सदाशिवगड येथे चेस क्लब,बसथांब्याचे उद्घाटन
कारवार : लहानपणापासून बुद्धिबळ खेळ खेळला तर मुलांमध्ये आत्मविश्वास, एकाग्रता, स्मरणशक्ती वाढीला लागते. मुले, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वांनी चेस पार्कचा लाभ उठवावा, असे आवाहन कारवार-अंकोलाचे आमदार सतीश कृष्णा सैल यांनी केले. ते सोमवारी सदाशिवगड ग्रामपंचायतीच्या व्याप्तीतील मराठी शाळेच्या आवारात उभारण्यात आलेल्या चेस क्लब आणि बसथांब्याच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. हा उपक्रम कारवार जि. पं. आणि सदाशिवगड ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला आहे. सैल पुढे म्हणाले, कारवार जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पंचायततर्फे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी अनेक योजना हाती घेण्यात आल्या आहेत. विकासकामे हाती घेतली जात असताना तक्रारी आणि आक्षेप घेणे योग्य नव्हे. अभिवृद्धीद्वारेच स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतो. अभिवृद्धी घडवून आणण्यासाठी सल्ले आणि सूचना देऊन कोणत्याही प्रकारचे राजकारण करू नये. राजकारणामुळे विकासाला खीळ बसते. याप्रसंगी कारवार जिल्हाधिकारी के. लक्ष्मीप्रिया, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यदर्शी ईश्वरकुमार कांदू यांची समयोचित भाषणे झाली. यावेळी सदाशिवगड ग्रामपंचायतीचे अध्यक्ष नितीन आनंद बांदेकर, उपाध्यक्ष सुरज देसाई, अधिकारी विनोद अणवेकर, सोमशेखर मेस्तासह अनेक चेसप्रेमी उपस्थित होते.