नोकरदारांकडे रिक्षा परवाना असल्यास कारवाई
प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर
31 जानेवारीपर्यंत परवाना जमा करण्याचे आवाहन
कोल्हापूर
रिक्षा परवाना घेतल्यानंतर नोकरी लागल्यास रिक्षा परवाना प्रादेशिक परिवाहन विभागाकडे जमा करणे बंधनकारक केले आहे. काहींकडून परवाना जमा केला जात नाही. संबंधितांनी 31 जानेवारी 2025 पर्यंत परवाना जमा करावा, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी पत्रकाद्वारे केला आहे.
यामध्ये त्यांनी म्हटले आहे, प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रामध्ये ऑटोरिक्षा परवाना संख्या मर्यादीत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा निर्णय शासन अधिसूचना 17 जून 2017 अन्वये विखंडीत केल्याने सध्या खुले ऑटोरिक्षा परवाना धोरण राबविण्यात येत आहे. ऑटोरिक्षा परवाना धारण करताना अथवा परवाना धारण केल्यावर परवानाधारक सरकारी, निमसरकारी, खासगी कंपनीत अथवा संघटीत क्षेत्रातील इतर कोणत्याही संस्थेत, उद्योगात नोकरी करीत नसावेत, अशी प्राधिकरणाची अट आहे. यानुसार शासन निर्णय 18 जुलै 2017 मधील अनुक्रमांक 3 नुसार अर्जदार तो सरकारी, निमसरकारी, खासगी कंपनीत अथवा संघटीत क्षेत्रातील इतर कोणत्याही संस्थेत, उद्योगात नोकरी करीत नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक राहील, असे विहित केले आहे. अशा पध्दतीने धारण केलेले ऑटोरिक्षा परवाने निदर्शनास आल्यास त्यांच्यावर मोटार वाहन कायदा व प्राधिकरणाने विहीत केलेल्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असे प्रादेशिक अधिकारी भोर यांनी पत्रकात म्हटले आहे.
नोकरीमध्ये असणाऱ्या व्यक्तींनी ऑटोरिक्षा परवाना प्राप्त केला असल्यास अथवा परवाना प्राप्त केल्यानंतर ते नोकरीत रुजू झाले आहेत. अशा व्यक्तींना 31 जानेवारी 2025 पूर्वी त्यांचे ऑटोरिक्षा परवाने प्रादेशिक परिवहन कार्यालयात स्वेच्छेने जमा करावेत.
संजीव भोर, प्रादेशिक परिवहन अधिकारी