‘शक्ती’च्या लाभार्थ्यांची संख्या 500 कोटी पार
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बेंगळुरात 500 कोटीवे तिकीट वितरण
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य सरकारच्या गॅरंटी योजनांपैकी एक असलेल्या ‘शक्ती’ योजनेंतर्गत मोफत बस प्रवास केलेल्या लाभार्थ्यांची संख्या 500 कोटी पार झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोमवारी सांकेतिकपणे 500 वे मोफत बसतिकीट वितरण केले. तसेच लता नामक महिलेचा सत्कार केला. तसेच त्या बसमधील महिलांना इळकल साड्या व मिठाईचे वाटप केले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, परिवहन मंत्री रामलिंगारे•ाr उपस्थित होते.
बेंगळूरमधील कुमार पार्क रोडवरील विन्सर मॅनर सर्कलजवळ आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बेंगळूर शहर परिवहनच्या बसमध्ये एका महिलेला 500 कोटीवे तिकीट वितरित केले. मुख्यमंत्र्यांनी कंडक्टरची भूमिका बजावत काही अंतर बसप्रवासही केला.
राज्य सरकारच्या शक्ती योजनेला 11 जून 2023 रोजी चालना देण्यात आली होती. या योजनेंतर्गत आतापर्यंत 500 कोटी महिलांनी मोफत बसप्रवास केला आहे. दररोज सरासरी 20 लाख तिकिटांचे वितरण होत आहे. या योजनेसाठी सरकारने आतापयीत 12,500 कोटी रुपये खर्च केले आहेत.
गॅरंटी योजना स्थगित करणार नाही : डी. के. शिवकुमार
शक्ती योजना देशासाठी आदर्श आहे. कोणत्याही कारणास्तव आमचे सरकार गॅरंटी योजना स्थगित करणार नाही. जोपर्यंत आम्हला परमेश्वराने ताकद आणि जनतेने अधिकार दिले आहेत, तोपर्यंत या योजना सुरुच राहतील, असे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सांगितले. काँग्रेस पक्षाने देशातील जनतेला अनेक कल्याणकारी कार्यक्रम राबविले आहेत. अनेक पेन्शन योजना, रोजगार हमी योजना, बँकांचे राष्ट्रीयीकरण या आम्ही जारी केलेल्या योजना भाजपसह कोणीही थांबविणे शक्य नाही, असे ते म्हणाले.
कोट्स...
शक्ती योजनेमुळे परिवहन महामंडळाला लाभ
शक्ती योजनेमुळे राज्य परिवहन महामंडळाला (केएसआरटीसी) कोणताही तोटा झालेला नाही. या योजनेमुळे लाभ झाला आहे. शक्ती योजना कोणत्याही कारणास्तव स्थगित करणार नाही. पोटशूळ उठत असल्याने भाजप नेते अपप्रचार करत आहेत. परिवहन व्यवस्था फायद्यासाठी नव्हे तर सार्वजनिक सेवेसाठी असते.
- रामलिंगारेड्डी, परिवहन मंत्री