‘अग्निपथ’मुळे वाढणार देशाची ताकद
कारगिल दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दावा : युद्धातील हुतात्म्यांना अभिवादन
वृत्तसंस्था/ द्रास, कारगिल
कारगिल विजय दिवसाच्या 25 व्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी लडाखमधील 1999 च्या युद्धातील वीरांना श्र्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी सुमारे 20 मिनिटांच्या भाषणात त्यांनी पाकिस्तान, दहशतवाद, जम्मू-काश्मीर, लडाख, अग्निपथ योजना आणि विरोधी पक्षांच्या भूमिकेवर भाष्य केले. ‘अग्निपथ’ योजनेचे उद्दिष्ट सैन्याला तऊण ठेवणे हे असून यावरही विरोधक राजकारण करत असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला.
26 जुलै 1999 रोजी भारताने कारगिल युद्ध जिंकले. हा दिवस दरवषी कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. याच अनुषंगाने पंतप्रधान शुक्रवारी काश्मीर, लडाखच्या दौऱ्यावर पोहोचले. याचदरम्यान त्यांनी द्रास येथील कारगिल युद्ध स्मारकावर कारगिल युद्धातील वीरांना श्र्रद्धांजली वाहिली. त्यानंतर केलेल्या भाषणात त्यांनी अग्निपथ योजनेमुळे देशाची ताकद वाढेल असा दावा व्यक्त करतानाच देशातील सक्षम तऊणही मातृभूमीच्या सेवेसाठी पुढे येतील अशी अपेक्षा व्यक्त केली. काही लोकांची समजूत आणि धारणा वेगळीच आहे. त्यांची विचारसरणीच ‘विरोधी’ असल्यामुळे ते जनतेमध्ये वेगवेगळे भ्रम पसरवत आहेत, असा हल्लाबोल पंतप्रधानांनी केला. आज माझ्यासाठी ‘पक्ष’ नाही तर ‘देश’ सर्वोच्च आहे. आम्ही राजकारणासाठी नाही तर राष्ट्रीय धोरणासाठी काम करतो. आमच्या लष्कराने गेल्या काही वर्षांत अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत. अग्निपथ योजना हेही त्याचेच उदाहरण आहे. लष्कराला तऊण आणि सक्षम बनवणे हा अग्निपथचा उद्देश आहे. विरोधी पक्षांनी लष्कराला राजकारणाचा आखाडा बनवले. त्यांच्या घोटाळ्यांमुळे सैन्य कमकुवत झाले, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
सुरक्षा दलाला ‘तरुण’ करण्याचे ध्येय
अनेक दशकांपासून भारतीय सैन्याचे वय तऊण असण्याची चर्चा होती. मात्र यावर कोणताही तोडगा निघाला नाही. आता त्यावर सरकारने योग्य अंमलबजावणीच्या दिशेने पावले टाकलेली आहेत. अग्निपथचे ध्येय सैन्याला युद्धासाठी तंदुऊस्त ठेवणे हे आहे. या योजनेतून सरकार पेन्शनचे पैसे वाचवत असल्याचा भ्रम विरोधक पसरवत आहेत. पेन्शनचे पैसे वाचवण्यासाठी लष्कराने ही योजना आणल्याचा आरोप केला जात आहे. विरोधक देशाच्या तऊणांची दिशाभूल करत आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. त्यांना सैनिकांची पर्वा नाही हे त्यांच्या इतिहासावरून दिसून येते. आमच्यासाठी मात्र देशाची सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे. आम्ही 140 कोटी लोकांच्या शांततेला प्राधान्य देतो, असेही पंतप्रधानांनी सांगितले.
लडाख, काश्मीरच्या विकास प्रकल्पांना गती
जम्मू-काश्मीरमध्ये आता बरेच बदल होऊ लागले आहेत. लडाखमध्ये सिंधू केंद्रीय विद्यापीठ बांधले जात आहे. संपूर्ण लडाखला 4-जी नेटवर्कने जोडण्याचे कामही सुरू आहे. 13 किमी लांबीच्या झोजिला बोगद्याचे कामही सुरू आहे. त्याच्या बांधकामामुळे राष्ट्रीय महामार्गावर देखील सर्व हवामान कनेक्टिव्हिटी असेल. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने गेल्या 3 वर्षांत 330 हून अधिक प्रकल्प पूर्ण केले आहेत. येत्या 5 ऑगस्टला काही दिवसांत कलम 370 रद्द होऊन 5 वर्षे पूर्ण होतील. जी20 सारख्या महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यासाठी जम्मू-काश्मीरची ओळख आहे. पायाभूत सुविधांच्या विकासासह झपाट्याने विकास होत आहे, असे दावेही पंतप्रधानांनी केले.
केवळ राजकीय स्वार्थासाठी...
दुर्दैवाने काही लोकांनी राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित अशा संवेदनशील विषयाला राजकारणाचा विषय बनवले आहे. विरोधक आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी लष्कराच्या या सुधारणेवर खोट्याचे राजकारणही करत आहेत. त्यांनी हजारो कोटींचे घोटाळे करून आपली शक्ती कमकुवत केली. हे तेच लोक आहेत ज्यांना हवाई दलाला कधीही आधुनिक लढाऊ विमाने मिळू नयेत अशी इच्छा होती. हे तेच लोक आहेत ज्यांनी तेजस फायटर प्लेन एका बॉक्समध्ये बंद करण्याची तयारी केली होती, असे अनेक आरोप पंतप्रधानांनी विरोधकांवर केले.
काँग्रेस अध्यक्ष खर्गेंचा प्रतिटोला
पंतप्रधानांच्या वक्तव्यावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, मोदी म्हणत आहेत की त्यांच्या सरकारने लष्कराच्या सांगण्यावरून अग्निपथ योजना लागू केली. मात्र, त्यांचा हा दावा खोटा आहे. हा लष्कराचा अपमान आहे. कारगिल विजय दिवसानिमित्त पंतप्रधान क्षुद्र राजकारण करत आहेत हे दुर्दैवी आहे. यापूर्वी कोणत्याही पंतप्रधानांनी असे केले नव्हते.