For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जम्मू-काश्मीरात मोडली विरोधी आघाडी

06:24 AM Apr 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
जम्मू काश्मीरात मोडली विरोधी आघाडी
Advertisement

पाचही जागांवर उमेदवार देण्याची पीडीपीची घोषणा

Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनगर

पश्चिम बंगाल, पंजाब, बिहार, केरळ आदी राज्यांपाठोपाठ आता जम्मू-काश्मीरमध्येही विरोधी पक्षांची आघाडी बिघडली आहे. या केंद्रशासित प्रदेशात काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी असे तीन पक्ष विरोधी पक्षांच्या आघाडीचे सदस्य आहेत. तथापि, पीडीपीने या प्रदेशातील सर्व पाच जागांवर निवडणूक लढविण्याची घोषणा केल्यामुळे आघाडी फिस्कटल्याचे दिसत आहे.

Advertisement

डॉ. फारुख अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष आणि मेहबुबा मुफ्ती यांचा पीडीपी हा पक्ष यांच्या जागांसंबंधी समझोता होऊ शकला नाही. चर्चेच्या अनेक फेऱ्या गेल्या कित्येक दिवसांमध्ये झाल्यानंतरही दोन्ही पक्षांना पटेल असे जागावाटप होऊ शकले नाही. काँग्रेस पक्षाच्याही काही मागण्या होत्या. त्या पूर्ण करणेही अवघड असल्याने शेवटी पीडीपीने सर्व जागांवर लढण्याचा निर्णय घेतला.

नॅशनल कॉन्फरन्सची घोषणा

नॅशनल कॉन्फरन्सनेही काश्मीर खोऱ्यातील तीन जागा स्वत: लढविण्याचा निर्णय घोषित केला आहे. तसेच जम्मू क्षेत्रातील दोन जागा काँग्रेसला सोडल्या आहेत. या दोन पक्षांना पाचही जागांची अशी आपापसात वाटणी करुन घेतल्याने नाराज झालेल्या पीडीपी पक्षाने सर्व जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने आपल्याला विश्वासात न घेतल्याचा या पक्षाचा दावा आहे. अशाप्रकारे या केंद्रशासित प्रदेशात आघाडी नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रदेशाचे एकसंधत्व आवश्यक

केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विषेश दर्जा देणारा घटनेतील अनुच्छेद 370 आणि अनुच्छेद 35 अ निष्प्रभ केलेला आहे. अशा स्थितीत हा प्रदेश एकसंध राहणे आवश्यक आहे. तो तसा राहण्यासाठी सर्व विरोधी पक्षांची एकजूट असणे आवश्यक आहे, अशी मल्लिनाथीही मेहबुबा मुफ्ती यांनी केली. मात्र, त्यांनी याचवेळी सर्व जागा लढविण्याची घोषणाही केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Advertisement
Tags :

.