For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सामाजिक वनीकरणाच्या नर्सरीला आला बहर

10:32 AM Apr 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
सामाजिक वनीकरणाच्या नर्सरीला आला बहर
Advertisement

बेळगाव : येत्या पावसाळ्यात सामाजिक वनीकरण विभागामार्फत विविध ठिकाणी दहा हजारांहून अधिक रोपांची लागवड केली जाणार आहे. यासाठी चन्नम्मानगर येथील नर्सरीमध्ये बीजारोपण करून रोपांची जोपासना केली जात आहे. त्यामुळे सामाजिक वनीकरणाची नर्सरी विविध रोपांनी बहरू लागली आहे. पर्यावरणाचा समतोल राखावा आणि वृक्षसंपदा वाढावी यासाठी सामाजिक वनीकरण विभागामार्फत खुल्या जागा, प्राथमिक आरोग्य केंद्रे, शाळा आणि रस्त्यांच्या दुतर्फा विविध रोपांची लागवड केली जाते. यंदादेखील विभागाने दहा हजार रोप लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी नर्सरीत रोपवाटिकेचे काम सुरू झाले आहे. यामध्ये पिंपळ, फणस, आंबा, वड, सागवान आदी रोपांचा समावेश आहे.

Advertisement

वनीकरण विभागामार्फत विशेषत: ग्रामीण भागातीर्ल रस्त्यांवर दुतफा आणि इतर ठिकाणच्या रोप लागवडीला प्राधान्य दिले जाते. एप्रिल महिन्यातच नवीन रोप निर्मितीला चालना देण्यात आली आहे. चन्नम्मानगर येथील नर्सरीमध्ये विविध जातीच्या रोपांची लागवड करून संवर्धन केले जाते. यंदा पावसाळ्यात समाधानकारक पावसाची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे सामाजिक वनीकरण विभागामार्फत अधिक रोप लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. नर्सरीमध्ये प्लास्टिक पिशव्या आणि रोप वाटीकेत रोपांची निर्मिती केली जाते. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच विविध रस्त्यांवर ही रोपे लावली जाणार आहेत. यासाठी आतापासूनच विभागामार्फत रोपांची काळजी घेतली जात आहे. नर्सरीत रोपे जोमाने यावीत, यासाठी कर्मचाऱ्यांकडून देखभाल केली जात आहे.  बीजारोपण करून हजारो रोपे तयार केली जात आहेत. पावसाळ्यादरम्यान विविध ठिकाणी लागवड करून सर्वत्र हिरवळ पसरविली जाणार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.