जीएसटीची पुढील बैठक 23 रोजी होणार गोव्यात
मुख्यमंत्री प्रमोद सावंत बैठकीचे यजमान
पणजी : जीएसटी कौन्सिल मंडळाच्या रियल इस्टेट विभागाचे राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्व गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे करीत असून त्याची पुढील बैठक येत्या दि. 23 सप्टेंबर रोजी गोव्यात होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनीच वरील माहिती दिली. रियल इस्टेट विभागाचे अध्यक्षपद केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे सोपविले आहे. त्यानंतर या विभागाची राष्ट्रीय पातळीवर डॉ. प्रमोद सावंत यांनी दोन वेळा नवी दिल्लीत बैठक घेतली. आता तिसरी बैठक येत्या दि. 23 सप्टेंबर रोजी गोव्यात तारांकीत हॉटेलवर होणार आहे. डॉ. प्रमोद सावंत हे या बैठकीसाठी यजमान आहेत.
रियल इस्टेटवाल्यांचे प्रश्न
राष्ट्रीय स्तरावर रियल इस्टेटवाल्यांचे जीएसटीसंदर्भात अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांवर तातडीने तोडगा काढणे आवश्यक आहे. आपण त्यात लक्ष घातलेले आहे. आणखी दोन बैठकांमध्ये किंवा गोव्यातील बैठकीमध्येच अंतिम तोडगा काढून तसा अहवाल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे देण्याचा मानस मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. अनेक वर्षे रियल इस्टेटमध्ये असलेल्यांचे प्रश्न प्रलंबित होते ते सोडविण्यावर आपण भर देत आहे, असे डॉ. सावंत म्हणाले.