील प्रभुत्व वाढावे याचा विचार करण्यात आला आहे. 2005 मधील मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन पाठ्यापुस्तक तयार करण्यात आले. कर्नाटकातील समृद्ध ऐतिहासिक परंपरा, संस्कृतीची ओळख, मराठी भाषा साहित्य संस्कृती, बोलीभाषा यांचा परिचय करून देण्यात आला आहे.सहावी ते दहावीच्या पुस्तकांच्या निर्मितीची जबाबदारी पाठ्यापुस्तक समितीने बेळगाव डाएटवर सोपविली होती. तत्कालिन डाएटचे प्राचार्य एम. एम. सिंदूर, एस. डी. गांजी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. सुजाता बाळेकुंद्री, प्रा. भारती दासोग, यांनी पुस्तके तयार करून घेतली. यामध्ये विविध मराठी शाळांमधील शिक्षकांची समिती तयारी करून त्यांची नियुक्ती करण्यात आली. दोन सत्रांत पाठ्यापुस्तकांची विभागणी करण्यात आली असून आरसीयूचे डॉ. विनोद गायकवाड, डॉ. मनीषा नेसरकर यांचेही मार्गदर्शन लाभले.

Advertisement

Advertisement
Tags :

.