तहसीलदारांच्या केबिनमध्येच अधिकाऱ्याची आत्महत्या
गळफास घेऊन संपविले जीवन : तहसीलदारांसह तिघा जणांविरुद्ध एफआयआर दाखल
बेळगाव : तहसीलदार कार्यालयातील एका अधिकाऱ्याने तहसीलदारांच्या कक्षात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेने एकच खळबळ माजली आहे. मंगळवारी सायंकाळी तहसीलदारांसह तिघा जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. रुद्रण्णा दुंडाप्पा यडवण्णवर (वय 34) असे त्या दुर्दैवी अधिकाऱ्याचे नाव आहे. तो तहसीलदार कार्यालयात एसडीए म्हणून सेवा बजावत होता. रुद्रण्णा मूळचा रायबाग तालुक्यातील मुगळखोडचा, सध्या आंबेडकरनगर येथे त्याचे वास्तव्य होते. मंगळवार दि. 5 नोव्हेंबर रोजी सकाळी तहसीलदारांच्या कक्षातच त्याने गळफास घेऊन आपले जीवन संपविल्याचे उघडकीस आले आहे.
व्हॉटसअॅप ग्रुपवर संदेश
रुद्रण्णाची सोमवारी सौंदत्ती येथील पर्यटन विकास मंडळावर बदली करण्यात आली होती. बदलीनंतर तो अस्वस्थ झाला होता. या अधिकाऱ्याने सोमवारी रात्री 7.31 वाजण्याच्या सुमारास तहसीलदार कार्यालयासाठीच्या व्हॉटसअॅप ग्रुपवर संदेश पाठविले आहेत. तहसीलदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठीचा तो ग्रुप आहे. आपल्या मृत्यूला तहसीलदार बसवराज नागराळ, सोमू हेच थेट कारणीभूत आहेत, असा उल्लेख रुद्रण्णा याने केला आहे. त्यानंतर आणखी एक संदेश पाठवून अशोक कब्बलिगेर या नावाचा उल्लेख केला आहे. खडेबाजार पोलीस पुढील तपास करीत आहेत.
वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर फॉरेन्सिक तज्ञांना पाचारण करण्यात आले. तालुका दंडाधिकाऱ्यांच्या कार्यालयात त्यांच्याच कार्यालयातील अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना असल्यामुळे पोलीस दलानेही ही घटना गांभीर्याने घेतली आहे. घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर खडेबाजार पोलीस स्थानक आहे. पोलीसही सकाळी 11 नंतर पोहोचले. रुद्रण्णाने मंगळवारी सकाळी आत्महत्या केल्याचा संशय आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून नेमकी माहिती मिळवण्याचे प्रयत्न पोलीस अधिकाऱ्यांनी सुरू केले आहेत.
रुद्रण्णाने तहसीलदार कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या व्हॉटसअॅप ग्रुपमध्ये सोमवारी रात्री 7.31 वाजता आपल्या मृत्यूला तहसीलदारांसह तिघे जण कारणीभूत असल्याचा संदेश पाठविला आहे. त्यानंतर कोणीतरी जबाबदार व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधून त्याची अडचण तरी काय? हे जाणून घेतले असते. कदाचित रुद्रण्णावर अशी वेळ आली नसती. मात्र रुद्रण्णाची पत्नी गिरीजा यांनी लगेच त्याच्याशी संपर्क साधून बदली झाली म्हणून त्रास करून घेऊ नका, उद्या आपण वरिष्ठांशी संपर्क साधून चर्चा करू, असा धीर दिला होता. त्यानंतर रुद्रण्णा जेवणासाठी घरी गेला होता. जेवण करताना मध्येच त्याला कोणाचा तरी फोन आला. जेवण अर्ध्यावर सोडून तो घरातून बाहेर पडला. मंगळवारी सकाळी त्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. दिवाळीनिमित्त गिरीजा मोहरे (ता. बैलहोंगल) येथील आपल्या माहेरी गेली होती. त्यावेळी ही घटना घडली आहे.
सखोल चौकशी होणार-पालकमंत्री
रुद्रण्णा यडवण्णवर या अधिकाऱ्याच्या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. सध्या पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. चौकशीनंतरच आत्महत्येचे खरे कारण स्पष्ट होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली आहे.
आत्महत्येचे कारण काय?
तहसीलदार कार्यालयातील अधिकाऱ्याने तहसीलदारांच्या कक्षात आत्महत्या का केली? याचा शोध घेण्यात येत आहे. कुटुंबीयांनी तहसीलदार बसवराज नागराळ, सोमू, अशोक कब्बलिगेर या तिघा जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. रुद्रण्णाच्या आत्महत्येला हेच तिघेजण कारणीभूत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.