विरोधकांनी बिनबुडाचे आरोप करू नयेत
मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा टोला : कागदपत्रांसह आरोप करण्याचे आव्हान
प्रतिनिधी/ बेंगळूर
60 टक्के कमिशन घेत असल्याचा केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचा आरोप निराधार आणि हवेत गोळी झाडण्यासारखा आहे. विरोधी पक्षांनी केवळ आरोप न करता कागदपत्रांसह आरोप केले पाहिजेत आणि ते आरोप सिद्ध झाले पाहिजेत. बिनबुडाचे आरोप करू नयेत, असा टोला मुख्यमंत्री सिद्धरामय्या लगावला. दावणगेरे येथील एम. ग्राऊंड हेलिपॅडच्या आवारात पत्रकारांशी बोलताना ते बोलत होते. केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी काँग्रेस सरकारमध्ये 60 टक्के कमिशन घेतले जात असल्याच्या केलेल्या आरोपावर सिद्धरामय्यांनी वरील प्रतिक्रिया दिली.
राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या (केएसआरटीसी) बस तिकीट दरवाढीवर बोलताना, भाजप-निजद पक्ष सत्तेवर असतानाही बस तिकीट दरात वाढ करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांचे पगार, डिझेलच्या दरात वाढ, बस खरेदी आणि महागाई दरात वाढ झाली आहे. परिणामी, वाहतूक कंपन्या अडचणीत आल्याने व मागणी असल्याने वर्षापूर्वी दरवाढ करण्यात आले आहे. भाजप आणि कुमारस्वामी सत्तेवर असताना तिकीट दरात वाढ केली का? केंद्र सरकारने रेल्वे तिकिट दर वाढवलेले नाही का, असा सवाल सिद्धरामय्या यांनी केला.
ता.पं. आणि जि. पं. निवडणुका घेण्यास तयार
जिल्हा व तालुका पंचायत निवडणुका होऊन पाच वर्षे पूर्ण झाली आहेत या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सिद्धरामय्या यांनी, हे प्रकरण न्यायालयात गेले असून तिथेच मिटले पाहिजे. तालुका आणि जिल्हा पंचायत निवडणुका घेण्यासाठी आम्ही तयार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
अंतर्गत आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध
अंतर्गत आरक्षण द्यावे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे कोणतीही व्यावहारिक माहिती नसल्याने नागमोहन दास यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. अंतर्गत आरक्षण देण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध असल्याचेही सिद्धरामय्या म्हणाले.