For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उत्तर’मध्ये चुरशीने 66 टक्के मतदान

02:12 PM Nov 21, 2024 IST | Radhika Patil
उत्तर’मध्ये चुरशीने 66 टक्के मतदान
A close 66 percent voter turnout in Uttar Pradesh
Advertisement

सर्वच पेठांमध्ये मतदान केंद्रावर रांगा, क्षीरसागर की लाटकर, शनिवारी फैसला

Advertisement

कोल्हापूर : 
उत्तर विधानसभा मतदार संघामध्ये चुरशीने 66 टक्के मतदान झाले आहे. सर्वच 315 मतदान केंद्रामध्ये मतदारांनी सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदानासाठी रांगा लावल्या. दुपार सत्रात जरा मतदानाची गती कमी झाली. मात्र, दुपारी 4 नंतर मात्र, पुन्हा मतदानासाठी केंद्रावर गर्दी झाली होती.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाची यंदाची निवडणूक उमेदवारी देण्यापासून ते अर्ज माघार घेण्यापर्यंत नाटयमय घडामोडीने चर्चेत आली. महाविकास आघाडीतून राजेश लाटकर यांना प्रथम उमेदवारी जाहीर झाली. यानंतर नगरसेवकांनी विरोध केल्याने मधुरिमाराजे छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आली. लाटकर माघार घेणार अशी चर्चा असतानाच माघारीच्या अंतिम क्षणी मधुरिमाराजे यांनीच माघार घेतली. यानंतर महाविकास आघाडी सरकारने राजेश लाटकर यांना पुरस्कृत उमेदवार जाहीर केला. महायुतीमध्ये प्रारंभी उमेदवारीवरून चुरस होती. परंतू शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांचे नाव जाहीर झाल्यानंतर सर्वांनी एकजुटीने प्रचार सुरू केला. गेले दोन दिवस उत्तरमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फेरी झडल्या. सोशलमिडीयावर उमेदवाराच्या विरोधात व्हिडीओही व्हायरल करण्यात आले. यामुळे उत्तरची निवडणूक चर्चेचा विषय ठरली. छुप्या प्रचाराला गती आली होती. लक्ष्मीदर्शनही मोठया प्रमाणात झाले. बुधवारी प्रत्यक्ष मतदानादिवशीही बुथवरही उमेदवार आणि त्यांच्या समर्थकामध्ये खुन्नस दिसून आली. याचबरोबर सर्वच मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. उमेदवारांचे समर्थकांमध्ये काही मतदान केंद्रावर वादावादीचे प्रकारही समोर आले. कसबा बावडा, टाकळा आणि सदरबाजार या परिसराचा यामध्ये समावेश आहे. तसेच काही मतदान केंद्राबाहरील बुथवर उमेदवारांचे समर्थकांमध्ये घोषणाबाजी सुरू होती.

Advertisement

थंडीतही मतदानासाठी रांगा
कोल्हापूरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून थंडी आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरवात झाली. उत्तर विधानसभा मतदार संघातील बहुतांशी मतदान केंद्रावर सकाळी थंडी असतानाही मतदानासाठी रांगा लागल्या होत्या.

‘उत्तर’मध्ये 11 उमेदवार रिंगणात
उत्तर विधानसभा मतदार संघात 11 उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेनेचे राजेश क्षीरसागर, महाविकास आघाडीचे पुरस्कृत राजेश लाटकर, मनसेच अभिजित राऊत, बसपाचे शाम पाखरे यांच्यासह अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. असे असले तरी क्षीरसागर विरूद्ध लाटकर असाच सामना होत आहे.

पेठांमध्ये मतदारांसाठी रांगा
शिवाजी पेठेसह उत्तरमधील इतर पेठांमध्येही चुरशीने मतदान झाले. उत्तरेश्वर पेठेतील मतदारांसाठी दुधाळी पॅव्हीलियन, महाराणा प्रताप हायस्कूल, केएमसी कॉलेज, बाळासाहेब खर्डेकर विद्यामंदिर येथील केंद्रामध्ये मतदानाची सोय केली होती. जुना बुधवार पेठ, गुरूवार पेठ, शुक्रवार पेठ आणि शनिवार पेठेत मतदानासाठी मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. यामध्ये नवमतदारापासून ज्येष्ठ नागरिक सकाळपासूनच मतदान केंद्रावर रांगा लावून होते. जुना बुधवार पेठेतील मतदारांसाठी तोरस्कर चौकातील शाहू विद्यालय, जुना बुधवार तालीम हॉल, करवीर पंचायत कार्यालय, भगतसिंग तरूण मंडळ येथील आंबेडकर विद्यालय, खोल खंडोबा येथील पद्माराजे विद्यालय, सिद्धार्थनगरातील समाज मंदिर येथे मतदान केंद्र होती.

केएमसी कॉलेजमधील मतदान केंद्र ठरले लक्षवेधी
केएमसी कॉलेजमध्ये मतदान केंद्राबाहेर अंतराष्ट्रीय, राष्ट्रीय पातळीवर चमकलेल्या कोल्हापुरातील खेळाडूंचे फोटो आणि त्यांनी मिळविलेले पदकांची माहितीचे फलक लावले होते. मतदानासाठी येणाऱ्या मतदारांचे हे फलक लक्षवेधत होते.

विक्रम हायस्कूलमध्ये मशिनमध्ये बिघाड
शिवाजी पार्क येथील विक्रम हायस्कूल येथील मतदान केंद्रात सकाळी 7.30 वाजता व्हिव्हिपॅट यंत्रमध्ये तांत्रिक बिघाड झाला. यामुळे काही काळ येथील मतदान प्रक्रिया थांबली. प्रशासनाने यंत्र बदलल्यानंतर मतदान प्रक्रिया पूर्ववत झाली.

Advertisement
Tags :

.