रामभाऊंच्या पत्रकारितेतून नव्या पिढीने आदर्श घ्यावा
‘शतकगौरव सोहळ्या’त मान्यवरांची अपेक्षा : मिश्कीलपणा, कुशाग्र बुद्धी, अफाट स्मरणशक्ती ही रामभाऊंची वैशिष्ट्यो : पुण्यात रामभाऊंचा हृद्य सत्कार
पुणे : ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी यांनी पत्रकारितेसह साहित्य, कला, शैक्षणिक, सामाजिक व संगीत क्षेत्रात दिलेले योगदान अनन्यसाधारण असेच आहे. अफाट स्मरणशक्ती, मिश्कीलपणा व दांडगा जनसंपर्क ही रामभाऊंची वैशिष्ट्यो राहिली असून, या बळावरच पत्रकारितेत त्यांनी आपले वेगळेपण सिद्ध केल्याचे गौरवोद्गार मान्यवरांकडून बुधवारी काढण्यात आले. रामभाऊंसारख्या पत्रकारांचा नव्या पिढीतील पत्रकारांनी आदर्श घ्यायला पाहिजे, अशी अपेक्षाही या वेळी व्यक्त करण्यात आली. वयाच्या शंभरीनिमित्त ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी यांचा ‘तऊण भारत’चे समूह प्रमुख, सल्लागार संपादक व ‘लोकमान्य सोसायटी’चे संस्थापक-अध्यक्ष किरण ठाकुर, ‘महाराष्ट्र वृत्तसेवा’चे मुख्य संपादक कुमार कदम, ‘कोकण सकाळ’चे संपादक राजाराम माने यांच्यावतीने व उर्वरित वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष उल्हास पवार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागाचे माजी प्रमुख डॉ. किरण ठाकुर, ज्येष्ठ पत्रकार मोरेश्वर जोशी, संगणकतज्ञ माधव शिरवळकर यांच्या उपस्थितीत हा सत्कार करण्यात आला. त्यानंतर आयोजित कौटुंबिक मेळाव्यात ते बोलत होते. रामभाऊंचे पुत्र साक्षात्कार जोशी व कुटंबीय तसेच ‘लोकमान्य’चे पुणे विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव हेही यावेळी उपस्थित होते.
उल्हास पवार म्हणाले, पत्रकारितेतील रामभाऊंचे कार्य अतुलनीय असेच आहे. राजकारण, समाजकारण, कला, संगीत यातून चौरस पत्रकारितेचे दर्शन घडवितानाच उत्तम समाजप्रबोधनही त्यांनी केले. ‘संध्या’मध्ये संपादक वसंतराव काणे व त्यांची रंगणारी जुगलबंदी ही पर्वणी असे. ‘केसरी’मध्येदेखील जयंतराव टिळकांसोबत त्यांनी मोठे काम केले. राजकारणात त्यांनी अनेक स्थित्यंतरे पाहिली. त्या काळात राजकारणाप्रमाणे पत्रकारितेलाही एक दर्जा होता. त्यामुळे वाचकांना वैचारिक मेजवानी मिळत असे. यशवंतराव व रामभाऊंविषयीच्या काही आठवणीही पवार यांनी जागवल्या. ‘मला भाऊ नाही. मात्र, रामभाऊ माझा कान धरणारा भाऊ आहे,’ असे विधान यशवंतरावांनी जाहीर भाषणात केल्याची आठवणही त्यांनी सांगितली. डॉ. किरण ठाकुर म्हणाले, मिश्कीलपणा, कुशाग्र बुद्धी व अफाट स्मरणशक्ती ही रामभाऊंची वैशिष्ट्यो सांगता येतील. आजही त्यांचा सेन्स ऑफ ह्यूमर पूर्वीसारखाच आहे. प्रबळ राजकीय सोर्स, सर्वांशी असलेले सलोख्याचे संबंध याने त्यांच्या पत्रकारितेला वेगळ्या उंचीवर नेले. पुण्यातील पत्रकारनगर वसविण्यातही त्यांनी मुख्य भूमिका बजावली. कुमार कदम म्हणाले, रामभाऊंनी पत्रकार म्हणून केलेले काम उत्तुंग असेच आहे. भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी ते बॉर्डरजवळ पंजाबमध्ये जाऊन राहिले. अनेक मालिका त्यांनी लिहिल्या. तेव्हाची व आत्ताची पत्रकारिता वेगळी आहे. रामभाऊंनी त्यातही आपले वेगळेपण दाखवून दिले. सब इन्स्पेक्टरपासून ते मंत्र्या-मुख्यमंत्र्यांपर्यंत प्रत्येकाशी त्यांचे ऋणानुबंध होते. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे तर त्यांना धाकटे बंधू मानायचे. परराष्ट्रमंत्री असताना दिवसभराचे काम आटोपून यशवंतराव संध्याकाळी वेणूताईंच्या नावे पत्र लिहीत असत. हे पत्र ते केवळ पाकिटबंद करत, पाठवित नसत. नंतर हा सर्व खजिना त्यांनी रामभाऊंना दिला. त्यातूनच पुढे रामभाऊंनी यशवंतरावांवरील पहिले चरित्र लिहिले. ‘सवाई गंधर्व महोत्सवा’च्या पायाभरणीतही ते अग्रभागी होते. आजच्या पत्रकारांनी रामभाऊंचे अनुकरण केले पाहिजे.
रामभाऊंनी जागविल्या यशवंतरावांच्या आठवणी
रामभाऊ जोशी यांनी या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्याचबरोबर यशवंतरावांसह त्या काळात राजकारणातील आठवणीही जागविल्या.
डिजिटल युगात रामभाऊंची पत्रकारिता आदर्शवत : किरण ठाकुर
किरण ठाकुर म्हणाले, रामभाऊ हे सुसंस्कृत पत्रकार व उत्तम मार्गदर्शक होते. पूर्वी माध्यमसृष्टीत आजच्यासारखी साधने नव्हती. अशा खडतर काळात रामभाऊंनी पत्रकार म्हणून असाधारण काम केले. वयामध्ये अंतर असूनही नवीन पिढीशी त्यांचा सहज संवाद होत असे. त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. लोकांशी ते कायम कनेक्ट राहत. त्यामुळे सर्वसामान्यांचे जीवन सुसह्या करण्यात त्यांच्या पत्रकारितेने महत्त्वाची भूमिका बजावली. आजचे युग हे डिजिटलचे असून, पत्रकारितेपुढे अनेक आव्हाने उभी आहेत. अशा काळात पत्रकारांनी रामभाऊंसारख्या पत्रकारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे.