नॉर्वेत मिळाला सर्वात जुना शिलालेख
200 वर्षे जुन्या दगडामुळे रहस्यांची होणार उकल
नॉर्वेमध्ये पुराततत्व तज्ञांनी एक नवा शोध लावला आहे. पुरातत्व तज्ञांनुसार त्यांनी जगातील सर्वात जुना रुनस्टोन शोधला आहे. रुनस्टोन असे दगड असतात, ज्यावर प्राचीन काळातील मानवांनी रुनी वर्णमाला कोरली आहे. संशोधकांनुसार हा शिलालेख 2 हजार वर्षे जुना असून रुनी लेखनाच्या गूढ इतिहासाच्या प्रारंभिक दिवसांमधील आहे. करडय़ा रंगाच्या बलुआ दगडाच्या चौकोनी भागात अक्षरे कोरण्यात आली आहेत. हे बहुधा स्कँडिनेवियन शब्दांचे पहिले उदाहरण असू शकते असा दावा ओस्लोमधील सांस्कृतिक इतिहासाच्या संग्रहालयाने केला आहे.
हा सर्वात जुन्या शिलालेखांपैकी एक आहे. हा जगातील सर्वात जुना डाटायोग्य रुनस्टोन आहे. हा शोध आम्हाला प्रारंभिक लोहयुगात रुन्सच्या वापराबद्दल बरेच काही ज्ञान देणारा आहे. नॉर्वे आणि स्कँडेनेवियामध्ये दगडावर रुनी अक्षरांच्या वापराचा हा पहिला प्रयत्न असू शकतो. रुनी वर्णमाला पूर्वीही अनेक गोष्टींवर कोरण्यात आलेली आहे, परंतु एखाद्या दगडावर हा प्रकार पहिल्यांदाच आढळून आला असल्याचे ओस्लो युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापिका क्रिस्टेल जिल्मर यांनी म्हटले आहे.
चाकू किंवा सुईच्या टोकाचा वापर करत ही अक्षरे कोरण्यात आली असावीत. 2021 च्या अखेरीस नॉर्वेची राजधानी ओस्लोच्या पश्चिमेस असलेल्या टायरिफजॉर्डनजीक एका दफनभूमीच्या उत्खननादरम्यान रुनस्टोनचा शोध लागला होता. येथे मिळालेली हाडं, लाकूड आणि कोळशाच्या तपासणीनंतर हा दगड ख्रिस्तपूर्व 1 पासून ख्रिस्तपूर्व 250 सालादरम्यानचा असावा असे मानले गेले आहे. रुनस्टोनचे विश्लेषण आणि त्याची तारीख शोधून काढण्यासाठी आणखी काही काळाची गरज असल्याचे जिल्मर यांनी सांगितले आहे.
शिलालेखावरील मजकूर
या दगडाची लांबी 31 सेंटीमीटर आणि रुंदी 32 सेंटीमीटर आहे. यावर अनेक प्रकारच्या आकृती कोरण्यात आल्या असून त्याबद्दल अद्याप फारसे जाणून घेता आलेले नाही. दगडाच्या पुढील हिस्स्यावर ‘इडिबेरुग’ लिहिले असून ते एखादी महिला किंवा पुरुष किंवा कुटुंबाचे नाव असू शकते. जिल्मर यांनी या शिलालेखाला स्वतःच्या कारकीर्दीतील सर्वात महत्त्वाचा शोध ठरविले आहे. या दगडामुळे आम्हाल अनेक महत्त्वपूर्ण माहिती मिळणार हे निश्चित आहे. रुनी वर्णमालेचा वापर प्राचीन उत्तर युरोपमध्ये केला जात होता असे त्यांनी म्हटले आहे.