लाटकरांच्या त्सुनामीत विरोधक बुडतील
कोल्हापूर :
विरोधकांकडून कोल्हापूरच्या विकास कामांचे हजारो कोटींचे आकडे दाखवले जात आहेत. मात्र प्रत्यक्षात हि विकासकामे कुठेच दिसत नाहीत. खोटी विकासकामे दाखवून फसवणूक करणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी कोल्हापूर उत्तरची निवडणुक येथील स्वाभिमानी जनतेने हाती घेतली आहे. जनतेमधून सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार असणाऱ्या राजेश लाटकर यांना पाठबळ वाढत असल्याने त्यांची लाट निर्माण झाली आहे. लाटकरांच्या पुढील काळात येणाऱ्या त्सुनामिच्या लाटेत विरोधक नक्कीच बुडतील, अशा शब्दात खासदार शाहू छत्रपती यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांच्या प्रचारास मिरजकर तिकटी येथे शुक्रवारी रात्री झालेल्या प्रचार सभेने झाला. या प्रचार सभेतून मार्गदर्शन करताना खासदार शाहू छत्रपती बोलत होते. यावेळी काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील प्रमुख उपस्थित होते.
उमेदवार राजेश लाटकर म्हणाले, मी कुणाला त्रास देणार नाही, जातियवाद घडवणार नाही. सर्व नगरसेवकांना सामावून घेवून काम करणार. गेल्या तीन वर्षात महायुती सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतलेल्या नाहीत. त्यामुळे हि एक प्रकारे अदृश्य हुकुमशाहीच आहे. केवळ बाबासाहेबांचे नाव घेवून लोकशाहीचा कांगावा महायुती सरकार करत आहे.
यावेळी सरोज पाटील, शिवसेना सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी, राष्ट्रवादी शहराध्यक्ष आर. के. पोवार, आपचे संदीप देसाई, सतीशचंद्र कांबळे, अतुल दिघे, भारती पोवार, चंद्रकांत यादव आदींची भाषणे झाली. सभेला आमदार जयंत असगांवकर, माजी महापौर निलोफर आजरेकर, काँग्रेसचे उत्तर मतदार संघाचे निरिक्षक सुखवंतसिंग ब्रार, आमदार हसन मौलाना, दौलत देसाई आदींसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी आभार मानले.
महाविकास आघाडीसाठी हि निवडणुक आहे, पण शिवसेनेसाठी हि निवडणुक एक युद्ध आहे. 2019 च्या विधानसभेला पराभव झाल्यानंतरही ज्या मातोश्रीने कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा देत मानसन्मान दिला, त्याच मातोश्रीच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या उत्तरमधील गद्दाराला गाडल्या शिवसैनिक स्वस्थ बसणार नसल्याचे शिवसेना उपनेते संजय पवार यांनी सांगितले.
राजेश लाटकर यांचा पेठांमध्ये संपर्क नाही त्यांना पेठांमधून मते मिळणार नाहीत, असा प्रचार सुरु आहे. पण सर्वच पेठा, तालीम या कोल्हापूरचा आत्मा आहेत. येथे गद्दारी कधीही खपवून घेतली जात नाही. पेठांमधील वातावरण पाहता लाटकर यांना पेठांमधूनच मोठे मताधिक्य मिळेल, असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला.
कोल्हापूरची जनता विरुद्ध राजेश क्षीरसागर अशी ही निवडणुक : आमदार सतेज पाटील
कोल्हापूरच्या विकास कामात कोणी खोडा घातला. टक्केवारीसाठी वर्क ऑर्डर कोणी थांबविल्या, मविआ सरकारने दिलेल्या 40 कोटींच्या निधीनंतर अंबाबाई तीर्थ क्षेत्र विकासाठी एक रुपयाचाही निधी आलेला नाही, 100 कोटींचे रस्ते दुर्बिण घेवून शोधावे लागत आहेत. 4500 कोटींचा निधी कुठे गेला? सत्ताधाऱ्यांनी केवळ विकासकामांचे मोठे आकडे दाखवत फसवणुक केल्याने कोल्हापूरच्या स्वाभिमानाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे हि निवडणुक आता कोणत्या पक्षाची नसून कोल्हापूरची स्वाभिमानी जनता विरुद्ध राजेश क्षीरसागर अशी बनली आहे, अशा शब्दात काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला.