राज्याच्या तुलनेत विद्यापीठात मुलींची संख्या अव्वल
कोल्हापूर :
राज्यभरातील नामवंत विद्यापीठांमध्ये मुलींच्या संख्येत घट होत असताना शिवाजी विद्यापीठात मात्र मुलींमध्ये वाढ होत आहे. महाविद्यालयासह अधिविभागात शिक्षण घेण्यातही मुलीच अव्वल असल्याचे चित्र आहे. तिन्ही जिल्ह्यातील महाविद्यालयात 1 लाख 14 हजार 82 तर अधिविभागांमध्ये 2 हजार 647 मुली सध्या शिक्षण घेत आहेत. तसेच यंदा 28 हजार 592 विद्यार्थीनी पदवी प्रमाणपत्र घेणार आहे. शिक्षणाबरोबर संशोधनातही मुली अव्वल आहेत. ग्रामीण भागातील विद्यापीठांमध्ये मुलींची संख्या वाढणे शिवाजी विद्यापीठासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
शिवाजी विद्यापीठाची स्थापना 1962 मध्ये झाली आहे. परंतू पहिल्या दीक्षांत समारंभ 1964 साली झाला. तेंव्हा 199 मुलींनी पदवी प्रमाणपत्र घेतली होती. ती 1974 मध्ये 1623 तर 1984 मध्ये 3268 झाली. 2018 च्या पदवी प्रदान कार्यक्रमात पदवी स्वीकारणाऱ्या मुलींची संख्या 26 हजार 938 इतकी होती. 2023 मध्ये 21 हजार 963 मुलांनी पदवी प्रमाणपत्र स्विकारले. तर यंदा हीच संख्या 28 हजार 592 वर गेली आहे. याचाच अर्थ मुलींच्या संख्येत 60 टक्केपेक्षा जास्त वाढ झाली आहे. मुलींची संख्येत सातत्याने वाढ होत आहे. गतवर्षी राष्ट्रपती सुवर्णपदक आणि कुलपती सुवर्णपदकही मुलींनाच मिळाले होते. यंदा मात्र राष्ट्रपती सुवर्णपदक बंडू कोळीला तर कुलपती सुवर्णपदक नोरोन्हा अल्दा यांना मिळाले आहे.
अध्यापनाच्या क्षेत्रात विद्यापीठाने सुरूवात ही सहा अधिविभागापासून केली होती. सुरूवातीला पारंपरिक अभ्यासक्रम सुरू केल्यानंतर या भागातील शिक्षणाची गरज ओळखून विद्यापीठाने व्यावसायीक अभ्यासक्रमही सुरू केले. शिक्षणशास्त्र, विधी, व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या यशस्वी प्रयोगानंतर विद्यापीठाने तंत्रज्ञान अधिविभाग सुरू केला आहे. जुन्या पारंपरिक अभ्याक्रमाला नविनतम अभ्यासक्रमाची जोड देण्याचा विद्यापीठ प्रयत्न करत आहे. विद्यापीठात सध्या जवळपास 48 महाविद्यालये आहेत. यामध्ये व्यवसायिक अभ्यासक्रमाचीही संख्या उल्लेखनीय असून यामध्ये जास्तीत जास्त मुली शिक्षण घेत आहेत. सुरूवातीला विद्यापीठात अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांची 60 टक्केपेक्षा जास्त वाढली आहे. या विद्यार्थीनींना राहण्यासाठी वसतिगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच वाढत्या विद्यार्थीनींची संख्या पाहून वसतिगृहाच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. सध्या 4 वसतिगृह असली तरी दिवसेंदिवस वसतिगृह अपुरी पडत असल्याचे लक्षात येत आहे. त्यामुळेच लोकसहभागातून वसतिगृहांची उभारणी करण्याची संकल्पना विद्यापीठ प्रशासनाने राबवली आहे. तसेच सुरक्षाही कडक असल्याने पालकांनी वसतिगृहात राहून शिक्षण घेण्याची परवानगी आपल्या मुलींना दिली आहे. याचाच अर्थ शिवाजी विद्यापीठ मुलींची संख्या वाढण्यासाठी वारंवार प्रयत्न करीत असल्याचे सिध्द होत आहे.
- विद्यापीठ अंतर्गत कॉलेज स्तरावरील प्रमाण
अभ्यासक्रम मुले मुली एकूण
पदवी 8077 10936 19013
पदव्युत्तर 100281 103146 203041
- शिवाजी विद्यापीठ अधिविभाग
अभ्यासक्रम मुले मुली एकूण
पदवी 1497 2113 3610
पदव्युत्तर 861 534 1395