कुर्टी पंचायतीच्या नवीन इमारतीला स्व.रवी नाईक यांचे नाव द्यावे
कुर्टी खांडेपार ग्रामसभेत ठराव संमत : विविध प्रश्नांवर चर्चा
फोंडा : कुर्टी - खांडेपार पंचायतीच्या हाऊसिंग बोर्ड येथे होणाऱ्या नवीन प्रशासकीय इमारत प्रकल्पाला फोंड्याचे दिवंगत आमदार तथा कृषीमंत्री रवी नाईक यांचे नाव देण्याचा महत्त्वपूर्ण ठराव रविवारी झालेल्या ग्रामसभेत सर्वानुमते संमत करण्यात आला. सरपंच नावेद तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ग्रामसभेत अकरापैकी दहा पंचसदस्य उपस्थित होते. सभेत केवळ चारच लेखी प्रश्न आले व हे प्रश्न देणाऱ्या चारपैकी दोनच ग्रामस्थ उपस्थित राहिल्याने अवघ्या तासाभरात सभा आटोपली. एरव्ही शंभरहून अधिक ग्रामस्थांची उपस्थितीत व दुपारपर्यंत चालणाऱ्या कुर्टी खांडेपार ग्रामसभेत यावेळी वेगळेच चित्र पाहायला मिळाले. सभागृहात हाताच्या बोटावर मोजण्याजोगे ग्रामस्थ व व्यासपीठावर बसलेल्या पंचसदस्यांची संख्या त्याहून अधिक होती.
ग्रामस्थ संदीप पारकर यांनी मागील सभेत घेण्यात आलेल्या किती ठरावांची अंमलबजावणी झाली तसेच कचरा प्रक्रिया प्रकल्पासंदर्भात फोंडा पालिकेने घेतलेली भूमिका यावर प्रश्न उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना मागील सभेत घेतलेल्या ठरावर पंचायत ठाम राहणार असल्याचे उत्तर सरपंचानी दिले. या व अन्य एकदोन प्रश्नांवर चर्चा होऊन तासाभरात ग्रामसभा आटोपली. कुर्टी खांडेपार पंचायतीच्या हाऊसिंग बोर्ड कुर्टी येथे होऊ घातलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी फोंड्याचे दिवंगत आमदार तसेच माजी कृषीमंत्री रवी नाईक यांनी सातत्याने पाठपुरावा व सहकार्य केल्याने हा प्रकल्प आकाराला येत आहे. त्यामुळे या इमारतीला स्व. रवी नाईक यांचे नाव देण्याचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला.