भारतीय संस्कृती-भाषांची नव्याने ओळख करून देण्याची गरज
माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांचे प्रतिपादन : रोटरीच्या 66 व्या जिल्हास्तरीय परिषदेला प्रारंभ
बेळगाव : भारतीय संस्कृती तसेच येथील भाषांचे महत्त्व हे आपल्यापेक्षा इतर देशातील लोकांना जास्त समजले आहे. त्यामुळेच येथील पारंपरिक नृत्य, नाट्या, संगीत, उपनिषद यावर परदेशातील विद्यापीठांमध्ये अभ्यास केला जात आहे. त्यामुळे देशातील लोकांना संस्कृती, भाषा याचे महत्त्व पटवून देण्यासाठी नव्याने ओळख करून द्यावी लागेल, असे विचार माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी मांडले. रोटरीच्या 66 व्या जिल्हास्तरीय परिषदेला शुक्रवारपासून प्रारंभ झाला. केएलईच्या शताब्दी सभागृहात 2 फेब्रुवारीपर्यंत ही परिषद चालणार आहे. महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकातील रोटरीचे शेकडो पदाधिकारी यामध्ये सहभागी झाले आहेत. परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. विनय सहस्त्रबुद्धे हे ‘इंडियाज सॉफ्ट पॉवर अँड हाऊ कॅन वुई कॉन्ट्रीब्युट’ या विषयावर बोलत होते. व्यासपीठावर रोटरी इंटरनॅशनलचे प्रतिनिधी रुचिर जैन, प्रांतपाल शरद पै, माजी प्रांतपाल अविनाश पोतदार, आनंद सराफ, डॉ. कमलाकर आचरेकर, पराग भंडारे, अजय मेनन यांच्यासह इतर उपस्थित होते.
हंगेरीत डॉ.आंबेडकरांच्या नावाने शाळा
आपल्या देशातील अनेक राष्ट्रपुरुषांची महत्ती आपल्याला जितकी माहिती नाही तितकी विदेशातील लोकांना आहे. हंगेरीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने शाळा चालविली जाते. तेथील एक विद्यार्थी शिक्षणासाठी पुणे येथे आला होता. त्यावेळी त्याने भारतामध्ये जातीय अस्पृश्यता दूर करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले काम पाहिले. त्यामुळे प्रभावीत झालेल्या या विद्यार्थ्याने थेट हंगेरीत जाऊन आंबेडकरांच्या नावाने शाळा सुरू केल्याचे सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले. पुढील दोन दिवस विविध विषयांवर चर्चासत्र तसेच कार्यक्रम होणार आहेत. यानिमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमदेखील आयोजित करण्यात आले आहेत. रोटरीच्या प्रांतामध्ये 6 हजारहून अधिक सदस्य असून हा जगातील सर्वात मोठा प्रांत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. अधिकाधिक सदस्य जोडून रोटरीच्या माध्यमातून सामाजिक काम केले जाणार असल्याची माहिती प्रांतपाल शरद पै यांनी दिली.