राज्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण थांबेना!
गेल्या वर्षात राज्यभरात 981 शेतकऱ्यांनी संपविले जीवन : बेळगाव जिल्ह्यात 71 प्रकरणांची नोंद : कर्जाची समस्या, पिकांच्या नुकसानीचे कारण
बेंगळूर : कृषी, फलोत्पादन, पशुधन आणि पशुसंवर्धन खात्यांमार्फत राज्यात मोफत वीज, शून्य व्याजदरातील पीक कर्ज, अनुदान आणि सवलती अशा अनेक योजना राबवूनही राज्यातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण थांबलेले नाही. दरडोई उत्पन्नात कर्नाटक पहिल्या क्रमांकावर असला तरी शेकडो शेतकरी अजूनही आत्महत्येचे पाऊल उचलताना दिसत आहेत. राज्य सरकारने पाच गॅरंटी योजना राबवत लोकांच्या मदतीसाठी धाव घेतली आहे. तथापि, गेल्या एका वर्षात राज्यात 981 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कर्जाच्या समस्या, पिकांचे नुकसान आदी कारणांमध्ये शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. उपलब्ध माहितीनुसार, 1 एप्रिल 2024 ते 25 मे 2025 पर्यंत राज्यात 981 शेतकरी आत्महत्या प्रकरणांची नोंद झाली आहे.
यापैकी 807 प्रकरणांमध्ये सरकारने मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई दिली आहे. तर 138 शेतकरी आत्महत्या प्रकरणे नाकारण्यात आली असून इतर कारणांमुळे आत्महत्या केल्याचे प्रकरण म्हणून विचारात घेण्यात आले. 825 प्रकरणे पात्र मानण्यात आली असून आणखी 18 प्रकरणांमध्ये सरकारने अद्याप भरपाई दिलेली नाही. या काळात हावेरी जिल्ह्यामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. तर बेंगळूर ग्रामीण, बेंगळूर शहरी, कोलार आणि उडुपी जिल्ह्यांमध्ये एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केलेली नाही. चिक्कबळ्ळापूर जिल्ह्यात एका शेतकऱ्याने आत्महत्या केली असून 21 जिल्ह्यांमध्ये दहाहून अधिक तर सहा जिल्ह्यांमध्ये 10 पेक्षा कमी शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे.
सरकारचे शेतकऱ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष : आर. अशोक
राज्यात यंदा एक महिना आधीच पावसाळा सुरू झाला असला तरी राज्य सरकारने शेतकऱ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावर ट्विट केले आहेत. राज्य सरकार शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या खतांचा साठा आणि वितरण यावर लक्षकेंद्रित करायला हवे होते. मात्र, सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असून हे योग्य नाही. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री खुर्चीच्या वादात शेतकऱ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. परिणामी, शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतकरी आत्महत्येचे पाऊल उचलत आहेत. सरकारने लवकरच जागे व्हावे, असेही ते म्हणाले.